ट्वेन्टी-२० मालिकेत सपाटून मार खाल्ल्यामुळे त्यातील विश्वचषक मिळवण्याच्या स्वप्नावर आता प्रश्नचिन्ह लागले आहे. शिवाय सलग पराभवांमुळे धोनी हटाव मोहीमही सुरू झाली आहे.

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात खेळताना बुद्धीचा फार वापर करण्याची आवश्यकता नसते. प्रेक्षकांनी गंमत म्हणून बाटल्या फेकल्या. अजिंक्य रहाणेने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी, खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना अडचणी येतात.. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनेक वक्तव्यांचे चर्वितचर्वण सध्या क्रिकेटवर्तुळात होत आहे. ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने सपाटून मार खाल्ला आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात धोनीचे ‘द ग्रेट फिनिशर’ हे बिरुदसुद्धा संपुष्टात आल्याची ग्वाही मिळत आहे. त्यामुळेच ‘धोनी हटाव’ मोहिमेला बळ मिळत आहे. परंतु धोनीनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व कुणाकडे द्यायचे, हे उत्तर तरी कुठे स्पष्ट होते आहे. विराट कोहलीचे नाव अग्रेसर असले तरी तोसुद्धा सध्या धावांसाठी झगडतानाच दिसतो आहे.

भारतीय संघ कोणत्याही देशाविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत एखादा ट्वेन्टी-२० सामना खेळताना दिसायचा. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा विचार करून यंदाच्या वर्षांत या प्रकारातील सामन्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र कटकला प्रेक्षकांनी आणि कोलकाता येथे यंत्रणेने भारताची योजना हाणून पाडण्याची पुरती व्यवस्था केली होती. त्यापैकी सुदैवाने कटकचा सामना पूर्ण होऊ शकला.

भारताने ट्वेन्टी-२० मालिका गमावण्याची कारणमीमांसा करताना आयपीएल हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय वातावरणात ट्वेन्टी-२० सामने खेळण्याचा उत्तम सराव आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील बहुतांश खेळाडू आयपीएलमधील विविध संघांशी करारबद्ध आहेत. दक्षिण आफ्रिकेचा ट्वेन्टी-२० कर्णधार फॅफ डू प्लेसिस जो आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्याच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. याचाही फायदा प्लेसिसला झाला. नाणेफेकीचा कौल मिळवण्यात धोनी ‘माही’र मानला जायचा. पण पहिल्या दोन्ही सामन्यांत प्लेसिसचे नशीब वरचढ ठरले. त्यामुळे दोन्ही सामन्यांत भारताला दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करावी लागली. दवाचा फटका अर्थात भारतालाच बसला.

पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने या स्पध्रेसाठी भारतात बरीच तयारी करावी लागणार आहे, असे संकेत दिले आहेत. २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेली पहिली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकण्याची किमया साधली होती. बांगलादेशमध्ये झालेल्या मागील विश्वचषक स्पध्रेत भारताने उपविजेतेपद पटकावले होते. मात्र विजेतेपद न मिळवू शकणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र संभाव्य विजेत्याप्रमाणे आकार घेतो आहे.

कर्णधार अपयशाचा धनी नेहमीच होतो. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या धोनीला संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयश आले. स्वाभाविकपणे विश्वचषक, ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक जिंकणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. ३४ वर्षीय धोनीने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती पत्करली आहे. धोनी म्हणजे भूतकाळ आहे. त्याचे नेतृत्व, नाणेफेक आणि कौशल्य आता सारे काही हरपले आहे. संघ संचालक रवी शास्त्री आपला हुकमी एक्का विराट कोहलीला घेऊन नव्या योजना आखण्यास उत्सुक आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत धोनीचे नेतृत्व डावावर असेल. टीकाकारांची आणि धोनीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्तीची आशाळभूतपणे वाट पाहणाऱ्यांची तोंडे बंद करण्याची संधी त्याला असेल.

ट्वेन्टी-२० मालिकेची पहिली लढाई दक्षिण आफ्रिकेने वेगवान माऱ्याच्या बळावर जिंकली, मात्र भारताने फिरकीवर भरवसा ठेवून गमावली, असे म्हटल्यास अजिबात चुकीचे ठरणार नाही. भारताची ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनवर प्रमुख मदार होती. पण दक्षिण आफ्रिकेने डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्केल ही वेगवान मारा करणारी प्रमुख अस्त्रे न वापरताही त्यांना यश मिळाले.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ३० चेंडूंत ६६ धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ दडपणाखाली जाणवत होता. भारत जिंकणार, हे जवळपास निश्चित झाले होते. अशा आश्वासक स्थितीत धोनीने १६व्या षटकासाठी चेंडू अक्षर पटेलकडे दिला. भारतात आयपीएल खेळण्याचा कसून सराव असलेल्या जीन-पॉल डय़ुमिनीने अक्षरला तीन सलग षटकार ठोकले. या षटकात २२ धावा निघाल्यामुळे सामन्याचे चित्रच पालटले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची अक्षरे उमटली. डय़ुमिनीसारखा डावखुरा फलंदाज मैदानावर असताना डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाकडे चेंडू देण्याचा धोनीचा निर्णय चुकला. यातून भारताने धडा घेण्याची आवश्यकता आहे. ‘‘या सामन्यात फलंदाजांचेच युद्ध अपेक्षित होते. त्यामुळे जो संघ अधिक चांगले फटके खेळेल, तो जिंकणार आणि गोलंदाजांवर दडपण येणे स्वाभाविक होते. एखादा चेंडू सीमापार धाडल्यानंतर पुढील चेंडू तुम्ही कसा टाकता, हे महत्त्वाचे असते. सलग तीन चेंडूंवर चौकार किंवा षटकार कसे काय मारले जातात, की ज्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना बऱ्याच धावा सहज काढता येऊ शकतात,’’ असे धोनीने सामन्यानंतर सांगितले.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दुसऱ्या सत्रात दवामुळे भारतीय गोलंदाजांना परिस्थिती आव्हानात्मक असताना वादग्रस्त निर्णयाचाही फटका बसला. डय़ुमिनी ३३ धावांवर असताना त्याला मिळालेले जीवदान भारतासाठी महागात पडले. याच डय़ुमिनीने मग नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. धोनीने पंचांच्या निर्णयाबाबतही आपली नाराजी प्रकट केली.

भारताने दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांत पाच गोलंदाज वापरले. पहिल्या सामन्यात भारताने भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, पदार्पणवीर श्रीनाथ अरविंद या वेगवान आणि अश्विन, अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांवर विश्वास ठेवला. तर दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर, मोहित या वेगवान तसेच अश्विन, हरभजन आणि अक्षर या फिरकी गोलंदाजांवर भरवसा ठेवला. अखेरच्या षटकांमध्ये सक्षमपणे गोलंदाजी करू शकेल, अशा गोलंदाजाची संघात वानवा आहे.

अखेरच्या षटकांमध्ये समर्थपणे फलंदाजी करण्यातही भारतीय संघ अपयशी ठरतो. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फलंदाजीच्या बळावर भारताने १५ षटकांत १०.५३च्या सरासरीने १ बाद १५८ धावा केल्या. त्या वेळी भारतीय संघ दोनशे धावांचा टप्पा सहज पार करेल, अशी लक्षणे दिसत होती. मात्र शेवटच्या पाच षटकांत भारताला जेमतेम ४१ धावा काढता आल्या आणि चार फलंदाज गमावले. त्यामुळे ५ बाद १९९ अशी धावसंख्या उभारता आली. मात्र दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या पाच षटकांमध्येच सामन्याला कलाटणी दिली.

तूर्तास, ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे स्वप्न पाहणारा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साफ नापास झाला आहे. यातून धडे घेऊन भविष्याची मोट बांधली, तरच या महत्त्वाच्या स्पध्रेत प्रभावी संघ म्हणून भारताकडे पाहता येऊ शकेल. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने धोनीच्या संघातील स्थानाबाबतच प्रश्न उपस्थित करून सर्वानाच या विषयाकडे गांभीर्याने पाहायला लावले आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत धोनीचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांची ‘कसोटी’ लागणार आहे.

बॉटलफेकीची गंभीर ‘गंमत’

कटकच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारत हरणार, हे स्पष्ट झाल्यावर प्रेक्षकांनी बॉटलफेक करून सामन्यात व्यत्यय आणला. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल स्टेडियममध्ये आणण्यास मनाई असते, तरीसुद्धा या घडलेल्या घटनेमुळे सारेच जण हवालदिल झाले. तासभर चाललेल्या या बॉटलफेकीनंतर उर्वरित सामना खेळवण्यात आला. भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी कटकवर दोन वर्षांची बंदी घालण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सने विजय मिळवल्यानंतर असाच एक प्रकार वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाला होता. मुंबई इंडियन्स दरवर्षी तळागाळातल्या मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम म्हणून एक सामना पाहायची संधी या मुलांना देते. परंतु सामन्यानंतर या मुलांनी पाण्याच्या ग्लासेसचा मैदानावर वर्षांव केला. सीमारेषेनजीकच्या छायाचित्रकार आणि चीअरगर्ल्सनाही त्यांनी लक्ष्य बनवले. जवळपास १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. या अनपेक्षित प्रकाराने सुरक्षाव्यवस्थेचीही तारांबळ उडाली.

या घटनेची धोनीने अगदी नेमक्या शब्दांत मीमांसा केली. तो म्हणाला, ‘‘पहिल्या काही बाटल्या या गांभीर्याने विचारपूर्वक फेकलेल्या असतात, त्यानंतरच्या बाटल्या प्रेक्षक गंमत म्हणून फेकतात. त्यामुळे अशा गोष्टी गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही. विशाखापट्टणम्चा सामना आम्ही जिंकलो होतो, तेव्हासुद्धा बऱ्याच बाटल्या प्रेक्षकांनी फेकल्या होत्या, ती घटना मला आठवते. पहिल्या बाटलीने या गोष्टीला प्रारंभ होतो आणि नंतर प्रेक्षक याकडे अधिक गमतीने पाहू लागतात.’’

या प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परदेशात क्रिकेटरसिकांसाठीच्या बैठकव्यवस्थेपुढे सीमारेषेनजीक जाळ्यांचे कुंपण नसते. मात्र तरीही तिथे असे कोणतेही गैरप्रकार पाहायला मिळत नाहीत. भारतीय चाहत्यांची मानसिकता हीच या घटनेला प्रमुख जबाबदार आहे.

ओलसर मैदानाने आणली जाग

कोलकाताचे ईडन गार्डन्स हे भारतातले पहिल्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम मानले जाते. अनेक ऐतिहासिक सामन्यांचे यजमानपद भूषवण्याचा मान या मैदानाला मिळाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरीसुद्धा याच मैदानावर होणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रद्द करावा लागल्यामुळे ईडन गार्डन्सच नव्हे, तर भारतातील सर्व स्टेडियमबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. कोलकाता शहरात दुपारी पाऊस पडला, त्यामुळे मैदान ओलसर झाले. सामन्याची वेळ ओलांडली तरी ते सुकवण्यात यंत्रसामुग्री अपयशी ठरली. इतक्या कमी पावसाचा फटका सामन्याला बसू शकतो, हे वास्तव समोर आले आहे. याचप्रमाणे भविष्याचा विचार करून अन्य देशांमध्ये वापरली जाणारी यंत्रणा राबवण्याची आवश्यकता आहे.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com