Yuraj Singh Instagram Video: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग भारतीय क्रिकेटसाठी एकापेक्षा एक स्टार खेळाडूंना घडवत आहे. युवराज सिंगने अभिषेक शर्मा, शुबमन गिलसारख्या खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांना टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी तयार केलं आहे. या दोन्ही खेळाडूंनी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केलं. इथेच न थांबता युवराज इतर अनेक खेळाडूंना घडवत आहे. याच दरम्यान त्याने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे आणि त्याने घडवलेल्या खेळाडूंची नाव घेत त्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हणत सर्वांना टॅग केलं आहे.
युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली सध्या पंजाब किंग्ससाठी सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत असलेले प्रभसिमरन सिंग व प्रियांश आर्य हे खेळाडू घडले. ते दोघेही पंजाबसाठी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. याशिवाय मुंबई इंडियन्सचा फलंदाज नमन धीरने देखील युवीचं मार्गदर्शन घेतलं. शिवाय नेहाल वधेरा आणि अब्दुल समद यांनाही युवीने मार्गदर्शन केलं. याशिवाय दुखापतीनंतर फॉर्मशी झुंजत असलेल्या ऋषभ पंतनेही युवराज सिंगची पुनरागमनासाठी मदत घेतली.
ऋषभ पंतने आयपीएलदरम्यान युवराज सिंगचे मदतीसाठी आणि मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानण्यासाठी गिफ्ट पाठवलं. यासंबंधित युवराज सिंगने एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये ऋषभ पंतने गिफ्ट म्हणून पाठवलेल्या गोल्फ स्टिकच्या बॉक्सवरील तो मेसेज वाचून दाखवतो. यावर पंतने लिहिलं आहे, “प्रिय युवी पाजी, तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार… लवकरच गोल्फ कोर्टवर भेटू… खूप प्रेम ऋषभ पंत.”
युवराजने यानंतर त्याने दिलेली गोल्फ स्टीक काढून त्याने पाठवलेलं गिफ्ट दाखवलं. यादरम्यान गोल्फ स्टीक काढून तो खेळण्यासाठी तो ट्रायल करत असताना युवी म्हणाला, “बेशरम मुलांनो पहिला अभिषेक शर्मा, दुसरा शुबमन गिल, तिसरा प्रभसिमरन सिंग, चौथा नेहाल वधेरा, अब्दुल समद, नमन धीर, प्रियांश आर्य…, लाज नाही वाटत तुम्हाला, ऋषभ पंतकडून शिका काहीतरी. ऋषभ थँक्यू आणि ऑल द बेस्ट.”
युवराज सिंगने हा एक मजेशीर व्हीडिओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलेल्या सर्वांना टॅग करत त्यांना मस्करीत सुनावलं आहे. ज्याप्रमाणे ऋषभ पंतने युवराज सिंगच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आभार मानले, त्याप्रमाणे त्यांनी काहीच केलेलं नाही, त्यामुळे जरा शिका त्याच्याकडून असा भन्नाट व्हीडिओ युवराज सिंगने शेअर केला आहे.
