Zimbabwe vs South Africa 1st Test: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५–२७ स्पर्धेची नवी साखळी सुरू झाली आहे. भारतीय संघ इंग्लंडचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या नव्या साखळीत आयसीसीने लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्यात कॉंकशन सब नियमाचा देखील समावेश आहे. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेटला डोक्याला चेंडू लागल्यामुळे मैदान सोडावं लागलं आहे.
बुलावायोमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गाजवला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. झिम्बाब्वेकडून टी कायटानो आणि ब्रायन बेनेटची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. झिम्बाब्वेला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. सलामीवीर फलंदाज कायटानो स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर निक वेल्चही बाद होऊन माघारी परतला. अवघ्या २३ धावांवर दक्षिण आफ्रिकेचे २ फलंदाज माघारी परतले होते.
दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर, झिम्बाब्वेला सहाव्या षटकात मोठा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेकडून सहावे षटक टाकण्यासाठी क्वेना मफाका गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू ब्रायन बेनेटच्या हेल्मेटला जाऊन लागला. चेंडू लागताच तो मैदानावरच बसला. फिजिओ मैदानात आले, त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याने ३ चेंडू खेळून काढले.
मैदान सोडण्याचा घेतला निर्णय
पण आठव्या षटकात त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि रिटायर्ड हर्ट झाला. काही मिनिटांनी झिम्बाब्वे क्रिकेटकडून, ब्रायन बेनेट कॉंकशनमुळे बाहेर होत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्याच्या जागी प्रिन्स मसवउरेला संधी देण्यात आली आहे.
आयसीसीच्या नव्या नियमानुसार, तो पुढील ७ दिवस मैदानावर पुनरागमन करू शकणार नाही. आयसीसीने आधीच स्पष्ट केलं आहे की, जर एखादा खेळाडू कॉंकशनमुळे बाहेर होत असेल आणि त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली असेल. तर कॉंकशनमुळे बाहेर झालेला खेळाडू ७ दिवस मैदानावर पुनरागमन करू शकणार नाही.