Video : “आता माझ्या दुसऱ्या इनिंगची वेळ आली आहे”, युवराज सिंगनं शेअर केलेल्या व्हिडीओमुळे उत्सुकता शिगेला!

भारताचा माजी तडाखेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंग यानं त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

yuvraj singh viral video on come back
युवराज सिंगनं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

गेल्याच महिन्यात आपल्या संभाव्य ‘कमबॅक’ची मिनी अनाउन्समेंट करणारा भारताचा डावखुरा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगच्या कमबॅकची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आणि त्याला कारणीभूत ठरला आहे युवराज सिंगनं त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेला एक व्हिडीओ. या व्हिडीओमधून युवराज सिंगनं आपल्या ‘क्रिकेट वापसी’च्या उत्सुकतेला चांगलीच हवा दिली आहे. या व्हिडीओसोबत युवराज सिंगनं ट्वीट केलेल्या मजकुरामुळे तर ही उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. त्यामुळे आता नेमका युवराज सिंग अधिकृतपणे क्रिकेटमध्ये कधी परततोय, याविषयी क्रीडावर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्याच महिन्यात युवराज सिंगनं केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून आपण पुन्हा क्रिकेटमध्ये पदार्पण करत असल्याचे संकेत दिले होते. “देवच तुमचं नशीब ठरवत असतो. लोकाग्रहास्तव मी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात खेळपट्टीवर परत येईन! तुमच्या प्रेमाबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत! असाच पाठिंबा देत राहा. ही आपली टीम आहे आणि एक सच्चा फॅन कठीण काळात त्याचा पाठिंबा देत राहील”, असं युवराज या पोस्टमध्ये म्हणाला होता.

व्हिडीओसोबत युवराजनं काय म्हटलंय?

या ट्वीटपासून युवराजच्या क्रिकेटमधील वापसीवर चर्चा सुरू झालेली असताना आज युवराज सिंगनं ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला व्हिडीओ त्या चर्चेत अधिकच भर घालणारा ठरला आहे. या व्हिडीओसोबत युवराज सिंगनं दिलेला मेसेद देखील खूप काही सांगून जातो. “ही या वर्षातली ती वेळ आहे. तुम्ही तयार आहात का? यासाठी जे आवश्यक आहे, ते तुमच्याकडे आहे का? तुम्हा सर्वांसाठी माझ्याकडे एक मोठं सरप्राईज आहे. पाहात राहा”, असा मेसेज युवराजनं या व्हिडीओसोबत ट्वीट केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

युवराज सिंगनं एक २२ सेकंदांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मोंटाज शेअर करण्यात आला असून त्यात युवराज सिंग टेनिस बॉलसोबत खेळताना दिसत आहे. युवराज सिंगनं एकाच षटकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा षटकार मारले तेव्हाचे रवी शास्त्रींचे शब्द पार्श्वभूमीला ऐकू येत आहेत. व्हिडीओच्या शेवटी युवराज सिंग दरवाजा उघडतो आणि समोरून कुणीतरी त्याच्या दिशेनं बॉल फेकत असल्याचं दिसत आहे. ‘स्टे ट्यून्ड’ असे दोनच शब्द व्हिडीओच्या शेवटी स्क्रीनवर दिसत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता युवराज सिंग नेमकं कोणतं सरप्राईज चाहत्यांना देणार आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yuvraj singh tweet video montage social viral comeback on cricket pitch pmw

ताज्या बातम्या