News Flash

तेरा वर्षांचे फलित काय?

‘मुंबई मॅरेथॉन’ खऱ्या अर्थाने भारतीय धावपटूंसाठी फायदेशीर ठरतेय का...

गेली तेरा वर्षे सुरू असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधून सगळ्यात जास्त फायदा झाला आहे तो एनजीओंचा. त्यांनी या इतक्या वर्षांमध्ये स्पर्धेतून लाखो रुपयांचा निधी गोळा केला आहे, पण त्यापलीकडे या स्पर्धेतून भारतीय खेळाडूंना काय मिळतं?

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंना भुरळ घालणाऱ्या, भरघोस बक्षीस रकमेचे आमिष दाखवून आकर्षित करणाऱ्या ‘मुंबई मॅरेथॉन’ने तेरा वर्षांचा पल्ला यशस्वीरीत्या पार केला. या तेरा वर्षांच्या कालावधीत मुंबईकरांनी दिग्गज धावपटूंना, याचि देही, याचि डोळा पाहिले.. त्यांच्या धावण्यातील लयबद्धता, कौशल्य आणि कोणत्या क्षणाला, गतीला चालना द्यायची, हे कसब अगदी जवळून पाहिले. याचा फायदा त्यांच्यासोबत धावणाऱ्या राष्ट्रीय धावपटूंना नक्की झाला. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांची कामगिरी दिवसेंदिवस बदलत गेली, पण ही मॅरेथॉन खऱ्या अर्थाने भारतीय धावपटूंसाठी फायदेशीर ठरतेय का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे. या स्पध्रेत भारतीय धावपटू सहभागी होण्याची दोन कारणे आहेत. पहिले आंतरराष्ट्रीय धावपटूंसोबत स्पर्धा करून आपल्या कामगिरीची चाचपणी करण्याचे आणि दुसरे म्हणजे मिळणारी बक्षीस रक्कम. सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून सुरू होणाऱ्या पुरुष व महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय आणि भारतीय धावपटू एकाच वेळी स्पध्रेला सुरुवात करतात, परंतु हाजीअलीचा टप्पा पार करेपर्यंत (११ किमी अंतर) भारतीय धावपटू हे बरेचसे पिछाडीवर गेलेले अनेकदा पाहायला मिळाले आहे. मग त्यांना इतक्या कमी किलोमीटरच्या अंतरात आंतरराष्ट्रीय धावपटूंकडून नेमके काय शिकायला मिळते हे कळेनासे झाले आहे. स्पर्धा निकाल लागतो तेव्हा अव्वल २० मध्ये ११ भारतीय धावपटू असतात (पुरुष गट) असा दावा पुराव्यासहित केला जातो. हे कसे होते? पुरुष गटातील आंतरराष्ट्रीय धावपटूंची संख्या ही पाच-सहा इतकीच असते. उर्वरित हे त्यांचे पेस सेटर असतात. आपली गती कायम राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू आपल्यासोबत एक दोन पेससेटर घेऊन येतात आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय धावपटूंचा आकडा अधिक असल्याचे ३० किमी अंतरापर्यंत जाणवते. ३० किमीपर्यंतच या पेससेटरची भूमिका असते आणि त्यानंतर ते माघार घेतात. अशा परिस्थितीत भारतीय धावपटूंची अव्वल २० जणांमधील संख्या ही अधिक असणे साहजिकच आहे.

ही वस्तुस्थिती मांडून भारतीय धावपटूंचे खच्चीकरण करण्याचा कोणताच हेतू नाही. मात्र, या मॅरेथॉनचा भारतीय धावपटूंना नेमका कोणता फायदा होतोय, हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय धावपटूंसोबतचा धावण्याचा अनुभव ही थाप आहे, हे आत्तापर्यंत आपल्याला कळलेच असेल. मग या स्पध्रेत धावून आर्थिक उन्नती करणे, हा मुख्य फायदा आहे. वाढत्या बक्षीस रकमेमुळेच भारतीय धावपटू मोठय़ा संख्येने मॅरेथॉनमध्ये सहभाग होता. हे मुंबई मॅरेथॉनपुरते नाही, तर कोलकाता, पुणे आदी ठिकाणी होणाऱ्या स्पध्रेत सहभाग घेण्याचे हेच कारण आहे. यामध्ये गैर असे काहीच नाही, कारण भारतीय क्रीडा मंत्रालय आणि राज्य सरकारकडून धावपटूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा अपुऱ्या आहेत आणि त्यामुळे धावपटूंना अशा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन पैसे कमवावे लागतात. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेण्यासाठी लागणारे आर्थिक साहाय्य या मॅरेथॉनच्या रकमेतून उभा करण्यावर धावपटूंचा भर असतो. ही व्यथा केवळ भारतीयांचीच नाही, तर आंतरराष्ट्रीय धावपटूंचीही आहे. यंदाच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये पेससेटर म्हणून धावणारा विजेता स्पर्धक गिडियन किपकेटर यानेही मिळालेल्या बक्षीस रकमेतून पडीक घर बांधण्याचा आणि शेतीसाठी जमीन विकत घेण्याचा मानस बोलून दाखवला. त्यामुळे केवळ भारतात धावपटू दुर्लक्षित नसून ही व्यथा केनिया, युगांडा, इथोपिया यांसारख्या देशांमध्येही आहे. अर्थात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत या देशांची अर्थव्यवस्था कोसो दूर आहे. मात्र या मागासलेल्या देशांमध्ये ऑलिम्पिक पदकविजेते धावपटूही मोठय़ा प्रमाणात तयार होतात. तेही विविध देशांतील प्रमुख्य मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन पैसे कमावतात. मुंबई मॅरेथॉन ही त्यांच्यासाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. भारतीय धावपटूंनीही याच मानसिकतेमुळे मुंबई मॅरेथॉनला प्राधान्य दिले आहे. हे ऑलिम्पिक वर्ष असल्यामुळे या स्पध्रेत सहभाग घेऊन आपल्या तयारीची चाचपणी करण्यासाठीही अनेक धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या स्पध्रेला ऑलिम्पिक पात्रतेची मान्यता मिळाल्यामुळे अनेकांनी हे लक्ष्य समोर ठेवून सहभाग घेतला. त्यामुळेच पूर्ण मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात द्वितीय आणि तृतीय स्थानावर आलेला गोपी टी. व खेता राम यांना ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यात यश आले. या पलीकडे मुंबई मॅरेथॉनचे महत्त्व उरत नाही. महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय धावपटूंच्या वेळेतील फरक पाहिल्यास भारतीय खेळाडू ऑलिम्पिकपदकापासून किती दूर आहेत, याची प्रचीती येते. येथे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आंतरराष्ट्रीय धावपटूंमध्येही भारतीयांना आपली छाप सोडण्यात अपयश येते, तर ऑलिम्पिकमध्ये ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक असेल. तेथे तग धरणे भारतीयांसाठी कठीणच आहे. तेथे आपल्याला अव्वल २०मध्येच नाही, तर अव्वल ५०मध्येही स्थान पटकावण्यात अपयश आल्याचे इतिहास सांगतो. भारतीय महिला गटात अव्वल आलेल्या सुधा सिंग, ललिता बाबर आणि ओ. पी. जैशा या ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेस प्रकारात धावणार आहेत. अनुभवासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी त्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात, हे कुणीही सांगेल. अर्ध मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सहभाग अधिक आहे. तोही आर्थिक प्रगतीसाठी. त्याव्यतिरिक्तमुंबई मॅरेथॉनचा या खेळाडूंना कोणताच फायदा नाही. मग, या मॅरेथॉनचा फायदा कुणाला होतो, तर एनजीओ आणि प्रायोजकांना. या मॅरेथॉनच्या माध्यमातून अनेक संस्था देणगी रूपाने लाखो रुपयांचा देणगी गोळा करतात. त्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही हातभार लागतो. त्यांनाही आपण समाजाचे ऋण फेडल्याचे समाधान मिळते.

२००४ मध्ये सुरू झालेल्या या मुंबई मॅरेथॉनने गेल्या तेरा वर्षांत बरीच प्रगती केली आहे. व्यावसायिक गणिताची योग्य घडी घालून केवळ स्पर्धकांच्या बाबतीत नव्हे, तर निधी गोळा करण्यामागेही या मॅरेथॉनने भरपूर यश मिळवले आहे. मात्र, प्रेक्षकांच्या बाबतीत मात्र त्यांना उतरती कळा लागली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि वरळी केंद्र वगळता ही स्पर्धा पाहण्यासाठी कुणी आवर्जून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत आहे, असे होत नाही. वरळी केंद्राच्या इथे झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे तेथे हौशी प्रेक्षकांची गर्दी जमते, ती तेवढय़ापुरतीच. पेडररोडवरही काही प्रमाणात हा उत्साह पाहायला मिळतो. मुंबई मॅरेथॉनने यशाची तेरा वष्रे पूर्ण केली, परंतु प्रेक्षक कमावण्यात त्यांना अपयश आले आहे. हा एक व्यावसायिक इव्हेंट आहे आणि     त्यापलीकडे खेळाडूंच्या विकासासाठी त्याचा फायदा नाही. वर्षांच्या पहिल्याच महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही स्पर्धा आयोजित करायची आणि कोटय़वधी रुपयांची मिळकत करून त्यातील काही रक्कम खेळाडूंना बक्षीस म्हणून द्यायची, हा व्यवसाय गेली तेरा वष्रे चालला आहे आणि पुढील अनेक वर्ष तो चालणार आहे. यापलीकडे धावपटूंच्या हिताचे यामध्ये काहीच नाही.
स्वदेश घाणेकर –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:23 am

Web Title: mumbai marathon 2
टॅग : Krida
Next Stories
1 लोढा समितीचा जमालगोटा
2 टेबल टेनिस : नैपुण्य आहे पण..
3 वास्तवाचे दर्शन
Just Now!
X