चेन्नई सुपर किंग्स संघाने असंख्य अफवा, वावड्या यांना छेद देत भारताचा माजी गोलंदाज झहीर खानची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. १७ वर्ष प्रशिक्षकपद भूषवलेल्या स्टीफन फ्लेमिंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी कुणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आयोन मॉर्गन, ब्रेंडन मॅक्युलम यांच्यासह हेमांग बदानी यांची नावं चर्चेत होती. मात्र चेन्नईने धक्कातंत्र अवलंबत झहीरच्या नावाची घोषणा केली. वनडे वर्ल्डकपचं जेतेपद आणि भारतीय कसोटी संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्यात झहीरची भूमिका निर्णायक होती. निवृत्तीनंतर झहीर यांनी मुंबई इंडियन्स, लखनौ सुपरजायंट्स तसंच दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर काम केलं.

‘चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल स्पर्धेतल्या बलाढ्य संघांपैकी एक आहे. चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या या संघाने जिंकण्यात कमालीचं सातत्य दाखवलं आहे. ५ जेतेपदांसह कर्तृत्व सिद्ध केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स केवळ एक फ्रँचाईज नाहीये तर ते एक कुटुंबच आहे. स्टीफन फ्लेमिंग जवळपास १७ वर्ष या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचं योगदान मोलाचं आहे. चेन्नई संघाकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा असतात. या संघांशी चाहत्यांची भावनिक ऋणानुबंध आहे. प्रशिक्षकपद ही एक मोठी जबाबदारी आहे, आव्हान आहे. पण यासाठी निवड होणं हा प्रचंड आनंदाचा, समाधानाचा क्षण आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मी विविध संघांबरोबर काम केलं. खेळाने मला जे दिलं त्याप्रति ऋण व्यक्त करण्याची ती एक संधी आहे’, असं झहीरने सांगितलं. चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया हँडल्सवर ही मुलाखत शेअर करण्यात आली आहे.

तो पुढे म्हणाला, ‘ऋतुराज एक युवा कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजाचं मार्गदर्शन संघाला मिळत आहे. प्रशिक्षकांची मोठी फळी असेल. खेळाचे आयाम बदलत आहेत. क्रिकेटपटू सातत्याने खेळत असतात. फिटनेस राखणं हेही एक मोठं आव्हान आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने खेळातले बारकावे घोटीव करणं महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञान जोडीला असेल पण प्रत्यक्ष मैदानात ठरलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे सोपे नाही. संघातले युवा तसंच अनुभवी खेळाडू यांच्याशी संवाद साधेन. वर्षानुवर्षे चेन्नई संघाची कामाची पद्धत ठरलेली आहे. त्यामुळे माझं काम सुकर होणार आहे’.

प्रशिक्षक म्हणून निवड कशी झाली यासंदर्भात विचारलं असता झहीर म्हणाला, ‘चेन्नई सुपर किंग्स संघाची प्रक्रिया थेट असते. ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. माझ्या नियुक्तीत महेंद्रसिंग धोनीचा मोठा वाटा आहे. त्याने अनेक वर्ष संघाचं नेतृत्व केलं आहे. यापुढेही संघाची वाटचाल कशी असेल यासंदर्भात त्याचं एक व्हिजन आहे. संघ म्हणून एक धोरण आणि दिशा ठरलेली आहे. चेन्नईच्या सहमालक रुपा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कासी यांनी मला प्रशिक्षक होणार का असं विचारलं. मी होकार दिला. चेन्नईसारख्या संघाचं प्रशिक्षकपद भूषवणं हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण असेल. त्यानंतर निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली’.

चेन्नई शहराशी असलेल्या कनेक्शनबद्दल झहीर म्हणाला, ‘चेन्नईशी अतिशय जुना ऋणानुबंध आहे. चेन्नईस्थित एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये मी तीन वर्ष होतो. माझ्या कारकिर्दीत गोलंदाज म्हणून घडण्यात या तीन वर्षांचा मोठा वाटा आहे. डेनिस लिली यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य गोष्टी शिकलो. ते दिवस खास होते. राहण्याची व्यवस्था चांगली होती. आम्ही १०-१२ गोलंदाज कसून सराव करायचो. फावल्या वेळेत चित्रपट पाहायला जायचो. चेन्नई शहर माझ्यासाठी खूप खास आहे. अण्णानगर भागात आम्ही राहायचो. त्या परिसराची चांगली माहिती आहे. अनेक मित्र आहेत. एगमोर भागात पेस अकादमी आहे. आम्ही एका शाळेच्या परिसरात सराव करायचो. अतिशय गजबजलेला भाग आहे. त्या काळात मी एमआरएफच्या ग्लोब ट्रॉटर्स संघाकडून खेळलो. शहराच्या, या परिसराच्या, मित्रमंडळींच्या असंख्य आठवणी आहेत’.

महेंद्रसिंग धोनी चाळिशीपल्याड आहे. यंदाच्या वर्षी धोनी संघाचा भाग होता पण तो खेळला नाही. धोनीचं वय पाहता तो यापुढे किती खेळेल याविषयी साशंकता आहे. ऋतुराज गायकवाड संघाचा कर्णधार आहे. चेन्नईने ट्रेडऑफमध्ये रवींद्र जडेजाच्या जागी संजू सॅमसनला ताफ्यात सामील केलं होतं. दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय, कर्णधार आणि यष्टीरक्षक अशा दुहेरी जबाबदारीचा अनुभव संजूकडे आहे. भारताला टी२० वर्ल्डकप जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. डॅडीज आर्मी म्हणजे तिशी पस्तिशीपल्याडच्या खेळाडूंचा संघ अशी ओळख असणाऱ्या चेन्नईने दोन हंगामांपूर्वी धोरण बदलत टी२० बेबीज अर्थात युवा खेळाडूंची संघात निवड केली.