Yuvraj Singh Post on Abhishek Sharma Fifty: भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला टी-२० विश्वचषकात अखेरीस सूर गवसला आहे. अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात अभिषेकने ३० चेंडूत ५५ धावा केल्या आणि भारताच्या ७२ धावांच्या महत्त्वपूर्ण विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तीन वेळा डकवर बाद झाल्यानंतर केलेल्या या खेळीनंतर त्याचा गुरू युवराज सिंगने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिषेकने झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यातील अर्धशतकी खेळीपूर्वी फक्त १५ धावा केल्या होत्या. जगातील नंबर वन टी-२० फलंदाज असलेला अभिषेक शर्मा सलग तीन डावात शून्यावर बाद झाला होता. भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो स्थितीतील होता आणि मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
अभिषेकने या सामन्यात त्याच्या डावाची सावधतेने सुरूवात केली. त्याने मैदानावर काही वेळ घालवत हळू हळू डाव साकारला. अभिषेकने या सामन्यात ४ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. या खेळीसह अभिषेकने आपला फॉर्मदेखील परत मिळवला. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता आणि या विजयामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या संघाच्या आशा बळकट झाल्या आहेत. सामन्यानंतर लगेचच युवराज सिंगने त्याच्या “शिष्याचे” कौतुक केलं.
अभिषेक फॉर्ममध्ये परतताच युवराज सिंगला झाला आनंद
युवराजने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची बॅट सर्व काही बोलते! शानदार खेळी सर अभिषेक, असाच पुढे जात रहा.” युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक शर्माने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. अभिषेकने टी-२० विश्वचषकात केलेली कामगिरी पाहून युवराज सिंगने आनंदी होत ही पोस्ट शेअर केली.
सामन्यानंतर, अभिषेक शर्मा म्हणाला की तो या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता. त्याने कबूल केलं की संपूर्ण स्पर्धेत त्याला फारसे चेंडू खेळायला मिळाले नाही आणि त्यामुळे या खेळीच्या सुरूवातीला तो फक्त क्रीजवर थोडा वेळ घालवू इच्छित होता. अभिषेकने विशेषतः संघ व्यवस्थापन आणि संघातील सहकाऱ्यांचा उल्लेख केला आणि सांगितलं की ते त्याला सतत धीर देत होते आणि त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे त्याला पुनरागमनात मदत मिळाली.

अभिषेक शर्माचं टी-२० विश्वचषकातील हे पहिलं अर्धशतक होतं. १ मार्चला आता कोलकातामधील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात अभिषेक पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. हा स्पर्धेतील आता नॉकआऊट सामना असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ सेमीफायनल गाठणार आहे.

