Yuvraj Singh On Jasprit Bumrah: भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना वानखेडे स्टेडियमवर २०११ वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. ही स्पर्धा जिंकून देण्यात माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने मोलाची भूमिका बजावली होती. मुख्य बाब म्हणजे कॅन्सर असतानाही तो मैदानात उतरला आणि देशासाठी सर्वकाही केलं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर तो कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी परदेशात गेला होता. काही महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. त्यावेळी युवराज सिंग पुन्हा मैदानात परतणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. युवराजने ज्यावेळी पुनरागमन केलं, त्यावेळी तो एका १६ वर्षीय गोलंदाजाला घाबरला होता. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून जसप्रीत बुमराह होता.
युवराज सिंगने १२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. कॅन्सरवर मात केल्यानंतर काही महिन्यातच त्याने पुन्हा एकदा हातात बॅट घेतली. त्यावेळी नेट्समध्ये सराव करत असताना युवराज सिंगने जसप्रीत बुमराहचा सामना करण्यास नकार दिला होता. युवराज सिंगने बुमराहचा एक किस्सा सांगितला आहे.
युवराज ‘द ओव्हरलॅप क्रिकेट’ या कार्यक्रमात मायकल वॉनसोबत बोलताना म्हणाला, “ज्यावेळी मी कॅन्सरला हरवून भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होतो, त्यावेळी बुमराह १६ वर्षांचा होता. तो नेट्समध्ये खूप वेगाने गोलंदाजी करत होता. त्यावेळी मी म्हटलं होतं, ’हा गोलंदाज मला नेट्समध्ये नको.. मला गोलंदाजी करू नकोस. अरे तू जो कोणी असशील थांब.’, कारण तेव्हा मी कॅन्सरमधून बाहेर आल्यानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होतो.”
बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक करताना युवराज म्हणाला, “आता तर बुमराहविरुद्ध खेळताना कुठलाही फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाही. ते एक धाव घेऊन नॉन स्ट्रॉइकला जाऊन उभं राहतात आणि इतर गोलंदाजांवर हल्ला चढवतात. बुमराहची ॲक्शन आणि स्लो चेंडू ओळखणं खूप कठीण आहे. तो खूप हुशार गोलंदाज आहे. त्याच्याकडे टॅलेंट तर आहेच. पण त्याच्या गोलंदाजी ॲक्शनमुळे फलंदाज गोंधळून जातात.” बुमराह सध्या भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला गरज असते, तेव्हा तो गोलंदाजीला येऊन विकेट काढून देतो. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० वर्ल्डकप २०२४ आणि टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा जिंकून देण्यात बुमराहने मोलाची भूमिका बजावली आहे.
