Yuzvendra Chahal Cigaratte Smoking video: आयपीएल २०२६ मधील एकापेक्षा एक थरारक सामन्यांवर सर्वांचं लक्ष असताना युझवेंद्र चहलच्या धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. युझवेंद्र चहल ‘पंजाब किंग्स’ या आयपीएल संघाचा सदस्य आहे. आयपीएल व्यतिरिक्त, युझवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याचे अनेक क्रिकेट व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय असले तरी, अलीकडेच युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे चाहते संतापले आहेत.

अलीकडेच, युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चहल त्याच्या आलिशान निळ्या रंगाच्या कारमधून वेगाने गाडी चालवताना दिसत आहे, पण व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की तो कारमध्ये बसून सिगारेट पीत आहे. एवढंच नाही तर, युझवेंद्र चहलने जळती सिगारेट कारमधून रस्त्यावर फेकली आणि कारचा वेग वाढवून तो पुढे निघून गेला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच लोकांना धक्का बसला. लोकांनी युझवेंद्र चहलला जोरदार ट्रोल केलं. एका युझरने कमेंट केली, “हे खूपच जास्त झालं. जर हे दुसऱ्या कोणासोबत घडलं असतं, तर पोलिसात तक्रार दाखल केली असती.” तर दुसऱ्या एका युझरने लिहिलं, “आता चलान काढा, कुठे गेले हे लोक?” तर तिसऱ्या एका युझरने लिहिलं, “यात काय चुकीचं आहे? आता तर कोणी याचा आनंदही घेऊ नये, ही त्याची आनंद घेण्याची स्टाईल आहे.” या व्हिडिओवर युझर्सच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

युझवेंद्र चहलने मागील हंगामात १४ सामन्यांत १६ बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि पंजाब किंग्स संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र अंतिम सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. चहलने आयपीएल २०२६ पूर्वी झालेल्या मुलाखतीत डिव्हिलियर्सला सांगितलं की, पंजाबकडून खेळताना आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्याचा निर्धार आहे आणि स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक आहे. तसेच, संघातील तरुण खेळाडूंसाठी आदर्श बनण्याच्या उद्देशानेच त्याने मद्यपान सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने सांगितले.

“सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला, मी मद्यपान सोडलं आहे. आता माझं वय ३५ वर्षे आहे, त्यामुळे मला अधिक फिट राहून संघासाठी माझे १५० टक्के द्यायचे आहेत. वरिष्ठ खेळाडू म्हणून आयपीएलमधील इतरांनी माझ्याकडून काहीतरी शिकावं, अशी माझी इच्छा आहे,” असं चहल म्हणाला होता.

दरम्यान, सार्वजनिक रस्त्यावर सिगारेट फेकताना दिसलेल्या या दृश्यामुळे चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या चहल आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळत असून, त्याने तीन सामन्यांत तीन बळी घेतले आहेत. मात्र मैदानाबाहेरील ही घटना त्याच्या मैदानावरील कामगिरीवर पाणी फेरू शकते.