Yuvraj Singh Recalls Cancer Battle Video: भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने क्रिकेटचं मैदान गाजवलं. २०११ च्या वर्ल्डकप विजयात मोलाची भूमिका बजावणारा युवराज सिंग त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. पण ऐतिहासिक वर्ल्डकप विजयानंतर त्याला कर्करोगाचं निदान झालं. मृत्यूला अगदी जवळून पाहिलेल्या युवराज सिंगने त्याच्या या कर्करोगाच्या आजारदरम्यानचा अनुभव सांगितला आहे.
घरच्या मैदानावर भारताला अनेक वर्षांनंतर विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर युवराजच्या कारकिर्दीचा सर्वात स्थिर आणि सुवर्णकाळ सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र २०११ मध्येच त्याला ट्युमर असल्याचं निदान झालं आणि क्रिकेटमधील यशाच्या शिखरावर असलेला हा डावखुरा फलंदाज या जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी सज्ज झाला.
विश्वचषकादरम्यान युवराजला सतत प्रचंड थकवा, मळमळ आणि अस्वस्थता जाणवत होती. मात्र त्या काळात हा आजार ओळखला गेला नाही. नंतर हा आजार कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार असल्याचं समोर आलं. कर्करोगाचं निदान झाल्याचा धक्का बसल्यानंतर चा अनुभव सांगताना युवराजने सांगितलं की, डॉक्टरांनी त्याला फक्त ३ ते ६ महिनेच आयुष्य शिल्लक असल्याचं सांगितलं होतं.
केविन पीटरसनने युवराजला विचारलं की, “असा एखादा क्षण होता का, जेव्हा तुला वाटलं आता तू मरणार आहेस? युवराज म्हणाला, “हो…, डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुझ्याकडे फक्त तीन ते सहा महिने आहेत. आता तू ठरवं तुला क्रिकेट खेळण्याचं आहे की ट्रीटमेंट करायची आहे. तेव्हा मला असं झालं की, मी क्रिकेट खेळतो, कारण मला माहित नाहीये की माझ्याकडे किती वेळ उरला आहे. कारण, माझा ट्युमर फुफ्फुस आणि हृदयाच्या मधोमध होता आणि तो एका नसेवर दबाव टाकत होता. केमोथेरपी केली नाही तर मला हार्ट अटॅक येऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं,” युवराजने ‘द स्विच’ या केविन पीटरसनच्या शोमध्ये हा खुलासा केला आहे.
युवराजने हेही उघड केलं की तो ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी खूप उत्सुक होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याने भारतीय कसोटी संघात आपली जागा पक्की करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे तो कसोटी संघाचा भाग म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी उत्साहित होता. “सात वर्षे वाट पाहिल्यानंतर आणि जवळपास ४० कसोटींमध्ये १२वा खेळाडू म्हणून बाहेर बसल्यानंतर अखेर मला कसोटी क्रिकेटमध्ये माझी जागा मिळू लागली होती. मला खेळायचं होतं, पण शेवटी उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता,” असं युवराजने सांगितलं.
२०११–१२ दरम्यान युवराजने अमेरिकेत केमोथेरपी घेतली. हा काळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता, असं त्याने सांगितलं. मात्र या अनिश्चिततेतही काही आशेचे क्षण होते, ज्यामुळे तो खचला नाही. त्यातील एक महत्त्वाचा क्षण प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. लॉरेन्स आइन्हॉर्न यांच्याकडून मिळाला.
“डॉ. आइन्हॉर्न मला म्हणाले, ‘तू इथून असा बाहेर पडशील की तुला कधी कॅन्सरच झाला नव्हता.’ त्यांचे शब्द मला खूप बळ देणारे होते. जेव्हा मला पूर्णपणे बरे झाल्याचं सांगण्यात आलं आणि पुन्हा क्रिकेट खेळू शकतो असं कळलं, तेव्हा जणू मला दुसरा जन्म मिळाल्यासारखं झालं,” असं युवराज म्हणाला.
डॉक्टरांचे अंदाज आणि अनेकांच्या शंकांना खोटं ठरवत युवराजने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं. त्याच्या स्पर्धात्मक वृत्तीने त्या प्रवासात निर्णायक भूमिका बजावली असे त्याचे मत आहे. “मला परत आणलं ती माझी स्पर्धात्मक वृत्ती. जग जेव्हा म्हणत होतं की हे शक्य नाही, तेव्हा ते शक्य आहे हे सिद्ध करण्याची माझी इच्छा होती,” असंही त्याने नमूद केलं.
