‘मिनी विश्वचषक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘युरो चषक’ स्पध्रेच्या महासंग्रामाला दहा जूनपासून सुरूवात होत आहे. तिची धामधूम कितीतरी आधीपासूनच रंगायला सुरूवात झाली आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलीगा, लीग वन, सीरिज ए, आदी क्लब फुटबॉल स्पर्धाचा हंगाम संपला तरी हा फुटबॉलचा ज्वर आणखी महिनाभर कायम राहणार आहे. निमित्त आहे ते ‘मिनी विश्वचषक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘युरो चषक’ स्पध्रेचे. युरोपातील राष्ट्रीय संघांमध्ये रंगणाऱ्या या महासंग्रामाला १० जूनपासून सुरुवात होत आहे. फिफा विश्वचषक स्पध्रेत हुकमत गाजवणाऱ्यांमध्ये युरोपियन देश आघाडीवर आहेत, हे वेगळे अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही. म्हणूानच विश्वचषक स्पध्रेप्रमाणे चार वर्षांनी खेळविण्यात येणाऱ्या युरो स्पध्रेलाही तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्व आणि चाहतावर्ग लाभलेला आहे. या स्पध्रेच्या निमित्ताने स्पेन, जर्मनी, इटलीसारख्या विश्वविजेत्या संघांना विश्वचषक स्पध्रेच्या तयारीची चाचपणीही करण्याची संधी मिळते. त्यामुळे क्लब स्पर्धामध्ये वर्षभर एकमेकांविरुद्ध खेळणारे दिग्गज राष्ट्रीय सेवेसाठी जातीने हजर राहतात ते ‘युरो’ स्पध्रेत खेळण्यासाठीच. १९६० सालापासून चार संघांच्या सहभागाने सुरू झालेला युरो स्पध्रेचा प्रवास २०१६ मध्ये २४ संघांपर्यंत गेला आहे. १९९६ ते २०१२ पर्यंत १६ संघांचा सहभाग असलेल्या या स्पध्रेची संघमर्यादा यंदा २४ करण्यात आल्याने यंदा जेतेपदासाठीचे आव्हान अधिक तीव्र झाले आहे. त्यामुळे पहिल्यांदा युरो स्पध्रेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळालेले अल्बानिया, आइसलँड, नार्दन आर्यलड, स्लोव्हाकिया आणि वेल्स हे पाचही संघ आंतरराष्ट्रीय स्थरावर आपली छाप पाडण्यासाठी आतूर आहेत. त्यामुळे जेतेपदाच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न पाहणाऱ्या स्पेन आणि सर्वाधिक जेतेपद नावावर करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जर्मनीसमोर यंदा कडवे आव्हान आहे.

फ्रेंच फुटबॉल महासंघाचे माजी सचिव हेन्री डेलायुनाय यांनी १९२७ मध्ये पॅन-युरोपियन फुटबॉल स्पध्रेची कल्पना पटावर ठेवली. मात्र, १९५८ पर्यंत ती प्रत्यक्षात उतरलीच नाही. डेलायुनाय यांच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर ‘युएफा युरोपियन राष्ट्रीय चषक’ या नावाने या स्पध्रेला सुरुवात झाली. म्हणजे विश्वचषक स्पध्रेला सुरुवात होऊन ३० वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर युरोपात या भव्य स्पध्रेच्या अध्यायाचा श्रीगणेशा झाला. १९६८मध्ये ही स्पर्धा ‘युएफा युरो’ म्हणून ओळखली जाऊ लागली ती आजतागायत कायम आहे. यजमान संघ वगळता इतर संघांना मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करणे बंधनकारक आहे आणि येथेच संघांची खरी कसोटी लागते. सुरुवातीला आव्हान कमी असल्यामुळे वर्चस्व असलेले संघ हमखास मुख्य फेरीत धडक मारायचे, परंतु आत्ता स्पर्धात्मक युगात भल्याभल्या संघांना लिंबू टिंबू संघांनी पाणी पाजल्याचे अनेक दाखले या स्पध्रेच्या निमित्ताने देता येतील. आत्तापर्यंत पार पडलेल्या १४ स्पर्धामध्ये नऊ विविध संघांनी जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये स्पेन आणि जर्मनी यांनी सर्वाधिक तीन अजिंक्यपद जिंकली आहेत. त्यापाठोपाठ फ्रान्सने दोन वेळा, तर सोव्हियत युनियन, इटली, झेकोस्लोव्हाकीया, नेदरलँड, डेन्मार्क आणि ग्रीस यांनी प्रत्येकी एकदा चषक उंचावला आहे. २००८ आणि २०१२ या सलग स्पर्धात जेतेपद पटकावून स्पेनने विक्रमी कामगिरी केली आहे आणि त्यांना यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्याची संधी आहे. मात्र, हे सहजासहजी शक्य होईल असे वाटत नाही. कारण, यंदा संघसंख्या १६ हून २४ वर नेण्यात आली आहे. आर्यलड आणि स्कॉटीश फुटबॉल असोसिएशनने संघ वाढवण्याचा प्रस्ताव युएफाचे तत्कालीन अध्यक्ष मायकेल प्लॅटिनी यांच्यासमोर ठेवला होता. त्याला इंग्लंड आणि जर्मनी असोसिएशनकडून कडाडून विरोध झाला, परंतु ५१ सदस्यांनी संघवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्याची अंमलबजावणी यंदापासून होणार आहे. या महासंग्रामात युरोपियन मक्तेदारी कुणाकडे जाते हे १० जुलैला स्पष्ट होईल. अस्सल फुटबॉलप्रेमींसाठी ही लज्जतदार मेजवानीच आहे आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी तेही सज्ज झाले आहेत.

२४ संघांचा सहभाग

युरो स्पध्रेत १९९६ सालापासून आत्तापर्यंत १६ संघांचा समावेश होता, परंतु यंदा संघसंख्या वाढवून २४ करण्यात आलेली आहे. २४ संघांची सहा गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातून अव्वल दोन आणि तिसऱ्या स्थानावरील चार सर्वोत्तम संघांना पुढील फेरीत प्रवेश मिळणार आहे. याचा अर्थ अव्वल १६ संघांची वेगळी फेरी पहिल्यांदा खेळविण्यात येणार आहे.

जिब्राल्टर प्रथमच पात्र

यजमान फ्रान्स वगळता एकूण ५३ संघांमध्ये मुख्य फेरीची पात्रता मिळवण्यासाठी चुरस रंगली. यामध्ये जिब्राल्टरने पहिल्यांदाच पात्रता फेरीत प्रवेश मिळवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. युरोपियन फुटबॉल महासंघाच्या (युएफा) संपूर्ण सदसत्वासाठी जिब्राल्टरने अर्ज केला होता आणि मे २०१३ मध्ये तो मान्य करण्यात आला. लोकसंख्येच्या बाबतीत जिब्राल्टर (३०,०००) हा युएफाचा सर्वात लहान सदस्य आहे. त्यांना अजूनही जागतिक फुटबॉल संघटनेचे (फिफा) पूर्ण सदस्यत्व न मिळाल्याने ते फिफा विश्वचषक स्पध्रेसाठी पात्र ठरू शकत नाही.

फ्रान्सची कुरघोडी

युरो २०१६ स्पध्रेच्या यजमानपदासाठी लावण्यात आलेल्या बोलीत फ्रान्सने टर्की आणि इटलीवर कुरघोडी केली. युएफाच्या १३ कार्यकारी सदस्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार वर्गवारी केली आणि त्यानुसार फ्रान्सला ४३, टर्कीला ३८ आणि इटलीला २३ गुण मिळाले. त्यामुळे नियमानुसार अव्वल दोन देशांमध्ये निवडणूक झाली आणि त्यात फ्रान्सने ७ गुण व टर्कीने ६ मते मिळवली.

फ्रान्सला तिसऱ्यांदा यजमानपद

फ्रान्स तिसऱ्यांदा युरो स्पध्रेचे यजमानपद भूषविणार आहे. असा मान मिळवणारा फ्रान्स पहिला देश आहे. १९६०मध्ये आयोजित पहिली स्पर्धा आणि १९८४ ची स्पर्धा फ्रान्समध्ये झाली होती.  ८४ साली फ्रान्सने २-० अशा फरकाने स्पेनला नमवून जेतेपद पटकावले होते. यजमानांनी जेतेपद पटकावण्याची ही दुसरी वेळ ठरली. त्याआधी इटलीने १९६८मध्ये अशी कामगिरी केली होती.

१० विविध शहरांत सामने

स्पध्रेचे सामने खेळविण्यासाठी सुरुवातीला १२ शहरांचा प्रस्ताव आला होता, परंतु अखेरीस केवळ दहा शहरांनाच मान्यता मिळाली. यामध्ये सेंट डेनिस, मार्से, लियॉन, लिले, पॅरिस, बोर्डेऑक्स, सेंट-इटिन्ने, नाइस, लेन्स आणि टॉलॉस या शहरांचा समावेश आहे. यापैकी डेनिस, मार्से, पॅरिस, सेंट-इटिन्ने, बोर्डेऑक्स आणि टॉलॉस येथील स्टेडियमवर १९९८च्या विश्वचषक स्पध्रेचे सामने झाले आहेत.

डीजे डेव्हिड ग्युट्टाचे गाणे

फ्रेंच डीजे डेव्हिड ग्युट्टा यांनी युरो २०१६ साठीचे अधिकृत गाण्याचे लिखाण आणि गायन केले आहे. या गाण्याला अल्प कालावधीत एक कोटी चाहत्यांनी समाजमाध्यमांवर पसंती दर्शवली. स्पध्रेच्या उद्घाटन सोहळ्यात ग्युट्टो या गाण्याचे सादरीकरण करणार आहेत.

विक्रमी चौथ्या जेतेपदाची संधी

गतविजेते स्पेन आणि जर्मनी या दोन्ही देशांना चौथ्यांदा युरो चषक उंचावण्याची संधी आहे. स्पेनने १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये, तर जर्मनीने १९७२, १९८० आणि १९९६ साली जेतेपद पटकावले होते. जर्मनीला २००८मध्ये अंतिम लढतीत स्पेनकडून पराभव पत्करावा लागला होता.

विजेत्या संघाला संधी

युरो २०१६ स्पध्रेतील विजेता संघ २०१७च्या कॉन्फडरेशन चषक स्पध्रेसाठी पात्र ठरणार आहे. जर जर्मनी किंवा रशियाने जेतेपद पटकावले, तर उपविजेत्याला ही संधी मिळेल. कारण जर्मनी व रशियाने यापूर्वीच स्पध्रेची पात्रता मिळवलेली आहे. दोन्ही संघ अंतिम फेरीत गेल्यास उपांत्य फेरीतील पराभूत संघातून एकाची निवड करण्यात येईल. तसेच युरो चषक उंचावणारा संघ ‘मिनी विश्व चषक’ स्पध्रेसाठी पात्र ठरू शकतो.

प्लेअर टू वॉच

१० जूनपासून सुरू होणाऱ्या ‘युरो २०१६’ फुटबॉल स्पध्रेत यंदा १६ ऐवजी २४ संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्पध्रेतील चुरस तर वाढलीच, परंतु छोटय़ा छोटय़ा संघांतील युवा खेळाडूंना आपली छाप पाडण्याचीही संधी आहे. अशा युवा आणि सध्याच्या दिग्गज खेळाडूंमध्ये निवडलेले काही खेळाडू..

पॉल पोग्बा (फ्रान्स) : फुटबॉलमधील सर्वात प्रतिभाशाली, अष्टपैलू मध्यरक्षक म्हणून फ्रान्सचा पॉल पोग्बा ओळखला जातो. २०१४च्या विश्वचषक स्पध्रेत फ्रान्सने कौतुकास्पद कामगिरी केली होती आणि २०१६मध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांना पोग्बाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. ज्युव्हेंटसकडून खेळताना पोग्बाने २०१४-१५ आणि २०१५-१६ या सत्रात विविध स्पर्धामध्ये ८० सामन्यांत २० गोलची नोंद केली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) : क्लब आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पध्रेत आक्रमक आणि चपळ खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या रोनाल्डोला राष्ट्रीय संघाकडून खेळताना यशाने नेहमी हुलकावणी दिली आहे. रिअल माद्रिद क्लबच्या सहकाऱ्यांकडून मिळत असलेली साथ राष्ट्रीय संघात मिळत नसल्याने त्याच्या वाटय़ाला हे अपयश आले आहे. २००४मध्ये पोर्तुगालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी रोनाल्डो १८ वर्षांचा होता. २०१२मध्ये पोर्तुगालने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि रोनाल्डोला स्पध्रेत तीनच गोल करता आले होते. मात्र, २०१५-१६ हंगामातील रोनाल्डोच्या कामगिरीकडे पाहिल्यास तो हे अपयश मागे टाकेल अशी अपेक्षा आहे.

झालटन इब्राहिमोव्हिक (स्वीडन) : झालटनसाठी यंदाचे वर्ष हे स्वप्नवतच म्हणावे लागेल. पेरिस सेंट जर्मेनच्या या खेळाडूने २०१५-१६चा हंगाम गाजवला. लीग १, क्युपे डी फ्रान्स, क्युपे डी ला लीग या स्पध्रेची जेतेपद जर्मेन क्लबने पटकावले ती इब्राहिमोव्हीकच्या दमदार कामगिरीच्या जोरावर. ३४ वर्षीय इब्राहिमोव्हीक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असून स्वीडनला पहिलेवहिले युरो जेतेपद पटकावून देण्याचा निर्धार त्याने केला आहे. आक्रमकता आणि चपळाई याचे अचूक समीकरण म्हणजे इब्राहिमोव्हीक.

गॅरेथ बॅले (वेल्स) : युरो स्पध्रेतील संघ संख्या २४वर नेल्यामुळे वेल्स संघाला महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळण्याची संधी मिळाली आणि गॅरेथ बॅलेला नेतृत्वकौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळाले. रिअल माद्रिदकडून खेळताना बॅलेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले असले, तरी हार मानण्याचा त्याचा स्वभाव नाही. जगतील सर्वात जलद आणि चपळ खेळाडूंमध्ये त्याची गणना होते.

हेरी केन (इंग्लंड) : २०१४ मध्ये इंग्लंडच्या संघात विचाराधीन नसलेल्या हेरी केनने गेल्या दोन हंगामात सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये ५९ गोल करून स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले. टोटनहॅमकडून खेळताना २२ वर्षीय केनने एक उत्तम विजयवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. गोल करण्याची संधी स्वत: निर्माण करण्याची कला केनकडे असल्यामुळे इंग्लंडसाठी तो निर्णायक ठरू शकतो.

रॉबर्ट लेवांडोवस्की (पोलंड) : इब्राहिमोव्हीकच्या तालमीत लेवांडोवस्कीने जगातील सर्वोत्तम आक्रमपणपटूंमध्ये स्थान पटकावले आहे. जर्मनीतील सर्व प्रकारच्या लीगमध्ये पाच हंगामांत त्याच्या नावावर १६० गोल आहेत. यामध्ये वुल्फबर्गविरुद्ध नऊ मिनिटांत केलेल्या पाच गोलचाही समावेश आहे. तो एकहाती पोलंडला विजय मिळवून देऊ शकतो.

मेसूट ओझील (जर्मनी) : आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भेदक खेळाडू म्हणून ओझीलची ख्याती आहे. आर्सेनलच्या विजयी घोडदौडीत ओझीलचा महत्त्वाचा वाटा असून प्रीमिअर लीग स्पध्रेत गोल करण्याच्या सर्वाधिक संधी निर्माण करणाऱ्यांमध्ये ओझील अव्वल आहे. लॅहमच्या निवृत्तीनंतर आणि श्वेनस्टेंगरच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्यामुळे जर्मनीला नव्या दमाच्या खेळाडूची आवश्यकता आहे आणि ओझील ही जबाबदारी चोख बजावू शकतो.

यांच्यासह डेव्हिड सिल्व्हा (स्पेन), लुका मॉड्रीक (क्रोएशिया), इडन हजार्ड (बेल्जियम), गिगी बफॉन (इटली), डेव्हिड अ‍ॅलबा (ऑस्ट्रीया), अ‍ॅर्डा तुरान (टर्की), मॅरेक हॅम्सीक (स्लोव्हाकिया), अ‍ॅड्रीय यार्मोलेंको (उक्रेन), झारदान शाकिरी (स्वित्र्झलड) हे खेळाडू ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहेत.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com