Oman vs Zimbabwe Highlights: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ८ वा सामना झिम्बाब्वे आणि ओमान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील पहिालाच सामना होता. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ओमानचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. पहिल्या डावात गोलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. त्यामुळे ओमानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ओमानने दिलेल्या १०३ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने ८ गडी राखून विजय मिळवला आणि स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी १०४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मारुमणीने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ३० धावा जोडल्या. यादरम्यान ब्रायन बेनेटने ३६ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. तर तादिवानाशे मारुमणीने ११ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. शेवटी ब्रेंडन टेलर ३० चेंडूत ३१ धावांची खेळी करून रिटायर्ड हर्ट झाला. तर कर्णधार सिकंदर रझाने नाबाद ५ धावा केल्या. यासह झिम्बाब्वेने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल झिम्बाब्वेच्या बाजूने लागला. झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून ओमानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पण ओमानचा संपूर्ण डाव १९.५ षटकात अवघ्या १०३ धावांवर आटोपला. ओमानकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाजांना हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. आमीर कलीम ५ तर कर्णधार जतिंदर सिंग देखील अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. हम्मद मिर्झा आणि करण सोनावले हे दोन्ही फलंदाज शून्यावर माघारी परतले. तर वसिम अलीने अवघ्या ३ धावा केल्या. शेवटी फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. यष्टीरक्षक फलंदाज विनायक शुक्लाने सर्वाधिक २८ तर सुफयान मेहमुदने २५ धावांची खेळी केली. शेवटी नदीम खानने २० धावांची खेळी केली. पण ओमानचा संपूर्ण डाव १९.५ षटकात १०३ धावांवर आटोपला.
ब्रायन बेनेटने घेतला भन्नाट कॅच
या सामन्यात ब्रायन बेनेट तुफान चर्चेत राहिला. या सामन्यातील पहिल्या डावात झिम्बाब्वेची गोलंदाजी सुरू असताना ब्रायन बेनेटने डावातील शेवटच्या चेंडूवर सीमारेषेवर डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतला. हा या स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे. पहिल्या डावात क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत राहिलेल्या बेनेटने दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना नाबाद ४८ धावांची खेळी केली.

