Zimbabwe vs Australia 1st ODI: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना हरारेच्या मैदानावर सुरू आहे.या सामन्यात असं काही घडलं, जे याआधी क्रिकेट इतिहासात कधीच घडलं नव्हतं. झिम्बाब्वे या सामन्यासाठी जेव्हा प्लेईंग ११ ची घोषणा केली, त्यावेळी प्लेईंग ११ मध्ये ३ खेळाडू असे होते, जे ४० हून अधिक वयाचे होते. यासह झिम्बाब्वेने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच कुठल्याही आयसीसीच्या फुल मेंबर नेशन्सने प्लेईंग ११ मध्ये ३ अशा खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यांचं वय ४० हून अधिक आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने क्रेग इरविन (४१ वर्ष २७ दिवस), ब्रेंडन टेलर (४० वर्ष २२१ दिवस) आणि सिकंदर रझा (४० वर्ष १४४ दिवस) या ३ वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं ही कुठल्याही क्रिकेटपटूसाठी मोठी गोष्ट असते. कारण या वयात क्रिकेटपटू सहसा निवृत्ती जाहीर करतात. पण झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी दाखवून दिलं आहे की, वय फक्त आकडा आहे. सिकंदर रझा आणखी काही वर्ष देशाचं प्रतिनिधित्व करू शकतो.

ब्रेंडन टेलरने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

या सामन्यात झिम्बाब्वेचा सर्वात अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलरने भारताचा अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकीच एक रेकॉर्ड म्हणजे, सर्वात जास्त वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा रेकॉर्ड. सचिनने २२ वर्षे आणि ३ महिने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. तर ब्रेंडन टेलरने २२ वर्षे आणि महिने झिम्बाब्वे संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो अजूनही झिम्बाब्वेसाठी खेळत आहे. त्यामुळे देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळ क्रिकेट खेळण्याचा रेकॉर्ड आता ब्रेंडन टेलरच्या नावे नोंदवला गेला आहे.

ऑस्ट्रेलियाने केल्या २९४ धावा

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांअखेर ८ गडी बाद २९४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मॅट रेनशॉने सर्वाधिक १०९ धावांची खेळी केली. तर कुपर कॉनोलीने ५१ आणि मिचेल मार्शने ३६ धावांची खेळी केली.