फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. झिम्बाब्वेने कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवलं. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोश इंगलिस ८ धावा करून तंबूत परतला. मुझाराबानीने त्याला बाद केलं. कॅमेरुन ग्रीनला इव्हान्सने बाद केलं. तो भोपळाही फोडू शकला नाही. मुझाराबानीच्या उसळत्या चेंडूवर टीम डेव्हिड भोपळाही न फोडता तंबूत परतला. इव्हान्सने कर्णधार हेडला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था २९/४ अशी केली. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी पाचव्या विकेटसाठी ५९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल सामना जिंकून देणार असं चित्र असताना बर्लच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. दुखापतीमुळे गोलंदाजी अर्धवट सोडलेला मार्कस स्टॉइनस फलंदाजीला आला. चौकारासह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र मासाकाटझाने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. स्टॉइनसने ६ धावा केल्या. बेन ड्वाशियॉसने लगावलेल्या फटक्याचं मुनयोंगाने अफलातून झेलात रुपांतर केलं.
रेनशॉकडे सूत्रं होती. धावगतीचं आव्हान १५पल्याड गेल्यामुळे रेनशॉने धोका पत्करला. मात्र तो रायन बर्लच्या हातात जाऊन विसावला. रेनशॉने ४४ चेंडूत ६५ धावांची खेळी साकारली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. रेनशॉ बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. झिम्बाब्वेतर्फे ब्लेसिंग मुझाराबानीने ४ तर ब्रॅड इव्हान्सने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं.
झिम्बाब्वेने ब्रायन बेनेटच्या अर्धशतकाच्या बळावर १६९ धावांची मजल मारली. बेनेट आणि ताडिवानाशे मारुमानी यांनी ६१ धावांची सलामी दिली. स्टॉइनसने मारुमानीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३५ धावा केल्या. रायन बर्लने बेनेटला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. बर्लला ग्रीनने बाद केलं. त्यानेही ३५ धावा केल्या. यानंतर बेनेटला सिकंदर रझाची साथ मिळाली. या जोडीने २४ चेंडूत ३८ धावा कुटल्या. बेनेटने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. बेनेटने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत खेळी केली मात्र २० षटकं खेळूनही त्याच्या नावावर अर्धशतकच असल्याने स्ट्राईकवरून टीकाही झाली. त्याने ११४च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतीमुळे या लढतीतही खेळू शकला नाही. ट्रॅव्हिस हेडकडे संघाचं नेतृत्व होतं. पर्यायी बदली खेळाडू म्हणून स्टीव्हन स्मिथला पाचारण करण्यात आलं आहे. मात्र तो अद्याप कोलंबोत पोहोचलेला नाही असं हेडने नाणेफेकीवेळी स्पष्ट केलं. सामन्यादरम्यान पहिल्या डावात स्टॉइनसही दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत भर पडली. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड हे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकले नाहीत.
दुसरीकडे झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझालाही क्रॅम्पसचा त्रास जाणवला. कोलंबोतलं वातावरण उष्ण आणि दमट असल्यामुळे खेळाडूंना त्रास जाणवला. भारतीय संघाला सलामीच्या लढतीत अमेरिकेने चांगलंच झुंजवलं होतं. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात नेपाळने इंग्लंडला चांगलंच तंगवलं. इंग्लंडने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला होता. आयर्लंडकडे श्रीलंकेला नमवण्याची संधी होती मात्र त्यांनी ती गमावली. झिम्बाब्वेने सगळ्या आघाड्यांवर दर्जेदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला निरुत्तर केलं.
या विजयासह ब गटाची गुणतालिका रंजक झाली आहे. श्रीलंकेने दोन लढतीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला मात्र झिम्बाब्वेविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. झिम्बाब्वेने दोन सामने खेळून दोन्ही जिंकले आहेत. त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते दुसऱ्या स्थानी आहेत. झिम्बाब्वेने आणखी एक विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो. नियमांनुसार, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बादफेरीसाठी पात्र ठरतील.
पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्येही मिळवला होता विजय
२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं होतं. त्या लढतीत ऑस्ट्रेलियाने १३८ धावा केल्या होत्या. अँड्यू सायमंड्सने ३३ तर ब्रॅड हॉजने ३५ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेतर्फे एल्टन चिगंबुराने ३ तर गॅरी ब्रेंटने २ विकेट्स घेतल्या होत्या. ब्रेंडन टेलरच्या ६० धावांच्या बळावर झिम्बाब्वेने ५ विकेट्स राखून हे लक्ष्य गाठलं. व्हुसीमुसी सिंबादाने २३ तर हॅमिल्टन मासाकाटझाने २७ धावा करत ब्रेंडन टेलरला चांगली साथ दिली होती. त्यानंतर १९ वर्षांनंतर झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवलं आहे.
वनडेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला केलं आहे चीतपट
झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती

