ऑस्ट्रेलियाला धूळ चारून झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकपच्या सुपर८ फेरीत दिमाखात प्रवेश केला. मंगळवारी झिम्बाब्वे-आयर्लंड लढत पावसामुळे रद्द झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या घरी जाण्यावर शिक्कामोर्तब झालं. झिम्बाब्वेने दमदार सांघिक खेळ करत ऑस्ट्रेलियाला नमवलं. पण हेच सातत्य त्यांना पुढच्या फेरीत राखता येईल का? याविषयी साशंकता आहे. झिम्बाब्वे आल्यामुळे स्पर्धा कमकुवत झाली आहे. झिम्बाब्वेच्या संघाकडे गतवैभव नक्कीच आहे पण हा संघ सुपर८चं आव्हान पार करून सेमी फायनल गाठणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया नसल्यामुळे भारतीय संघाने हुश्श केलं असणार. वेस्ट इंडिजनेही सुटकेचा निश्वास टाकला असेल. दक्षिण आफ्रिकेसाठीही मोठा अडथळा पार झाला आहे. हे खरं असलं तरी ऑस्ट्रेलिया नसल्यामुळे एकूण स्पर्धेमधलं आव्हानही तुलनेनं सोपं झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पुनरागमनसाठी ओळखला जातो. सामना गेला असं वाटत असतानाच ते परत येतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना म्हणजे अटीतटीची झुंज आणि दर्जेदार खेळाची पर्वणी असते. आता ते असेलच असं नाही.
टी२० वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेचा इतिहास पाहिला तर त्यांनी केवळ एकदा सुपर१२ म्हणजेच बाद फेरी गाठली आहे. पाचवेळा त्यांचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं होतं. २००९ मध्ये झिम्बाब्वेने स्पर्धेतून माघार घेतली होती. २०२१ मध्ये त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. २०२४ मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी ते पात्रही ठरू शकले नव्हते. इतकी सर्वसाधारण कामगिरी असणारा झिमाब्ब्वेचा संघ सुपर८ फेरीत पोहोचला आहे.
भारत, वेस्ट इंडिज, आफ्रिका यांच्याबरोबर झिम्बाब्वेचा संघ आहे. भारत आणि झिमाब्ब्वे यांच्यात १३ टी२० सामने झाले आहेत. यापैकी १० मध्ये भारताने विजय मिळवला आहे तर ३ मध्ये झिम्बाब्वेने. वेस्ट इंडिज- झिम्बाब्वे ४ मुकाबल्यात वेस्ट इंडिजची कामगिरी ३-१ अशी आहे. आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात ८ लढती झाल्या आहेत. यामध्ये आफ्रिकेची आकडेवारी ७-० अशी आहे. एक सामना रद्द झाला आहे. या पार्श्वभूमीवर झिमाब्ब्वेचं असणं बाकी संघांसाठी सोयीचं आहे पण एकूण दर्जा कमी आणि सामने एकतर्फी राहण्याचीच चिन्हं आहे.
वनडे वर्ल्डकपमध्येही झिम्बाब्वेची कामगिरी उल्लेखनीय अशी नाही. १९७५ आणि १९७९ वर्ल्डकपसाठी ते पात्र ठरले नव्हते. १९८३, १९८७, १९९२, १९९६ अशा सलग चार स्पर्धांमध्ये त्यांनी प्राथमिक फेरीतून गाशा गुंडाळला. १९९९ आणि २००३ मध्ये त्यांनी सुपर सिक्सेस फेरी गाठली. २००७, २०११, २०१५ अशा तीन स्पर्धा ते प्राथमिक फेरीतूनच घरी परतले. २०१९ आणि २०२३ या दोन वर्ल्डकपसाठी झिम्बाब्वेचा संघ पात्रही होऊ शकला नाही. २०२७ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचे सहयजमान असल्यामुळे ते पात्र ठरले आहेत.
दुसरीकडे २००९ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ टी२० वर्ल्डकपच्या प्राथमिक फेरीतच बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर वनडे वर्ल्डकपची सहा जेतेपदं आहेत. टी२० वर्ल्डकपचं एक जेतेपद खात्यावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी करंडक दोन वेळा पटकावला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं एक जेतेपद त्यांच्याकडे आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी अचंबित करणारी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची घरवापसी स्पर्धेचा एकूण दर्जा खालावणारी आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

