इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या सत्राच्या तयारीसाठी स्पेन दौऱ्यावरून गुरुवारी मायदेशी परतणाऱ्या गतविजेत्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाता (एटीके) क्लबची सराव मैदानावरून कोंडी झाली आहे. विवेकानंद युवा भारती क्रीडांगण सरावासाठी उपलब्ध नसल्यामुळे अ‍ॅटलेटिको संघात चिंतेचे वातावरण आहे.

‘‘सध्याच्या घडीला सराव मैदान हे आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. स्पध्रेतील सामन्यापूर्वी सॉल्टलेक स्टेडियमवर सराव करायला आम्हाला आवडेल, परंतु सत्रातील पहिल्या लढतीसाठी चेन्नईला रवाना होण्याआधी ते मिळेल याची शाश्वती नाही,’’ अशी माहिती एटीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रता तालुकदार यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या स्पध्रेदरम्यान सॉल्टलेक स्टेडियममधील नैसर्गिक गवताचे नुकसान झाले आहे आणि २०१७ मध्ये भारतात होणाऱ्या फिफा विश्वचषक (१७ वर्षांखालील) स्पध्रेसाठी या स्टेडियमची निवड झालेली आहे.
त्यामुळे हे मैदान पूर्णवेळ सरावासाठी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे मोहन बगानचे मैदान किंवा विद्यासागर क्रीडांगण असे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. ‘‘आमच्याकडे मोजकेच पर्याय आहेत आणि मुख्य प्रशिक्षक अ‍ॅनोटोनिओ हबास गुरुवारी संघासोबत येथे आल्यानंतर यावर चर्चा केली जाईल,’’ असेही ते म्हणाले.