News Flash

लिस्टरची फिनिक्सभरारी

१३२ वर्षांचा इतिहास असलेल्या लिस्टर सिटीने पहिल्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले होते.

लिस्टर सिटीने पहिल्यांदाच इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर जो प्रेमाचा वर्षांव केला तो भारतीय क्रिकेटरसिकांचे क्रिकेटवेड फिके वाटेल असा होता.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने विजयी षटकार खेचून भारताला २०११चा विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर स्टेडियमवर उपस्थितच नव्हे, तर बाहेर असलेल्या चाहत्यांनी विजयाचा केलेला बेभान जल्लोष आजही आपल्या स्मरणात आहे. गेली अनेक वष्रे क्रिकेटची अविरत सेवा करणारा आणि त्यावर प्रेम करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न याच वर्षी पूर्ण झाले. त्यात हे स्वप्न घरच्या मैदानावर पूर्ण होईल असे सचिनला स्वप्नातही वाटले नव्हते आणि म्हणूनच या जेतेपदाचा आनंद निराळाच होता. त्याच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या आनंदाश्रूंतून तो व्यक्त होत होता. इतर खेळाडूंनाही त्याचे महत्त्व माहीत होते आणि त्यांनी सचिनला खांद्यावर उचलून संपूर्ण मैदानाची प्रदक्षिणा घातली. लिस्टर शहरातील किंग्ज पॉवर स्टेडियमवरही असेच चित्र गत आठवडय़ात अनुभवायला मिळाले. १३२ वर्षांचा इतिहास असलेल्या लिस्टर सिटीने पहिल्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले होते. लाखाच्या संख्येने उपस्थित चाहते आणि स्टेडियमबाहेरही तितक्याच चाहत्यांनी घातलेला वेढा.. हे चित्र थक्क करणारे होते. भारतात ज्याप्रमाणे क्रिकेटला डोक्यावर उचलून घेतले जाते, त्याहून अधिक फुटबॉल हा येथील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याला वयाचे बंधन नाही आणि हे त्या दृश्यातून दिसत होते. आपल्या शहरातील क्लब जेतेपदाचा चषक उंचावणार, या आनंदानेच सर्व शहर नाहून गेले होते. प्रत्येक जण आपापल्या परीने या जल्लोषात सहभागी होण्यासाठी धडपडत होते. स्टेडियम व स्टेडियमबाहेरील परिसरच सोडा, तर शहरातील प्रत्येक पब, बारबाहेर हाऊसफुलची पाटी लागली होती. इतकी ही फुटबॉलवेडी माणसे.. त्यात इतक्या वर्षांनी हा आनंदाचा क्षण ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होते. इव्हर्टनविरुद्धच्या त्या सामन्यात निकाल काहीही लागला असता तरीही जेतेपदाचा चषक हा लिस्टर सिटी क्लबलाच मिळणार होता. केवळ औपचारिकता म्हणून हा सामना खेळवण्यात आला होता. मात्र घरच्या मैदानावर चाहत्यांना निराश करणार नाही, असे आश्वासन प्रशिक्षक रॅनीइरी यांनी दिले आणि ते पाळलेही. ३-१ अशा दणदणीत विजयाने लिस्टर सिटीने जेतेपदाचा चषक उंचावला. संघातील प्रत्येक खेळाडू तो चषक हातात घेण्यासाठी आतूर होता. त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद शब्दात सांगणे कठीण होते. संपूर्ण शहरात आनंदाश्रूंची लाटच आली होती.. गेल्या हंगामात स्पध्रेतून हद्दपार होण्याची नामुष्की कशीबशी टाळलेला लिस्टर क्लब ही मजल मारेल कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते.

26-lp-sportsलिस्टर..लिस्टर.. अन् लिस्टर.. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी अनेक समाजमाध्यमांवर, वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आणि वृत्तवाहिनींच्या विशेष चर्चासत्रांत केवळ याच नावाची चर्चा आहे. १८८४ साली क्लबची स्थापना झाल्यापासून म्हणजे जवळपास १३२ वर्षांतील त्यांचे हे पहिले इंग्लिश प्रीमिअर लीग जेतेपद आहे. मग त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होणे साहजिकच आहे. मँचेस्टर, चेल्सी आणि आर्सेनल या प्रमुख क्लबमध्येच आत्तापर्यंत ईपीएलचे चषक फिरत होते आणि ही मक्तेदारी मोडण्याचा पराक्रम लिस्टर सिटीने यंदा करून दाखवला. या जेतेपदातून लिस्टरने बरेच काही मिळवले आणि अनेकांना बरेच काही शिकवलेही. ईपीएलमध्ये वर्षांनुवष्रे चालत आलेल्या हुकूमशाहीला त्यांनी छेद दिला. गेल्या २० वर्षांत मँचेस्टर, चेल्सी व आर्सेनल या प्रस्थापित गटाच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे धाडस कुणालाही जमले नव्हते ते लिस्टरने दाखवले.

दोन वर्षांपूर्वी लिस्टर सिटीला ईपीएलमध्ये बढती देण्यात आली होती. गेल्या हंगामात त्यांच्यावर तर स्पध्रेतून हद्दपार होण्याची ओढवणारी नामुष्की थोडक्यात टळली. पडून पुन्हा उभे राहण्याच्या त्यांच्या निर्धाराने अनेकदा अपयशातून यश मिळवले होते, परंतु त्यावर जेतेपदाची मोहर उमटली नव्हती. यंदा ती कमीही भरून निघाली. चिकाटी, जिंकण्याची जिद्द आणि त्यासाठी लागणारे कठोर परिश्रम या सर्व बाबतीत लिस्टरचे खेळाडू वरचढ होते, परंतु त्यांच्या या वाटचालीला योग्य दिशादर्शक मिळत नव्हता. रॅनीइरी यांच्या रूपाने तो त्यांना मिळाला असे म्हणायला हरकत नाही. निगेल पिअर्सन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या लिस्टरला गेल्या हंगामात ईपीएलमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. स्पध्रेतून हद्दपार होण्याची नामुष्की त्यांनी थोडक्यात टाळली होती. इतकेच काय तर चाहत्यांची लिस्टरची ईपीएलमध्ये खेळण्याची लायकी नाही, अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला होता. त्यामुळे पिअर्सन यांना हटवून इटलीचे माजी खेळाडू आणि चेल्सीचे माजी प्रशिक्षक रॅनीइरी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे क्लबमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले. क्लबमधील खेळाडूंमध्ये बदल सुचवण्यापेक्षा आहे त्या खेळाडूंकडून शंभर टक्के कामगिरी करून घेण्याचे हे परिवर्तन होते.  २०१४-१५ च्या हंगामात तळाला असलेल्या याच संघातील खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे पहिले काम रॅनीइरी यांनी केले. संघातील प्रत्येक खेळाडूशी वैयक्तिक चर्चा करून त्याला प्रोत्साहन देण्याचे काम रॅनीइरी यांनी चोख बजावले आणि खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांच्या या विश्वासाच्या पायावर खेळाडूंनी जेतेपदाचा कळस चढवला.

अविश्वसनीय प्रवास…

८ ऑगस्ट २०१५

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील पहिल्याच लढतीत लिस्टर सिटीने ४-२ अशा फरकाने सदरलँडवर  दणदणीत विजय मिळवला. रियाद महरेझने दोन गोल केले, तर जेमी व्हर्डीने एक गोल करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ऑगस्टमध्ये लिस्टर ८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. सप्टेंबर महिन्याअखेरीस मात्र त्यांची १२ गुणांसह आठव्या स्थानावर घसरण झाली.

२४ ऑक्टोबर २०१५

पहिल्या नऊ सामन्यांत त्यांना केवळ एकच पराभव पत्करावा लागला असला तरी बचावफळीत सातत्याचा अभाव दिसत होता. त्यात सातत्य आणण्यासाठी प्रशिक्षक क्लाउडीओ रॅनीइरी यांनी एक शक्कल लढवली. प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखल्यास खेळाडूंना पिझा देण्याचे आश्वासन रॅनीइरी यांनी दिले. त्यांचे फलित पुढच्याच लढतीत मिळाले. लिस्टरने १-० असा विजय मिळवत क्रिस्टल पॅलेसला गोल करण्यापासून रोखले. त्यानंतर रॅनीइरी यांनी आपले वचन पूर्ण करत संघाला पिझा पार्टी दिली. विजयाची मालिका कायम राखत लिस्टरने (२२) तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

२१ डिसेंबर २०१५

चेल्सीवर विजय मिळवल्यानंतर आणि लिव्हरपूलकडून पराभव पत्करल्यानंतर रॅनीइरी यांनी संघाला आणखी एक पिझा पार्टी दिली. लिस्टरने अटीतटीच्या लढतीत मँचेस्टर सिटीला गोलशून्य बरोबरीत रोखले. या निकालामुळे त्यांनी गुणतालिकेत अव्वल असलेल्या आर्सेनलशी (३९) बरोबरी केली.

२० जानेवारी २०१६

एफए चषक स्पध्रेत लिस्टरला ०-२ अशा फरकाने टॉटनहम हॉटस्परकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांच्या ईपीएल जेतेपदाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला नाही. तर त्यांना एकाच स्पध्रेवर लक्ष केंद्रित करण्यात मदतच झाली. ४७ गुणांची कमाई करून त्यांनी अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील लढतीत विजयाचा आलेख चढा ठेवत त्यांनी ही पकड अधिक मजबूत केली.

२ मे २०१६

साउदम्टनवरील १-० अशा विजयाने लिस्टरने सहा सामने उर्वरित असताना सात गुणांची आघाडी घेत जेतेपदावरील दावेदारी भक्कम केली. त्यांना हा जेतेपदाचा आनंद अधिक द्विगुणित करता आला असता, परंतु मँचेस्टर युनायटेडने त्यांना १-१ अशा बरोबरीत रोखले. मात्र, २४ तासांच्या आत त्यांच्या जेतेपदावर शिक्कामार्तब झाले. चेल्सीने टॉटनहमला २-२ अशा बरोबरीत रोखले.

पुढील आव्हान…

जेतेपद मिळवण्यापेक्षा ते टिकवणे अधिक आव्हानात्मक असते. लिस्टर सिटीने १३२ वर्षांत पहिल्यांदा ईपीएलचा ताज पटकावला, परंतु पुढील हंगामात तो त्यांच्याकडेच कायम राहील याची खात्री खुद्द क्लाउडीओ रॅनीइरी यांनाही नाही. तो कायम राहण्यासाठी लिस्टरला काही आव्हानांचा सामना करावा लागेल..

प्रमुख खेळाडूंना कायम राखणे

लिस्टर सिटीच्या विजयापूर्वी जेमी व्हॅर्डी, रियाद महरेझ व नी’गोलो कँटे या खेळाडूंना कोणी ओळखतही नव्हते. मात्र आता या प्रत्येकाला आपापल्या चमूत समाविष्ट करून घेण्याकरिता इतर क्लबने कंबर कसली आहे. हवी ती किंमत मोजून त्यांना आपल्याकडे ओढण्याची चढाओढच रंगणार आहे. अशा परिस्थितीत यांना आपल्याकडेच ठेवण्याचे आव्हान लिस्टरला पेलावे लागणार आहे.

दुसरी फळी निर्माण करणे…

रॅनीइरी यांनी ईपीएलच्या संपूर्ण हंगामात संघात कोणताही बदल न करता अंतिम अकरामध्ये त्याच त्याच खेळाडूंना संधी दिली. अंतिम अकरामध्ये कोणताही बदल करण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही, परंतु चॅम्पियन्स लीगच्या अनुभवावरून त्यांनी काहीतरी शिकायला हवे. अकरा जणांवरच अवलंबून न राहता दुसरी फळीही तयार करायला हवी.

सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची

२०१४-१५च्या सत्रातील अखेरच्या नऊ सामन्यांपैकी सातमध्ये विजय मिळवून त्यांनी स्पध्रेतून हद्दपार होण्याची नामुष्की टाळली. विजयाचा हाच स्तर कायम राखत त्यांनी २०१५-१६च्या हंगामाची सुरुवात केली आणि जेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे पुढील हंगामातही सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे.

रणनीतीत बदल आवश्यक…

ईपीएलच्या संपूर्ण सत्रात रॅनीइरी यांनी प्रतिस्पर्धी संघावर एकाच रणनीतीने खेळ करून विजय मिळवला. २०१६-१७ या सत्रात मात्र प्रतिस्पर्धी त्यांच्या या डावपेचांचा अभ्यास करूनच मैदानात उतरतील. त्यामुळे त्यांना नवी रणनीती आखणे आवश्यक आहे.

खेळ आकडय़ांचा

२ –    लिस्टर सिटी यापूर्वी १९२८-२९च्या हंगामात ईपीएल जेतेपदानजीक पोहोचले होते, परंतु त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

१४ –   ईपीएलच्या यंदाच्या हंगामात लिस्टरने १४ सामन्यांत प्रतिस्पर्धी संघावर एका गोलच्या फरकाने विजय मिळवले आहेत. त्यातील सात विजय हे १-० अशा फरकाचे आहेत.

२ –    पीटर (मँचेस्टर युनायटेड) आणि कॅस्पर शेमेइशेल (लिस्टर सिटी) या बाप-लेकाने ईपीएलचे जेतेपद पटकावले आहे. अशी कामगिरी करणारी ही दुसरी वडील-मुलाची जोडी ठरली आहे. याआधी इयान राईट (आर्सेनल) आणि शॉन राईट-फिलिप (चेल्सी) यांनी ही किमया साधली.

२० –   मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, आर्सेनल आणि चेल्सी या क्लबची ईपीएलमधली मक्तेदारी २० वर्षांनंतर बाहेरील संघाने संपुष्टात आणली.

६४ –   क्लाउडीओ रॅनीइरी यांनी ६४व्या वर्षी ईपीएलचे जेतेपद पटकावले. अशी कामगिरी करणारे ते दुसरे वयस्कर प्रशिक्षक ठरले आहेत.

प्रमुख खेळाडू

जेमी व्हॅर्डी : चपळता, अचूकपणा आणि गती यांचे प्रतीक जेमी व्हॅर्डीमध्ये दिसत होते. लिस्टर सिटीच्या विजयात या आक्रमकपटूचा सिंहाचा वाटा आहे. त्याने २४ गोल करून संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. मात्र स्पध्रेचा ‘गोल्डन बुट’ या पुरस्काराने त्याला हुलकावणी दिली. परंतु सलग ११ सामन्यांत गोल करून त्याने नवा विक्रम प्रस्तापित केला.

रियाद महरेझ : २०१५-१६ हा हंगाम रियादसाठी स्वप्नवत ठरला. १७ गोल, चेल्सी आणि मँचेस्टर सिटी यांच्याविरुद्ध निर्णायक कामगिरी, स्वानसी सिटीविरुद्ध हॅट्ट्रिक आणि ११ गोल करण्यात साहाय्य. त्यामुळेच लिस्टरने विजयाचा डोलारा उभा केला. इंग्लंडचा वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवणारा तो पहिला आफ्रिकन खेळाडू ठरला.

नी’गोलो कँटे : या मध्यरक्षकाने महरेझ आणि व्हॅर्डी यांना गोल करण्यात सहकार्य करण्याबरोबर प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमणही तितक्याच ताकदीने थोपवले. दिग्गज प्रशिक्षक अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांनीही कँटेचे तोंडभरून कौतुक केले. सर्वोत्तम खेळाडूचे त्याला नामांकन मिळाले होते.

कॅस्पर शेमेइशेल : गोलरक्षक कॅस्परच्या अभेद्य भिंतीमुळे लिस्टरने १५ सामन्यांत प्रतिस्पर्धीकडून एकही गोल न स्वीकारता सहज विजय साजरे केले. त्याचे वडील पीटर यांनीही मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना ईपीएलचे जेतेपद पटकावले होते.

वेस मॉर्गन : कर्णधार, उत्तम मध्यरक्षक असलेल्या मॉर्गनने संघाचे योग्य नेतृत्व केले.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:17 am

Web Title: english premier league leicester city
Next Stories
1 उपेक्षित खेळातील यशोदीपक
2 अनाकलनीय विकेट!
3 विराट युगाचा प्रारंभ
Just Now!
X