Yuvraj Singh Special Post For Ajinkya Rahane: भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. काही वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासारखे फलंदाज भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील मजबूत भिंत होते. पण २०२३ मध्ये त्याला संघाबाहेर करण्यात आलं. त्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, पण तो पुनरागमन करू शकला नाही. अखेर त्याने निवृत्तीचा पर्याय निवडला. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. रहाणेच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी पोस्ट शेअर करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने देखील अजिंक्य रहाणेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी बरेच वर्ष एकत्र क्रिकेट खेळले आहेत. युवराजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अजिंक्य रहाणेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासह हटके कॅप्शन देत त्याने लिहिले की, “यशस्वी कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन जिंक्स! तू तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि काही महत्वाच्या सामन्यांमध्ये यशस्वी नेतृत्व करणाऱ्या या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेस. तुला मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलं. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. शकालाका बेबी…”

हेही वाचा

युवराज सिंगसह भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने अजिंक्य रहाणेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सचिनने लिहिले की, “अजिंक्य रहाणे, यशस्वी कारकिर्दीसाठी तुझे मनःपूर्वक अभिनंदन. मुंबईकडून आपण पहिल्यांदा एकत्र फलंदाजी केली, तेव्हाच मला जाणवलं होतं की, तू कधीही प्रसिद्धी किंवा मोठ्या क्षणाच्या मागे धावणारा खेळाडू नव्हता. संघासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी मोठ्या क्षणांना तुझपर्यंत घेऊन आली.”

अजिंक्य रहाणेने भावुक व्हिडिओ शेअर करत केली निवृत्तीची घोषणा

अजिंक्य रहाणेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “तुम्ही कधीच मला परकं मानलं नाही. सदैव साथ दिली. मी देशासाठी सर्वतोपरी योगदान दिलं. मी नेहमीच सच्चेपणाने खेळलो. भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली पर्वाचा मला भाग होता आलं, याचा मला आनंद आहे आणि समाधान आहे.”