Yuzvendra chahal Playing 11 Prediction For Ind vs USA match: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार भारत आणि श्रीलंकेत रंगणार आहे. गतविजेता भारतीय संघ ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून स्पर्धेची सुरुवात करणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान भारताचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहलने अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची मजबूत प्लेईंग ११ निवडली आहे. या संघात त्याने कोणत्या खेळाडूंना स्थान दिलं? जाणून घ्या.
बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यासह टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी देखील संघ जाहीर केला होता. या संघातून शुबमन गिलला सुट्टी देण्यात आली होती. तर इशान किशनला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये संजू सॅमसनला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली गेली होती. मात्र, या पाचही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.
संजूकडे टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी सलामीवीर फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान निश्चित करण्याची ही सुवर्णसंधी होती. पण पाच पैकी एकही सामन्यात तो मोठी खेळी करू शकलेला नाही. त्याने ९.२० च्या सरासरीने अवघ्या ४६ धावा केल्या. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवलेल्या इशान किशनची बॅट चांगलीच तळपली. त्याला या मालिकेत ४ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ५३.७५ च्या सरासरीने २१५ धावा जमा केल्या. यासह मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली.
युजवेंद्र चहलने अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अभिषेक शर्मासह इशान किशनची सलामीवीर फलंदाज म्हणुन निवड केली आहे. दोघेही स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा, चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या, सहाव्या क्रमांकावर शिवम दुबे, सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी अक्षर पटेलची निवड केली आहे. तर गोलंदाज म्हणून वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहची निवड केली आहे.
अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी आहे युजवेंद्र चहलने निवडलेली प्लेईंग ११:
इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

