Yuvraj Singh on Rohit Sharma Virat Kohli: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि संघ व्यवस्थापनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने हे दोघे भारताच्या योजनांचा भाग आहेत की नाही, याबाबत त्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. इतक्या मोठ्या खेळाडूंना आपल्या भवितव्याबद्दल निश्चित माहिती मिळणं आवश्यक असल्याचं युवराजने ठामपणे म्हटलं.

लॉर्ड्स येथे भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान जिओस्टारशी संवाद साधताना युवराजने सांगितलं की, रोहित आणि विराट यांच्या भवितव्याभोवती निर्माण झालेली अनिश्चितता पाहून त्याला स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांची आठवण झाली. त्यावेळी संघात आपली नेमकी भूमिका काय आहे, याबाबत आपल्यालाही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती आणि आपण अंधारातच होतो, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

युवराज सिंग रोहित शर्मा-विराट कोहलीबाबत काय म्हणाला?

युवराज सिंग भारताचा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित होता. इनिंग्स ब्रेकदरम्यान चर्चा करताना युवराज सिंग म्हणाला, “रोहित आणि विराट आज ज्या स्थितीत आहेत, त्याच स्थितीतून मीही गेलो आहे. त्यामुळे त्यांनी खेळावं की नाही, यावर आपण बाहेर बसून मत देणं योग्य नाही. हा निर्णय संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीने घ्यायचा असतो.”

“जर तुम्हाला (निवड समिताला) ते दोघे विश्वचषक खेळावेत असं वाटत असेल, तर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना स्पष्ट सांगा, ‘आम्हाला तुम्ही २०२७ चा विश्वचषक खेळावा असं वाटतं. आम्ही प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी आहोत. मैदानात जा आणि तुम्ही जसं नेहमी खेळता तसं खेळा. उद्या एखादी मालिका खराब गेली म्हणून संघातील स्थान धोक्यात येईल, असा कोणताही दबाव मनात ठेवू नका,” असं युवराजने म्हटलं.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला होता. मात्र, लॉर्ड्समधील तिसरा एकदिवसीय सामना हा रोहितचा भारताकडून अखेरचा सामना असेल, अशा वृत्तांचं बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी तात्काळ खंडन केलं होतं.

युवराजने यावर भाष्य करताना सांगितलं की, खेळाडूला त्याच्या भवितव्याबाबत स्पष्टता मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. “मुख्य प्रशिक्षक, कर्णधार किंवा निवड समिती… निर्णय कोणाचाही असो, पण खेळाडूला स्पष्टपणे सांगितलं गेलं पाहिजे. मला माझ्या कारकिर्दीच्या अखेरीस अशी स्पष्टता मिळाली नव्हती आणि इतकी वर्षे भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूसाठी ते योग्य नव्हतं. जर एखादा खेळाडू तुमच्या पुढील योजनांमध्ये नसेल, तर त्याला ते स्पष्टपणे सांगा. तो निर्णय कठीण असेल, बाहेरच्या लोकांना तो आवडणार नाही. पण निदान त्या खेळाडूला समोरासमोर सत्य सांगितल्याचं समाधान नक्कीच मिळेल.”

दरम्यान, लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ११० चेंडूंत १३८ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या डावात १७ चौकार आणि ५ षटकार लगावले. मात्र, रोहितच्या शतकी खेळीनंतरही भारताला २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि तीन सामन्यांची मालिका १-२ अशा फरकाने गमवावी लागली.