युवराज परतला

या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहेत.

युवराज

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारताचे ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघ जाहीर

*आशीष नेहराला ट्वेन्टी-२० संघात स्थान

*ब्रेंडर स्त्रान आणि हार्दिक पंडय़ा नवीन चेहरे

*एकदिवसीय संघातून सुरेश रैनाला डच्चू

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक  स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातील निवड काही अंशी धक्कादायक ठरली. ट्वेन्टी-२० संघात युवराज सिंगची निवड हा भारतीय चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. दुसरीकडे ट्वेन्टी-२० संघात डावखुरा मध्यमगती गोलंदाज आशीष नेहराच्या निवडीने आश्चर्याचा धक्का बसला. पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज ब्रेंडर स्त्रान आणि बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ा हे या संघात दौऱ्यातील नवीन चेहरे असून डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला मात्र एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आला आहे.

युवराजने आतापर्यंत भारताला बरेच सामने एकहाती जिंकवून दिले आहे, पण २०१४ साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्या वेळी युवराजला संघातील स्थान गमवावे लागले होते; पण कर्करोगावर मात करणाऱ्या युवराजने स्थानिक सामन्यांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत दणक्यात संघात पुनरागमन केले आहे.

कधीही तंदुरुस्त न दिसणारा आणि गचाळ क्षेत्ररक्षण करणारा दिल्लीचा गोलंदाज आशीष नेहराच्या निवडीने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. गेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना नेहराने चांगली कामगिरी केली होती, पण असातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नेहराला संघात स्थान देण्याचा निर्णय संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने घेतला आहे. नेहराबरोबर त्याचा दिल्लीचा सहकारी आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे.

युवराज आणि नेहरा यांच्या संघनिवडीबद्दल राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले की, ‘‘युवराज हा खास खेळाडू आहे. त्यांच्या पुनरागमनाने कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही आनंद झाला आहे. त्याला सर्व सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळेल, याची शाश्वती नसली तरी जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याचे सोने त्याला करावे लागेल. नेहराने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये संघात अनुभवी खेळाडूही असावेत, असे आम्हाला वाटते. त्यामुळे नेहराला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात निवडण्याचा निर्णय योग्यच आहे.’’

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाचा या दौऱ्यासाठी संघप्रवेश निश्चित समजला जात होता आणि निवड समितीनेही त्याला मान्यता दिली.

संघनिवडीबद्दल पाटील म्हणाले की, ‘‘आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन बऱ्याच खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. हे सामने त्यांच्यासाठी फार उपयुक्त ठरतील. या सामन्यांतील अनुभवाचा फायदा त्यांना नक्कीच विश्वचषक स्पर्धेत होईल.’’

गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या सुरेश रैनाला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ब्रेंडरला दोन्ही संघांत आणि हार्दिकला ट्वेन्टी-२० संघात स्थान दिले आहे.

भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायुडू, मोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांना एकदिवसीय संघातून वगळण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला; पण मनीष पांडे आणि रिषी धवन यांना मात्र एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. हरभजन आणि भुवनेश्वरला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले असले तरी त्याला ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे.

‘‘ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात नवीन खेळाडूंना संधी देण्याचा आमचा विचार होता. त्यामुळेच सुरेश रैनाला एकदिवसीय संघातून वगळण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे; पण ट्वेन्टी-२० संघात मात्र त्याला स्थान देण्यात आले आहे,’’ असे पाटील म्हणाले.

या संघामध्ये फलंदाजीमध्ये जास्त बदल करण्यात आलेला नाही. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे. फिरकीची जबाबदारी या वेळी आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यावर असून गुरकीरत सिंगचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी या वेळी मोहम्मद शमी, उमेश यादव, रिषी धवन आणि ब्रेंडर यांच्यावर असेल.

या दौऱ्यातील पहिला सामना पर्थ येथे १२ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ

एकदिवसीय : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, गुरकीरट सिंग, रिषी धवन आणि ब्रेंडर स्त्रान.

ट्वेन्टी-२० :  महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, सुरेश रैना, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हरभजन सिंग, उमेश यादव, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार आणि आशीष नेहरा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yuvraj singh comeback indian squad for australia series

ताज्या बातम्या