माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने क्लासिकल प्रकारात पहिल्या विजयाची नोंद करताना इस्रायलच्या बोरिस गेल्फंडचा पराभव केला. झुरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धेच्या चौथ्या फेरीत आनंदने विजय मिळवून संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये दोन पराभव आणि एक बरोबरी पत्करणाऱ्या आनंदसाठी हा विजय आत्मविश्वास उंचावणारा ठरणार आहे. सोमवारी खेळवण्यात आलेले तिन्ही सामने चुरशीचे झाले आणि सर्व सामन्यांचे निकाल लागले. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने इटलीच्या फॅबिआनो कारुआनावर विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा काढला. अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियन याने यंत्राप्रमाणे खेळ करत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला हरवले. कार्लसनने चार डावांत तीन विजय मिळवत आपली गुणसंख्या सातवर नेली आहे. सर्वोत्तम तांत्रिक खेळ करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कार्लसनने मिळालेल्या संधींचा फायदा उठवत कारुआनाला पराभूत केले. अरोनियनने सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. आनंद, कारुआना आणि नाकामुरा तीन गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्फंडने दोन गुणांसह शेवटचे सहावे स्थान प्राप्त केले आहे. या स्पर्धेतील क्लासिक प्रकारातील एक फेरी आणि जलद प्रकारातील पाच फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत.
आनंदने पुन्हा एकदा स्लाव्ह बचाव पद्धतीचा उपयोग करत डावाला सुरुवात केली. सुरुवातीला दोघांनीही कॅसलिंग केले. त्यानंतर ठरावीक अंतराने एकमेकांचे मोहरे टिपत दोघांनाही लढत जिंकण्याची समान संधी होती. पण गेल्फंडने केलेली चूक त्याला चांगलीच भोवली. अखेर ३६व्या चालीनंतर त्याने आपला पराभव मान्य केला. क्लासिकल प्रकारातील अखेरच्या डावात आनंदची गाठ कार्लसनशी पडणार आहे. या डावात विश्वविजेतेपदाच्या लढतीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आनंद उत्सुक आहे.