U19 वर्ल्डकप म्हणजे परिपक्व होऊन राष्ट्रीय संघासाठी खेळण्यासाठी सज्ज आहोत का हे ठरवण्याची रंगीत तालीम स्पर्धा. आयसीसीने १९८८ वर्षापासून ही स्पर्धा भरवायला सुरुवात केली. मात्र पहिल्यावहिल्या आवृत्तीनंतर दहा वर्ष खंड पडला. १९९८ पासून ही स्पर्धा नियमितपणे होऊ लागली आणि आयसीसी कॅलेंडरचा भाग झाली. दर दोन वर्षांनी हा वर्ल्डकप होतो. युवा खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावं यासाठी आयसीसीने या स्पर्धेंचं आयोजन सुरू केलं. कालौघात या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गुणी खेळाडू भारतीय संघाला मिळाले. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे बारीक लक्ष असतं. प्रतिभेच्या बरोबरीने ही मुलं दडपणाचा सामना कसा करतात, दबावाच्या क्षणी कामगिरी कशी उंचावतात, देशासाठी खेळताना भावनांवर काबू कसं ठेवतात हे पाहणंही रंजक असतं. सळसळत्या ऊर्जेची ही मुलं कसं वागतात याकडेही जाणकार, माजी खेळाडू, निवडसमिती यांचं लक्ष असतं. कारण यांच्यापैकी अनेकजण पुढे जाऊन वरिष्ठ संघासाठी खेळतात.

२००० U19 वर्ल्डकप भारताने जिंकला होता. भारतीय क्रिकेट फिक्सिंगच्या आरोपांनी ढवळून निघत असतानाचा काळ होता. अनेक आदरणीय वाटणारे खेळाडू आरोपीच्या पिंजऱ्यात होते. क्रिकेटच्या विश्वासार्हतेला धक्का लागण्याचा काळ होता. पण युवा स्तरावर भारतीय संघाने बाजी मारली. पंजाबचा उमदा डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. युवराजने स्पर्धेत २०३ धावा आणि १२ विकेट्स पटकावल्या. मोहम्मद कैफच्या नेतृत्वात झालेल्या या स्पर्धेत युवराजने आपली छाम उमटवली. युवराजने स्पर्धेत दमदार कामगिरी करत वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. अवघ्या काही महिन्यात युवराजने भारतासाठी वनडे पदार्पण केलं. पदार्पणाच्या लढतीत आणि त्या स्पर्धेतही युवराजने आपल्या नैपुण्याची छाप उमटवली.

तडाखेबंद फटकेबाजी, भागीदारी करण्याची हातोटी, उपयुक्त फिरकी आणि अफलातून क्षेत्ररक्षक असलेला युवराज हा भारतीय संघाचा अल्पावधीतच अविभाज्य भाग झाला. वनडे क्रिकेटमधल्या अव्वल दर्जेदार खेळाडूंमध्ये युवराजचं नाव घेतलं जातं. ४० कसोटी, ३०४ वनडे आणि ५८ टी२० सामन्यांमध्ये युवराजने भारताचं प्रतिनिधित्व केलं. २००७ मध्ये भारताने पहिलाहिला टी२० वर्ल्डकप जिंकला. या संघाचाही युवराज अविभाज्य भाग होता. याच स्पर्धेत युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूवर ६ षटकार खेचत विश्वविक्रम रचला होता.

२०११ वर्ल्डकप भारताला जिंकून देण्यात युवराजचा सिंहाचा वाटा होता. युवराजने त्या स्पर्धेत ३६२ धावा केल्या. १५ विकेट्स पटकावल्या तसंच चार सामनावीर पुरस्कार पटकावले. युवराजच्या सार्थ कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या देदिप्यमान यशानंतर युवराजच्या आयुष्यात कर्करोगाचं वादळ घोंघावलं. जीवावर बेतणाऱ्या या संकटाशी युवराजने दोन हात केले. वर्षभर सुरू असलेल्या उपचारांनंतर युवराज पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला.

वनडेत भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या युवराजला कसोटीत नियमित संधी मिळाल्या नाहीत. जेव्हा मिळाली तेव्हा त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे ३ शतकांचा अपवाद वगळता युवराजला कसोटीत मोठी खेळी करता आली नाही. जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध युवराज आयपीएल स्पर्धेत चमकला नसता तरच नवल. आयपीएल स्पर्धेत युवराज विविध संघांसाठी खेळला. २०१४ मध्ये युवराजसाठी १४ तर २०१५ मध्ये १६ कोटींची बोली लागली होती.

निवृत्तीनंतर उद्योग-व्यवसाय यांच्याबरोबरीने युवराज अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतो. धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा याच्यासाठी युवराज मेन्टॉर आहे. भारतीय संघाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल हाही ऑफ सीझनमध्ये युवराजच्या मार्गदर्शनात खेळताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने युवराजची भेट घेतली होती.