झिम्बाब्वे संघाची रया गेल्यापासून भारतीय संघ या दौऱ्याचा उपयोग अनेक नव्या खेळाडूंना पदार्पण देण्यासाठी करत आहे. झिम्बाब्वे दौरा म्हणजे घाऊक पदार्पणं असंच समीकरण झालं आहे. टी२० क्रिकेटमध्ये स्वत:च्या नावाचा दबदबा करणारे असंख्य भारतीय खेळाडूंनी झिम्बाब्वेत पदार्पण केलं आहे. या महिन्यात पुन्हा एकदा भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात प्रभसिमरन सिंग, हर्ष दुबे, अशोक शर्मा, यश ठाकूर यांचं टी२० पदार्पण होऊ शकतं. प्रभसिमरन सिंगने यंदाच्या आयपीएल हंगामात खोऱ्याने धावा केल्या. हर्ष दुबे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. अशोक शर्माने आपल्या वेगाने सगळ्यांना प्रभावित केलं आहे.
भारतीय संघाचं रनमशीन विराट कोहलीचं टी२० पदार्पण अशाच एका झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान झालं. आपल्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारे रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्या टी२० कारकिर्दीची सुरुवात हरारे स्पोर्ट्स क्लब इथूनच झाली. भारतीय संघाचा तिन्ही प्रकारातला भरवशाचा फलंदाज केएल राहुलने आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात झिम्बाब्वे दौऱ्यातूनच केली. राहुलने पर्दापणाच्या लढतीतच शतकी खेळी साकारण्याचा विक्रम नावावर केला. २०२६ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत मालिकावीराचा मानकरी ठरलेल्या संजूने टी२० प्रकारात झिम्बाब्वेतच पहिलं पाऊल ठेवलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणारा डावखुरा शैलीदार फलंदाज फैझ फझलला झिम्बाब्वे दौऱ्यातच भारतासाठी खेळायची संधी मिळाली. फझलने अर्धशतकासह चांगली सुरुवात केली मात्र प्रमुख खेळाडू संघात परतल्यानंतर फझलला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही.
भारतीय संघाचा तारणहार अक्षर पटेलची सुरुवातही हरारेतूनच झाली आहे. मुंबईकर धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांचं भारतासाठी खेळायचं स्वप्न याच भूमीत पूर्ण झालं. कसोटीत टीम इंडियाची नवी वॉल असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने वनडेत मापटं ओलांडलं ते झिमाब्ब्वे दौऱ्यातच. दुर्देवाने चेतेश्वरला वनडे संघात फारशी संधीच मिळाली नाही. भारतीय संघात पुन्हा संधी मिळावी यासाठी परमेश्वराकडे धावा करणाऱ्या करुण नायरला पहिली संधी झिम्बाब्वे दौऱ्याद्वारेच मिळाली होती. कारकिर्दीत असंख्य दुखापतींचा सामना करत छाप उमटवण्याचं काम आशिष नेहराने केलं. निवृत्त झाल्यानंतर देशी स्टाईलचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला. नेहराच्या वनडे आणि कसोटी अशा दोन्ही कारकिर्दीची सुरुवात झिम्बाब्वेमध्येच झाली.
२०१६ मध्ये झिमाब्ब्वे दौऱ्यात भारतीय संघव्यवस्थापनाने पंजाबच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला पदार्पण देण्याचा निर्णय घेतला. त्याचं नाव होतं बरिंदर स्राण. बरिंदरने ४ षटकात अवघ्या १० धावा देत ४ विकेट्स पटकावण्याची किमया केली. बरिंदरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पदार्पणाच्या लढतीतच सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये बरिंदरचं नाव सामील झालं. दुर्देवाने बरिंदरला नंतर फार संधी मिळाल्या नाहीत.
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड चुरस असते. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ३८ संघ खेळतात. प्रत्येक संघात किमान १५ ते २० खेळाडू. या सगळ्यांमधून १५ सदस्यीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्कृष्ट फिटनेस, सातत्यपूर्ण कामगिरी आणि नशीबही लागतं. नव्वदीच्या दशकात झिम्बाब्वेचा संघ तुल्यबळ होता. झिम्बाब्वेचा तो संघ भारतात येऊन भारताला टक्कर देत असे. बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे झिम्बाब्वे संघाची रयाच गेली. यामुळे झिम्बाब्वे दौऱ्याचा उपयोग नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी होऊ लागला. इंडिया ए तसंच उदयोन्मुख संघांचा नियमित भाग असलेले, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या दौऱ्याच्या माध्यमातून संधी मिळू लागली. प्रमुख खेळाडू संघात असताना या खेळाडूंना राखीवमध्येच बसावं लागतं. झिम्बाब्वे दौऱ्याच्या निमित्ताने या मंडळींचं भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न साकार होऊ लागलं.
झिम्बाब्वेत पदार्पण करणारे भारतीय खेळाडू
टेस्ट-हेमांग बदानी, रॉबिन सिंग, अजित आगरकर
वनडे- केएल राहुल, मनीष पांडे, अंबाती रायुडू, फैझ फझल, रवीचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, दोड्डा गणेश, पंकज सिंग, नमन ओझा, आशिष नेहरा, आरपी सिंग, अशोक दिंडा, उमेश यादव, आर.विनय कुमार, जयदेव उनाडकत, मोहित शर्मा, युझवेंद्र चहल
टी२०-मनदीप सिंग, विराट कोहली, मनीष पांडे, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, केदार जाधव, ध्रुव जुरेल, नमन ओझा, रियान पराग, ऋषी धवन, केएल राहुल, अभिषेक शर्मा, रवीचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, अक्षर पटेल, संदीप शर्मा, जयदेव उनाडकत, युझवेंद्र चहल, बरिंदर स्राण, साई सुदर्शन, तुषार देशपांडे
