Brian Bennett Catch Video: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ८ वा सामना झिम्बाब्वे आणि ओमान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ओमानला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. ओमानचा संघ अवघ्या १०३ धावांवर ऑलआऊट झाला. पहिल्या डावात गोलंदाजी करत असलेल्या झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि ओमानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. त्यामुळे ओमानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना ब्रायन बेनेटने डाईव्ह मारून अविश्वसनीय कॅच घेतला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, ओमाानची फलंदाजी सुरू असताना झिम्बाब्वेकडून २० वे षटक टाकण्यासाठी ब्रॅड एवन्स गोलंदाजीला आला. त्यावेळी ओमानचा फलंदाज नदीन खान स्ट्राईकवर होता. त्यावेळी षटकातील पाचवा चेंडू एवन्सने बाहेरच्या दिशेने स्लोव्हर टाकला. या चेंडूवर नदीम खानने स्टेप आऊट होऊन मोठा फटका मारला. चेंडू उंच हवेत गेला, पण हवा तितका लांब गेला नाही. त्यामुळे झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ब्रायन बेनेटने धावत येऊन हवेत झेप घेतली आणि डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतला. हा या स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे.

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ओमानचा संपूर्ण डाव १९.५ षटकात अवघ्या १०३ धावांवर आटोपला. ओमानकडून फलंदाजीला आलेल्या सलामीवीर फलंदाजांना हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. आमीर कलीम ५ तर कर्णधार जतिंदर सिंग देखील अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. हम्मद मिर्झा आणि करण सोनावले हे दोन्ही फलंदाज शून्यावर माघारी परतले. तर वसिम अलीने अवघ्या ३ धावा केल्या. शेवटी फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. यष्टीरक्षक फलंदाज विनायक शुक्लाने सर्वाधिक २८ तर सुफयान मेहमुदने २५ धावांची खेळी केली. शेवटी नदीम खानने २० धावांची खेळी केली. पण ओमानचा संपूर्ण डाव १९.५ षटकात १०३ धावांवर आटोपला.

झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी १०४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मारुमणीने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ३० धावा जोडल्या. यादरम्यान तादिवानाशे मारुमणीने ११ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. तर ब्रायन बेनेटने ३६ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. शेवटी ब्रेंडन टेलर ३० चेंडूत ३१ धावांची खेळी करून रिटायर्ड हर्ट झाला. तर कर्णधार सिकंदर रझाने नाबाद ५ धावा केल्या. यासह झिम्बाब्वेने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.