Yuzvendra Chahal Clean Bowled Ben Stokes: भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. चहल आणि कुलदीप यादवच्या फिरकी जोडीने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये धुमाकूळ घातला होता. पण कुलदीपने गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान देऊन आपलं संघातील स्थान कायम ठेवलं, तर चहलला संघाबाहेर करण्यात आलं. तेव्हापासून तो भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. आयपीएलमध्ये चमकल्यानंतर आता तो इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. यादरम्यान त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्सला बाद केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

युझवेंद्र चहल आपल्या गुगलीसाठी ओळखला जातो. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना त्याचा चेंडू टप्पा पडून इतका आत येतो की, फलंदाजाला विश्वासच बसत नाही. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. बेन स्टोक्स जगातील टॉप अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. पण चहलच्या फिरकीसमोर त्याची बत्ती गुल झाली.

युझवेंद्र चहल या स्पर्धेत नॉर्थम्पटनशायर संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत डरहॅमविरुद्धच्या सामन्यात त्याने बेन स्टोक्सला बाद केलंय. तर झाले असे की, डरहॅम संघाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरू असताना ४७ वे षटक टाकण्यासाठी चहल गोलंदाजीला आला. त्यावेळी स्टोक्स १४ धावांवर फलंदाजी करत होता.

चहलने षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकला. स्टोक्सने उजवा पाय पुढे काढून चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण काही कळायच्या आत चेंडू ऑफ स्टंपला जाऊन धडकला. हे पाहून बेन स्टोक्सही आश्चर्यचकीत झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात हरहॅम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डरहॅमकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना बेडिंगहॅमने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर मयांक अगरवालने ३६ धावा केल्या. डरहॅम संघाचा पहिला डाव अवघ्या २०५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नॉर्थम्पटनशायर संघाने दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ७ गडी बाद २२५ धावा केल्या आहेत.