दीपिका कुमारी आणि मंगल सिंग चाम्पिआ यांनी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पध्रेत अनुक्रमे महिला व पुरुष वैयक्तिक रिकव्‍‌र्ह गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
पात्रता फेरीत निराशाजनक कामगिरी करून १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या दीपिकाने ब्रिटनच्या अ‍ॅमी ऑलिव्हर आणि स्पेनच्या अ‍ॅलिसीआ मरिनवर ६-० असा विजय साजरा करून अंतिम १६ जणींमध्ये स्थान पक्के केले. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दीपिकासमोर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या आणि तिसऱ्या मानांकित कोरियाच्या चोई मिसून हिचे आव्हान आहे.
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या चाम्पिआने अटीतटीच्या लढतीत स्थानिक खेळाडू बर्नाडो ऑलिव्हेराचा ६-४ असा, तर इटलीच्या मिचेल फ्रागिलीचा ६-५ असा पराभव केला. पुढच्या फेरीत चाम्पिआला अव्वल मानांकित आणि आशियाई स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या वूजीन याचा सामना करावा लागणार आहे.