Yuvraj Singh Wishes Abhishek Sharma: भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माचा आज ४ सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीच्या जडणघडणीत आणि प्रगतीत एका व्यक्तीची भूमिका सर्वात महत्त्वाची राहिली आहे आणि ती म्हणजे युवराज सिंग. भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराजने अभिषेकला मार्गदर्शन करत त्याला घडवलं. अभिषेक शर्माचे गुरू असलेल्या युवराज सिंगने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज सिंगने त्याच्या खेळातील बारकावे समजावून सांगत, त्याला घडवत आणि सातत्याने प्रशिक्षण देत अभिषेकला आक्रमक आणि आत्मविश्वासू फलंदाज बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या गुरु-शिष्याच्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे अभिषेकच्या खेळात मोठा बदल पाहायला मिळाला. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला अभिषेक शर्मा आता भारतीय संघाकडून ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १६०० हून अधिक धावा करण्यापर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्येही त्याने ९२ सामन्यांतील ८९ डावांत २३७९ धावा केल्या आहेत.

अभिषेकच्या लोकप्रियतेत वाढ झाली, भारतीय संघाकडून खेळताना त्याने काही आक्रमक खेळी केल्या आणि मैदानावर आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवला; मात्र युवराज आणि त्याचा हा गुरु-शिष्याचा बंध अजूनही तितकाच घट्ट आहे. प्रसिद्धी, यश आणि चाहत्यांचं प्रेम मिळूनही या दोघांमधील मैत्रीपूर्ण नात्यात कोणतीही कमतरता आलेली नाही.

युवराज सिंगने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने सुरूवातीला एक जुन्या व्हिडीओचा काही भाग शेअर केला आहे. ज्यामध्ये युवराज सिंग अभिषेक शर्माला उठाबशा काढायला सांगत आहे. अभिषेक शर्मा काही वेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आहे. अनेकदा युवराजने अभिषेकला हेच सांगितलं आहे की सुरूवातीला संथ सुरूवात करत चेंडू खेळून काढ. पण अभिषेक शर्मा नेहमीच मोठे फटके खेळतो.

युवराजने शेअर केलेल्या या जुन्या व्हिडीओमध्ये युवराज अभिषेककडून उठाबशा काढून घेत त्याला म्हणायला सांगत आहे की, पहिल्या चेंडूवर मी मोठा फटका खेळणार नाही. मी मैदानावर टिकून वेळ घेऊन फलंदाजी करणार. यानंतर युवराज सिंगने अभिषेक शर्माबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज सिंगने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “सर अभिषेक, आज तुझा वाढदिवस आहे. हा खरोखरच शुभ दिवस आहे. तू एक व्यक्ती म्हणून जसा घडला आहेस, ते पाहून मला खूप छान वाटतंय. तुझ्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणारा, इतरांना मदत करणारा आणि एक उत्तम नेतृत्वगुण असलेलं व्यक्तिमत्त्व आहेस तू. तुझ्या चुकांमधून आणि अपयशातून नेहमी शिकण्याची तुझी तयारी असते आणि प्रत्येक वेळी आणखी मेहनत घेण्याची तुझी वृत्ती कौतुकस्पद आहे. हे वर्ष तुझ्यासाठी भरपूर धावा आणि शतकांनी भरलेलं असावं, याच शुभेच्छा. नेहमीच खूप प्रेम आणि आशीर्वाद.