Yuvraj Singh On Abhishek Sharma And Vaibhav Sooryavanshi: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ५ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. तर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मासारखे खेळाडू मायदेशी परतणार आहेत. दरम्यान वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात इशान किशनला स्थान देण्यात आलं आहे, पण केएल राहुल प्रमुख यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे इशान किशनला वनडे क्रिकेटमध्ये हवी तितकी संधी मिळत नाही. दरम्यान पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना युवराज सिंग म्हणाला की, “खरं सांगू तर मला अभिषेक शर्माला वनडे संघात खेळताना पाहायचं आहे. मी याआधीही म्हणालो आहे की, जर तुम्ही इशान किशन, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीसारख्या फलंदाजांना वनडे क्रिकेटमध्ये संधी देत नसाल, तर हा त्यांच्या टॅलेंटवर होणारा अन्याय आहे. मला माहीत आहे, आपल्या संघात उत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना संघात संधी मिळणं कठीण आहे. पण ज्याप्रकारे हे युवा खेळाडू कामगिरी करत आहेत, त्यावरून हीच आशा करतो की, लवकरच या खेळाडूंना संघात स्थान मिळेल. अभिषेकने आतापर्यंत जे काही मिळवलं आहे, ते त्याच्या मेहनतीच्या बळावर मिळवलं आहे. याचं सर्व श्रेय त्यालाच जातं.”
अभिषेक शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये वेगवान शतक झळकावलं होतं. टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माला घडवण्यात युवराज सिंगने मोलाची भूमिका बजावली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचही सामन्यांमध्ये त्याने चांगली सुरूवात करून दिली आहे.
अभिषेक शर्माला टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने डावाची सुरूवात करण्याची संधी दिली जात आहे. पण दुसरीकडे वैभव सूर्यवंशीला फॉर्ममध्ये असूनही प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघेही सलामीवीरांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे वैभव सूर्यवंशी फिट बसत नाही.
