रेयाल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान या मोसमाअखेरीस क्लबला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. झिदान यांनी स्वत:च खेळाडूंना त्यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्त स्पेनमधील प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले आहे.

गेल्या आठवडय़ात रेयाल माद्रिदला सेव्हियाविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करावी लागली. त्यामुळे रेयाल माद्रिदची ला-लीगा फुटबॉलमध्ये आघाडी घेण्याची संधी हुकली. या सामन्यानंतरच झिदानने रेयाल माद्रिद क्लब सोडण्याविषयीची कल्पना खेळाडूंना दिली. रेयाल माद्रिदला कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेत दुबळ्या अल्कोयानोकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांचे आव्हान चेल्सीने संपुष्टात आणले. ला-लीगा फुटबॉलमध्ये ते अ‍ॅटलेटिको माद्रिदपेक्षा दोन गुणांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे दोन सामने शिल्लक असताना त्यांच्या जेतेपदाच्या आशा धूसर झाल्या आहेत.

‘‘पुढे काय होईल, हे आताच सांगता येणार नाही. आम्ही पुढील आठवडय़ापर्यंत सामना खेळणार आहोत. पण रेयाल माद्रिद हा अनिश्चित क्लब असल्याने आमचे पुढील भवितव्य आम्हालाही माहित नाही,’’ असे झिदानने सांगितले. रेयाल माद्रिदला चॅम्पियन्स लीगचे सलग तिसरे जेतेपद मिळवून दिल्यानंतर झिदान यांनी २०१८मध्ये राजीनामा दिला होता. पण १० महिन्याच्या कालावधीतच ते पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी रुजू झाले. खेळाडू म्हणून रेयाल माद्रिदकडून कारकीर्द घडवताना त्यांनी २००६मध्ये क्लबला सोडचिठ्ठी दिली होती.