दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरण जगासमोर आणण्यात एका कॅमेरामनचा हात खूप मोठा होता. हा कॅमेरामन म्हणजे झोटनी ऑस्कर. जी गोष्ट पंचांनाही लक्षात आली नाही ती ऑस्करच्या कॅमेरानं टिपली आणि ऑस्ट्रेलियन खेळांडूचा रडीचा डाव जगासमोर आणून त्यांनी क्रिकेटच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्याय मिळवून दिला.

हे प्रकरण उजेडात आणल्यावर त्यांनी श्रेय घ्यायला मात्र नकार दिला त्यामुळे ऑस्करचं नाव अंधारात होतं. ऑस्कर सूपर स्पोर्टसाठी काम करतात. ‘मी कॅमेरामन आहे आणि मी माझं कर्तव्य बजावत होतो. त्यावेळी तिथे जे घडलं त्याविषयी बोलण्याची परवानगी मला नाही’ असं ऑस्कर ‘द सँडर्ड’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा रडीचा डाव उघड केल्यानंतर ऑस्करला दक्षिण आफ्रिकन क्रिकेट प्रेमींनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. विरेंद्र सेहवाग यांनी देखील ट्विट करत ऑस्कर यांचं कौतुक केलं आहे. ऑस्करच्या कॅमेरातून एखादी गोष्ट चुकणं अशक्य आहे अशा शब्दात सेहवागनं ट्विटरवर त्यांचं कौतुक केलं आहे.

दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरून बेनक्राफ्टने एका पिवळसर वस्तूला घासून चेंडू कुरतडला. त्यानंतर हा तुकडा त्याने पँटच्या आत दडवला. पंचाना शंका आल्यावर त्यांनी बेनक्राफ्टला बोलावून प्रश्न विचारले. त्यानं मात्र काहीच झालं नसल्याचा आव आणत खिशातून दुसरी कापडी वस्तू काढून दाखवली. ही बाब पंचांनी मान्य केली असली तरी ऑस्करच्या कॅमेरातून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांनी ही बाब जगाला दाखवून दिली. या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने बॉल टॅम्परिंग ही आमची रणनीतीच होती असे मान्य केले. दरम्यान या प्रकरणावरून स्टीव्ह स्मिथनं राजस्थान रॉयल्स या संघाचा राजीनामाही दिला आहे.