Yuvraj Singh Interview Video: भारताचा दोन वेळचा वर्ल्डकप विजेता खेळाडू युवराज सिंगच्या एका मुलाखतीचा टीझर सध्या गाजतो आहे. युवराज सिंगने या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली आहेत. आपल्या कारकीर्दीत भारतीय क्रिकेटसाठी अमूल्य योगदान दिल्यानंतर आता युवी भारतीय क्रिकेटसाठी नवे हिरे घडवताना दिसतो. अनेक तरूण खेळाडूंचा युवराज सिंग हा आदर्श खेळाडू आहे. पण सध्या व्हायरल होत असलेल्या मुलाखतीत युवराज सिंगने धोनी व कपिल देव यांची माफी मागितली आहे.
भारताचा दोन वेळा विश्वचषक विजेता युवराज सिंग याने आपल्या वडिलांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या वक्तव्यांबद्दल भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांची माफी मागितली आहे. “मी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांची माफी मागू इच्छितो,” असं युवराजने स्पोर्ट्स तकने प्रसिद्ध केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये म्हटलं.
युवराजचे वडील योगराज सिंग यांनी अनेक वर्षांपासून धोनींवर टीका करत, युवराजला भारतीय संघातून वगळल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांचा पॅटर्न वेळोवेळी समोर येत राहिला आहे. मात्र युवराजने नेहमीच या वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आणि वडिलांच्या वक्तव्यांवर सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देणं टाळलं. त्याच टीझरमध्ये या विषयावर बोलताना तो म्हणाला, “मी बाबांना सांगितलं आहे की हे योग्य नाही,” असं म्हणत त्याने त्या वक्तव्यांबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली.
योगराज सिंग यांनी धोनींवर केलेली टीका आधीपासूनच चर्चेत होती, पण गेल्या वर्षी त्यांनी कपिल देव यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांमुळेही मोठी खळबळ उडाली. योगराज यांनी दावा केला की कपिल देव यांनी त्यांना धमकी दिली होती आणि १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्या कारकिर्दीला धक्का पोहोचवला. इतकंच नाही, तर त्यांनी एकदा पिस्तूल घेऊन कपिल देव यांच्या घरी जाऊन त्यांना सामोरं गेल्याचंही सांगितलं. या आरोपांवर कपिल देव यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आणि त्यावेळी केवळ थोडक्यात प्रतिक्रिया दिली. मात्र या वक्तव्यांमुळे मोठी चर्चा रंगली.
याशिवाय, कपिल देव यांच्या काळात भारतीय संघातून वगळण्यात आल्याची खंत योगराज सिंग यांच्या मनात दीर्घकाळापासून आहे. चार दशकांपूर्वीच्या त्या घटनेचा पुन्हा उल्लेख करत त्यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांसोबतच्या तणावपूर्ण नात्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं.
अलीकडेच युवराज सिंगने ‘स्पोर्ट्स तक’ला एक मुलाखत दिली, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर आपली मते उघडपणे मांडली. युवराज म्हणाला की, जे लोक क्रिकेटऐवजी वैयक्तिक बाबींवर चर्चा करत त्याच्या पाठीमागे बोलतात, त्यांच्यासोबत बसायलाही त्याला आवडत नाही. अशा लोकांपासून अंतर राखणं मी पसंत करतो, असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.
