टी२० वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाला शुक्रवारी धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे नवख्या अशा आयर्लंडच्या संघाने बलाढ्य भारतीय संघाला ३४ धावांनी नमवण्याची किमया केली. आयर्लंड संघाचा भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारातला पहिलाच विजय आहे. भारतीय संघासाठी अशा पद्धतीने पराभूत होणं अगदीच अनपेक्षित होतं. धक्कादायक पराभवाने श्रेयस अय्यरच्या कर्णधार म्हणून कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. भारतीय संघाला चार लिंबूटिंबू संघांनी हरवलं आहे. यापैकी झिम्बाब्वेचा संघ एकेकाळी ताकदवान होता. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे झिम्बाब्वे संघाची रयाच गेली. भारताने बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवलं. मात्र त्यांनीही काही सामन्यात भारताला इंगा दाखवला. नव्वदच्या दशकात केनियाचा संघ तुल्यबळ मानला जायचा. त्यांनीही भारताला हरवलं आहे. या यादीत आयर्लंडने स्थान पटकावलं आहे.

भारतीय संघाने ५९९ कसोटी खेळल्या आहेत. प्रतिस्पर्ध्यांचा विचार केला तर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वे हे संघ बाकी संघांच्या तुलनेत कच्चे आहेत. एकेकाळी क्रिकेटविश्वाचा गौरव असलेल्या झिम्बाब्वेने दोनदा भारताला नमवण्याची किमया केली आहे. १९९८ मध्ये हरारे इथे झिम्बाब्वेने भारताला हरवलं होतं. त्यानंतर २००१ मध्ये पुन्हा त्याच मैदानावर भारताला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. बांगलादेशला मात्र २६ वर्षात कसोटीत एकदाही भारताला हरवता आलेलं नाही.

भारतीय संघाने १०७८ वनडे सामने खेळले आहेत. बांगलादेशने ८ तर झिम्बाब्वेने १० वेळा भारताला हरवण्याची ताकद दाखवली आहे. असोसिएट संघांपैकी केनियाने भारताला दोनदा हरवलं आहे. १९९८ साली ग्वाल्हेर इथे झालेल्या लढतीत केनियाने २६५ धावांची मजल मारली. मॉरिस ओडुंबेने ८३ तर रवी शहाने ७० धावांची खेळी केली. हितेश मोदीने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव १९६ धावांतच आटोपला. भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. केनियाकडून स्टीव्ह टिकोलो आणि मॉरिस ओडुंबे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. अष्टपैलू कामगिरीसाठी ओडुंबेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

२००१ मध्ये क्वेबेखा इथे झालेल्या लढतीत केनियाने भारताला चीतपट केलं. केनियाने २४६ धावांची मजल मारली. केनेडी ओटियानोने ६४ तर रवी शहाने ५० धावा केल्या. थॉमस ओडायोने ५१ धावा करत त्यांना चांगली साथ दिली. भारतीय संघाचा डाव १७६ धावांतच आटोपला. जोसेफ अंगारा आणि थॉमस ओडोयो यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाने २७७ टी२० सामने खेळले आहेत. बांगलादेशने एकदा तर झिम्बाब्वेने तीनदा भारताला हरवलं आहे. २०१९ मध्ये दिल्ली इथे झालेल्या लढतीत बांगलादेशने भारतीय संघावर सहज विजय मिळवला होता. संथ आणि धीम्या खेळपट्टीवर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना १४८ धावाच करता आल्या. शिखर धवनने ४१ धावा केल्या. बांगलादेशतर्फे शफीउुल इस्लाम आणि अमिनुल इस्लाम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मुशफकीर रहीमच्या अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने ७ विकेट्स राखून हे लक्ष्य गाठलं. सौम्या सरकारने ३९ धावा करत रहीमला चांगली साथ दिली.

२०१५ मध्ये अनुनभवी झिम्बाब्वेने भारतीय संघावर १० धावांनी विजय मिळवला होता. झिम्बाब्वेने १४५ धावा केल्या. चामू चिभाभाने ६७ धावांची खेळी केली. भारतीय संघाला १३५ धावाच करता आल्या. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा संघ पाठवण्यात आला होता. वर्षभरात पुन्हा एकदा झिम्बाब्वेने भारताला दणका दिला. झिम्बाब्वेने १७० धावांची मजल मारली. इल्टॉन चिगुंबराने २६ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी केली. भारतीय संघाने विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केले पण त्यांना २ धावा कमी पडल्या. मनीष पांडेने ४८ धावा केल्या. तौराई मुझाराबानी आणि चामू चिभाभा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

दोन वर्षांपूर्वी हरारेच्या मैदानावर पुन्हा एकदा टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी करताना ११५ धावाच करता आल्या. रवी बिश्नोईने ४ विकेट्स घेतल्या. भारताचा डाव १०२ धावांतच आटोपला. आव्हानात्मक खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट्स गमावल्या. कर्णधार शुबमन गिलने ३१ तर वॉशिंग्टन सुंदरने २७ धावा केल्या. झिम्बाब्वेतर्फे तेंदई चटारा आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

आयर्लंडने शुक्रवारी भारताला या प्रकारात हरवण्याची किमया केली आहे. हाँगकाँग, नामबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, युएई, अमेरिका यांच्याविरुद्ध भारतीय संघ खेळला आहे मात्र त्यांच्यापैकी कोणी आयर्लंडसारखा विजय मिळवू शकले नाहीत.