माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू आणि दोनवेळा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य युवराज सिंग सध्या चांगल्या कामात वेळ घालवत आहे. युवराजची संस्था यू-वी-कॅनने (YouweCan) तेलंगणाच्या निझामाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयात १२० क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) बेड्स लावले आहेत. यासाठी एक्सेंचरकडून संस्थेला आर्थिक सहकार्य प्राप्त झाले आहे. यू-वी-कॅनने बीपीएपी मशीन्स, आयसीयू व्हेंटिलेटर, रुग्ण मॉनिटर्स, क्रॅश कार्ट्स आणि ऑक्सिजन सिलिंडर्ससह विस्तृत वैद्यकीय उपकरणे दिली आहेत.

मिशन १००० बेड्ससंदर्भात माहिती देताना युवराज म्हणाला होता, ”करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आपल्या सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला. आम्ही आपले प्रियजन गमावले, आम्हाला ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि इतर महत्वाच्या सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागला. अशा अनिश्चित संकटामुळे आणि अनेकांच्या मृत्यूमुळे मला स्वत: चे वैयक्तिक नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर मी माझ्या डॉक्टरांशी आणि युद्धपातळीवर काम करणाऱ्यांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पुढाकाराने मिशन १००० बेड्सद्वारे आम्ही आपल्या देशातील क्षमता वाढविण्यासाठी देशभरातील रुग्णालयांमध्ये कोव्हिड क्रिटिकल केयर सुविधा सुरू करत आहोत.”

 

युवराज सिंगने बुधवारी तेलंगानाचे गृहमंत्री महमूद अली, एक्सेंचरचे प्रतिनिधी आणि रुग्णालयातील काही प्रतिनिधींच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन केले.

हेही वाचा – शोएब अख्तरनं अनुष्काला केलं होतं सावध, विराटबाबत सांगितली होती ‘ही’ गोष्ट

युवराजव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या प्रयत्नातून करोनारुग्णांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपये जमा केले होते. पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर या खेळाडूंनीही करोना रुग्णांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे.