Yuzvendra Chahal First Class Cricket Retirement: भारताचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहलने शुक्रवारी लाल चेंडूच्या क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी चहलला कधीच मिळाली नाही. त्याने नॉर्थम्प्टनशायरकडून लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर आपला अखेरचा फर्स्ट-क्लास सामना खेळला. चहलने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. आता भारताच्या व्हाइट-बॉल संघात पुनरागमन करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

युझवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं,
“मी पहिल्यांदा हातात घेतलेला क्रिकेटचा चेंडू लाल चेंडू होता. तेव्हा मी १० वर्षांचा होतो आणि क्रिकेटच्या प्रेमात मी इतका खोलवर बुडून जाईन, याची मला त्यावेळी कल्पनाही नव्हती. माझ्यासाठी लाल चेंडूचं क्रिकेट कधीच केवळ आणखी एक फॉरमॅट नव्हतं. याच क्रिकेटने मला संयम, चारित्र्य, संघर्ष करण्याची जिद्द आणि चिकाटीचा अर्थ शिकवला. तासन्तास मैदानावर राहून प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेटसाठी झुंज देण्यातला खरा आनंदही याच फॉरमॅटने मला दिला.

लॉर्ड्सवर माझा अखेरचा फर्स्ट-क्लास सामना खेळला. हे शब्द लिहिताना भावूक व्हायला होतं, कारण टेस्ट कॅप मिळवणं हे माझं कायमचं स्वप्न होतं. अनेक वर्षं मी ते स्वप्न मनात जपलं. ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आतापर्यंतचा माझा प्रवास ज्या प्रकारे झाला, त्याबद्दल मी मनापासून समाधानी आहे. या फॉरमॅटमध्ये मला मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी मी मनापासून आभारी आहे.

लाल चेंडूने मला आयुष्यातील काही सर्वात सुंदर आठवणी दिल्या आहेत आणि त्या माझ्याकडून कोणीही कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. पण माझा प्रवास अजून संपलेला नाही. देशासाठी खेळण्याची भूक अजूनही तितकीच कायम आहे. माझ्यात अजूनही क्रिकेट बाकी आहे, यावर माझा विश्वास आहे. वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये पुन्हा संधी मिळवण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार आहे.

माझ्या संपूर्ण प्रवासात सातत्याने पाठिंबा, विश्वास आणि साथ दिल्याबद्दल हरियाणा क्रिकेट असोसिएशन, श्री. रणबीर सिंह महिंद्रा सर आणि श्री. अनिरुद्ध सिंह चौधरी सर यांचे विशेष आभार. १० वर्षांच्या मुलाने पहिल्यांदा हातात घेतलेल्या लाल चेंडूपासून ते अखेरचा फर्स्ट-क्लास सामना खेळण्यापर्यंतचा हा प्रवास… खरंच अविस्मरणीय राहिला आहे.”

चहलने आपल्या कारकिर्दीत ४९ फर्स्ट-क्लास सामने खेळले असून त्यात त्याने ३२.२७च्या सरासरीने १४८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ६/२५ अशी आहे. नुकताच तो नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी क्रिकेट खेळत होता. लॉर्ड्सवर मिडलसेक्सविरुद्ध खेळलेल्या आपल्या अखेरच्या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. २०२६-२७च्या काउंटी चॅम्पियनशिप हंगामात ३६ वर्षीय चहलने पाच सामने खेळले आणि २१ विकेट्स घेतल्या. डरहॅमविरुद्धच्या सामन्यात त्याची सर्वोत्तम कामगिरी झाली. या सामन्यात त्याने एकूण नऊ विकेट्स घेतल्या, ज्यात पहिल्या डावातील पाच विकेट्सचा समावेश होता.