Yuzvendra Chahal on Alcohol: आयपीएल २०२६ चा रोमांच अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ वा हंगाम २८ मार्चपासून सुरू होणार आहे. भारतात अनेक खेळाडू आपल्या अद्वितीय कौशल्याच्या बळावर या स्पर्धेत येऊ पाहत असतात, त्यामुळे ज्या खेळाडूंना सातत्याने संधी मिळत आहे त्यांनी चांगली कामगिरी करत राहणं महत्त्वाचं असतं. जवळपास दोन महिने चालणाऱ्या या लीगमध्ये खेळाडूंना आपला फॉर्म आणि फिटनेस दोन्ही टिकवून ठेवावं लागतात. यामुळे एका भारतीय खेळाडूने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या खेळाडूने मद्यपान सोडलं असून आता त्याला आपल्या संघाला चॅम्पियन बनवायचं आहे.

सध्या आय़पीएलसाठी सर्व खेळाडू आपआपल्या ताफ्यात सामील झाले आहेत. सर्व संघांनी कॅम्प सुरू केले असून हळूहळू खेळाडू दाखल होत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज आपल्या संघात परतले आहेत. तर वर्ल्ड चॅम्पियन संघातील खेळाडू कुटुंबाबरोबर वेळ घालवून काही दिवसांनी संघात परततील.

इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या आधी, लीगचा अव्वल गोलंदाज युझवेंद्र चहलने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका मोठ्या बदलाविषयी खुलासा केला आहे. चहल आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार असून तो आपल्या सहकाऱ्यांसोबत सराव करत आहे. हा ३५ वर्षीय खेळाडू फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. महत्त्वाचं म्हणजे चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्ससोबतच्या संभाषणादरम्यान चहलने खुलासा केला की, तो सहा महिन्यांहून अधिक काळ दारूपासून दूर आहे. हे ऐकून दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने भारतीय फिरकीपटूच्या निर्णयाचे कौतुक केलं. चहल म्हणाला, “सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असेल मी आता दारू पिणं सोडलं आहे. मी ३५ वर्षांचा आहे, त्यामुळे मला अधिक एक्टिव्ह राहायचं आहे आणि माझ्या संघासाठी माझे १५०% योगदान द्यायचं आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून, आयपीएलमधील खेळाडूंनी माझ्याकडून काही चांगलं शिकावं, अशी माझी इच्छा आहे.”

गेल्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्सने उत्कृष्ट कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून ६ धावांनी पराभूत झाल्यामुळे, स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी हुकली. चहलच्या मते, मार्को यान्सनच्या संघातील उपस्थितीमुळे सामन्याचे पारडे त्यांच्या बाजूने फिरू शकले असते. चहल म्हणाला, “अंतिम सामन्यात यान्सनची उणीव आम्हाला जाणवली, कारण तो तेव्हा संघात नव्हता. जर तो असता, तर आम्ही नक्कीच चॅम्पियनशिप जिंकलो असतो. सपूर्ण स्पर्धेत त्याची गोलंदाजी उत्कृष्ट होती आणि त्याची फलंदाजीही तशीच होती. अखेरीस दोन-तीन षटकार मारण्याची क्षमता त्याच्यात होती. तो ज्या प्रकारे गोलंदाजी करत आहे, त्यामुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. विरोधी संघाच्या सलामीवीरांसाठी हे सोपं असणार नाही.”