Yuzvendra Chahal Clean Bowled Rohit Sharma Video: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात फिरकीपटू चहलने हिटमॅनला क्लीन बोल्ड केलं. रोहितला बाद करत त्याने आपल्या संघाला मोठी विकेट मिळवून दिली. धरमशालाच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळवला जात आहे. पंजाब किंग्ससाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २०० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबईने चांगली सुरूवात केली आहे.

रोहित शर्मा व रायन रिकल्टनची जोडी धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली. रायन रिकल्टनने वादळी फटकेबाजीला सुरूवात करत झटपट धावा केल्या, तर रोहित शर्माने सावधपणे फलंदाजी केली. रोहितने संधी मिळताच आक्रमक फटके खेळत त्याला साथ दिली. रिकल्टन २३ चेंडूत ४८ धावा करत बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने संघाचा डाव सावरला.

युझवेंद्र चहलच्या फिरकीच्या जाळ्यात हिटमॅन अडकला; पाहा VIDEO

युझवेंद्र चहलने या सामन्यात रोहित शर्माविरूद्ध चांगली गोलंदाजी केली. रोहितला त्याने एकदाही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही आणि त्याच्या शॉट्सवर नियंत्रण ठेवायला भाग पाडलं. १०व्या षटकात चहल गोलंदाजीला आला. चहलने टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या आसपास जाणारा होता आणि लेगब्रेक असला तरी चेंडू कोनातून सरळ आत गेला. रोहित शर्मा ड्राइव्ह खेळण्यासाठी क्रीजमध्ये मागे सरकला, पण चेंडूचा अचूक अंदाज त्याला आला नाही. चेंडू थेट ऑफस्टंपवर आदळला आणि स्टंप्स उडाले.

रोहित २६ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत दोन षटकारांचा समावेश होता. युझवेंद्र चहलने सामन्यापूर्वी धरमशालामध्ये रोहित शर्माबरोबर फोटो शेअर केला होता. या फोटोला त्याने Brotherhood असं कॅप्शन दिलं होतं. चहलने रोहितला भाऊ-भाऊ म्हणत त्याची विकेट घेत संघासाठी मोठी कामगिरी केली. रोहितला बाद केल्यानंतर चहलने आक्रमक सेलिब्रेशन केलं.

रोहित शर्मा सावधपणे खेळत मैदानावर सेट झाला होता, त्यामुळे रोहित शर्माची विकेट पंजाब किंग्ससाठी त्या घडीला खूप महत्त्वाची विकेट होती. युझवेंद्र चहलने हिटमॅनला बाद करत पंजाबला सामन्यात कायम ठेवलं. रोहित बाद झाल्यानंतर तिलक वर्मा व शेरफेन रूदरफोर्डने संघाचा डाव सावरला आहे. त्यामुळे हा सामना नेमकं कोणतं वळण घेणार आणि पंजाब किंग्स सलग चार पराभवांनंतर हा सामना जिंकत प्लेऑफच्या आशा कायम ठेवणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.