१९ सप्टेंबर २००७ हा दिवस भारतीय चाहते कधीच विसरणार नाहीत. याच दिवशी डरबान इथे पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत धडाकेबाज अष्टपैलू फलंदाज युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूवर ६ खणखणीत षटकार लगावत अद्भुत विक्रम प्रस्थापित केला होता. या अविश्वसनीय विक्रमानंतर युवराज सिंगला एक खास भेट मिळाली होती. जाणून घेऊया काय होती ही खास भेट.

आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनशी ‘द ओव्हरलॅप पॉडकास्ट’मध्ये बोलताना युवराजला मिळालेल्या खास भेटीचा उल्लेख केला. ललित मोदी यांनी सांगितलं की, ‘२००७ टी२० वर्ल्डकपदरम्यान मी भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये गेलो. एखाद्या फलंदाजाने ६ चेंडूत ६ षटकार लगावले किंवा एखाद्या गोलंदाजाने ६ विकेट्स पटकावल्या तर त्या खेळाडूला पोर्श गाडी भेट देईन. युवराजने सिंगने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ षटकार चोपले तेव्हा मी सीमारेषेनजीक उभा होतो. याचि देही याचि डोळा तो पराक्रम अनुभवला. मला प्रचंड आनंद झाला’.

‘सामना संपल्यानंतर युवराज धावतच माझ्याकडे आला आणि माझं बक्षीस कुठेय अशी त्याने विचारणा केली. तुझं बक्षीस तुला लवकरच मिळेल असं मी त्याला आश्वासन दिलं’,

‘युवराजने पोर्शेऐवजी बीएमडब्ल्यू गाडीचा पर्याय निवडला. ज्या बॅटने त्याने हा विक्रम रचला ती बॅट मला दे अशी विनंती केली. त्याने ती बॅट मला दिली. तो अमूल्य ठेवा आजही माझ्या संग्रहात अभिमानाने मिरवतो आहे. सांगितल्याप्रमाणे त्याला पोर्श गाडी देणार होतो. पण त्याने बीएमडब्ल्यू गाडीचा पर्याय निवडला. तो वेडाच आहे. त्याची ती बॅट आता ५० पोर्शे गाड्यांच्या किंमतीएवढी आहे. ते २००७ वर्ष होतं. त्यावेळी पोर्शे गाडी बुक केल्यानंतर भारतात यायला सहा महिने लागायचे. तेवढा वेळ थांबण्यासाठी युवराज तयार नव्हता. त्या तुलनेत बीएमडब्ल्यू लगेच मिळू शकणार होती. पोर्शेएवजी बीएमडब्ल्यू देऊ शकता असं त्याने विचारलं. मी होकार दिला. आम्ही शोरुममध्ये गेलो आणि बीएमडब्ल्यू खरेदी केली. गाडीच्या चाव्या युवराजला सुपुर्द केल्या’, अशी आठवण ललित यांनी सांगितली.

३२ फेरारी!

पॉडकास्टदरम्यान मायकेल वॉन यांनी ललित मोदी यांच्या घराची सैर केली. त्यावेळी ललित यांच्याकडे ३२ फेरारी गाड्या असल्याचं कळल्यावर वॉन अचंबित झाले. एवढ्या फेरारी कशा असा प्रश्न वॉन यांना पडणं साहजिक होतं. ललित यांनी लगोलग फेरारींची कहाणी सांगितली.

‘मी मोठा होत असताना वडिलांकडे फेरारी गाडीची मागणी केली. पण ते नाही म्हणाले. त्या गाडीला प्रचंड वेग आहे, तू अतिवेगात जीव गमावशील असे त्यांचे शब्द होते. त्यामुळे त्यांनी मला कधीच फेरारी घेऊन दिली नाही. पण मला फेरारी हवी होती. ते मनात कायम राहिलं. माझ्या ४०व्या वाढदिवसाला मेव्हण्याने फेरारी गाडी भेट म्हणून दिली’.

यानंतर ललित यांनी जे सांगितलं त्याने वॉन यांना धक्का बसला. ‘मला ४०व्या वाढदिवसाला फेरारी मिळाली. त्यावेळी मी पण केला की माझा मुलगा २१ वर्षांचा झाला की त्याला प्रत्येक वाढदिवसाला फेरारी भेट म्हणून देईन. मी माझं प्रॉमिस राखलं. त्यामुळेच आजच्या घडीच्या आमच्याकडे फेरारी गाड्यांचं खास कलेक्शन आहे. आमच्याकडे आता ३२ फेरारी गाड्या आहेत. त्याच्या नावावर ११ फेरारी आहेत’.

फेरारी गाड्यांची किंमत प्रचंड आहे. ३२ फेरारींची एकत्रित किंमतीचा अंदाज येऊन वॉन अचंबित झाले. ३२ फेरारी असं म्हणत वॉन यांनी अचंबा व्यक्त केला. ‘तुमचा मुलगा मोठा नशीबवान आहे’. ललित त्यावर म्हणाले, ‘नशीबवान आहे खरा. मला फेरारी मिळाली नाही, याची परतफेड मी अशी केली’.

यावर वॉन त्याला म्हणाले, ‘माझ्यासारख्या निवृत्त क्रिकेटपटूबद्दल तुमचं काय मत आहे, त्याला एखादी फेरारी मिळू शकते का’? ललित यांनी हसून बघूया,काही करता येतंय का असा प्रतिसाद दिला.