टेबिल टेनिस खेळणारे निपुण स्पर्धक आपल्याकडे आहेत. जागतिक स्तरावर त्यांनी त्यांचं विशिष्ट स्थानही प्रस्थापित केलं आहे. आता गरज आहे ती त्यांच्या नैपुण्याचा विकास करण्याची.
जागतिक स्तरावर टेबल टेनिसमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य भारतात उपलब्ध आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या क्रीडा सुविधाही सहज उपलब्ध आहेत, मात्र त्यांच्याकडे असलेल्या नैपुण्याचा योग्य रीतीने विकास करण्याची गरज आहे. अलीकडेच सुरत येथे झालेल्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सोळा पदके जिंकून घसघशीत कामगिरी केली आहे.
टेबल टेनिस हा खेळ अलीकडे काहीसा महागडा खेळ झाला असला तरी आपल्या देशात त्याची लोकप्रियता भरपूर आहे. शालेय स्तरापासून या खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. जिल्हा स्तरावरही अनेक मानांकन स्पर्धा आयोजित करीत त्याद्वारे विविध क्लबमधील खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असते. आंतरक्लब सांघिक स्पर्धामध्येही भाग घेणाऱ्या संघांची संख्या भरपूर असते. असे असूनही सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत या तत्त्वानुसार भारतीय खेळाडूंचे यश राष्ट्रकुल स्पर्धापुरतेच मर्यादित राहिले आहे. सुरत येथील स्पर्धेत इंग्लंडच्या मातब्बर खेळाडूंनी भाग घेतला नव्हता. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आजपर्यंतचे सर्वोत्तम यश मिळाले. २०१३ मध्ये त्यांनी नऊ पदकांची कमाई केली होती. यंदा त्यामध्ये आणखी सात पदकांची वाढ झाली. त्यातही सांघिक विभागातील पुरुष गटात सुवर्णपदक व महिलांमध्ये रौप्यपदक ही भारतीय खेळाडूंसाठी उल्लेखनीय कामगिरी होती.
हा खेळ फारसा अवघड नसल्यामुळे आपल्या देशात गावोगावी हा खेळ खेळला जातो असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. अनेक महाविद्यालये व शाळांमध्ये रॅकेट्स उपलब्ध नसल्या तरीही अनेक मुले वह्य़ांच्या साहाय्याने चेंडू मारत या खेळाचा आनंद घेत असतात. महागडय़ा रॅकेट्सच्या ऐवजी अनेक मुले-मुली आंतरशालेय स्पर्धामध्ये भाग घेतात. मिडजेट. कॅडेट, सबज्युनिअर, कुमार, युवा व खुला आदी विविध गटांसाठी स्थानिक पातळीवरही स्पर्धाचे आयोजन केले जात असते. प्रौढ खेळाडूंसाठीही स्पर्धा होत असते व त्यामध्येही भाग घेत खेळाचा निखळ आनंद घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या मोठी आहे. साहजिकच आपल्या नातवंडांना या खेळासाठी प्रोत्साहन देण्याचे कामही या ज्येष्ठ नागरिकांकडून होत असते. मात्र स्थानिक स्पर्धामध्ये अपेक्षेइतका नैपुण्यशोध व विकासावर भर दिला जात नाही. जरी भर दिला गेला तरी या खेळांडूंचा योग्य रीतीने व तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण विकास होत नाही.
lp19

भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांमध्ये टेबल टेनिसची लोकप्रियता अफाट आहे. राष्ट्रीय स्पर्धेत प्रत्येक गटात महाराष्ट्राचे दोन संघ उतरविले जातात. आपल्या देशात अनेक ठिकाणी टेबल टेनिसच्या अकादमी कार्यरत आहेत. मात्र त्या ठिकाणी असलेली टेबल्सची मर्यादित संख्या यामुळे खेळाडूंना अपेक्षेइतका भरपूर सराव करता येत नाही. काही वेळा असेही दिसून येते की ज्या क्रीडा संकुलामध्ये किंवा इनडोअर स्टेडियममध्ये अनेक खेळांच्या सामन्यांचे आयोजन करण्यासाठी सुविधा उपलब्ध असतील तर अशा ठिकाणी सराव करणाऱ्या खेळांडूंवर खूप मर्यादा येतात. समजा एखाद्या स्टेडियममध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल आदी अनेक खेळ होऊ शकत असतील तर अन्य खेळांच्या स्पर्धाच्या वेळी टेबल टेनिसचा सराव करणाऱ्या खेळाडूंना पाच-सहा दिवस प्रत्यक्ष खेळाऐवजी पूरक व्यायामावर समाधान मानावे लागते. काही वेळा या संकुलांची देखभाल करणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखेच असते. साहजिकच हा खर्च भरून काढण्यासाठी ही संकुले अन्य सांस्कृतिक कार्यक्रम किंवा विवाह समारंभासाठीदेखील दिली जात असतात. अशा गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे. ही संकुले केवळ खेळाडूंसाठीच वापरली जातील याची काळजी संबंधित संघटनेने घेतली पाहिजे.
अनेक शहरांमध्ये असलेल्या गृहरचना संस्थांमधील छोटय़ाशा सभागृहात टेबल टेनिसची सुविधा असते. मात्र तेथील वातावरण खेळाडूंसाठी अयोग्य असते. काही खेळाडू दोन-तीन सामन्यांमधील विश्रांतीच्या वेळी सभागृहाबाहेर धूम्रपान करून पुन्हा आत येतात. त्यांचा भपकाराही अन्य खेळाडूंसाठी त्रासदायक असतो. काही वेळा अशा सभागृहांमधील प्रकाश व्यवस्थाही अपुरी असते. खोलीही लहान असते. पावसाळ्यात या खोल्यांमध्ये अखंड गळती सुरू असते. या वातावरणात खेळाडूंच्या विकासास खूपच मर्यादा येतात. खेळाडूंचा खरोखरीच विकास करण्याची इच्छा असेल तर संघटकांनी खेळासाठी योग्य वातावरण, अनुकूल प्रकाश यंत्रणा, स्वच्छ टेबल्स, भरपूर खेळती हवा याची काळजी घेतली पाहिजे.
आपल्याकडे अनेक वेळा असे दिसून येते की, दोन-तीन राज्य स्पर्धा खेळून झाल्या नाहीत तोच हा खेळाडू प्रशिक्षकाची कारकीर्द सुरू करतो. त्यामुळे खेळात परिपक्वता नसताना ही मंडळी नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. साहजिकच त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीस खूप मर्यादा येतात. त्यामुळे त्यांच्याकडून शिकलेल्या खेळाडूंमध्येही तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्णता नसते, त्यांच्याकडे विविध शैलींचीही मर्यादा असते व असे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर अपेक्षेइतके अव्वल दर्जाचे यश मिळवू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या देशात सर्वप्रथम प्रशिक्षकांचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय प्रशिक्षकांकरिता उद्बोधक शिबिरांचे आयोजन केले पाहिजे व अशा शिबिरांमध्ये मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतास जे घवघवीत यश मिळाले, त्यामध्ये गुजरात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या उत्तर कोरियाचे प्रशिक्षक रिहोयांग इली यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरात खेळाडूंच्या तांत्रिक शैलीच्या विकासावर भर देण्यात आला होता. त्यामुळेच भारतीय पुरुष संघास सांघिक विभागात सोनेरी यश मिळाले तर भारतीय महिला संघास रौप्यपदक मिळविता आले. जर एक राज्य असे प्रशिक्षक नेमू शकते तर अन्य राज्यांनीही त्याचे अनुकरण केले पाहिजे. राष्ट्रीय भारतीय टेबल टेनिस महासंघाने राष्ट्रीय संघातील खेळाडूंसाठी लवकरच परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता त्यांनी उत्तर कोरियातील प्रशिक्षकांनाच पाचारण करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडूंचे प्रशिक्षक भवानी मुखर्जी हे लवकरच निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काम करण्यास अनेक माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र या प्रशिक्षकांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे केला जात असल्यामुळे त्यांच्या बंधनाखाली काम करण्यास हे माजी खेळाडू तयार नव्हते. त्यामुळेच महासंघाने परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंबरोबर कनिष्ठ गटांमधील नैपुण्यवान खेळाडूंनाही या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचा खेळाच्या विकासाकरिता निश्चितच फायदा होणार आहे.
भारतात साधारणपणे जून ते ऑक्टोबर या कालावधीत स्थानिक स्पर्धाचे आयोजन केले जात असते. त्यानंतर स्थानिक स्पर्धा सुरू होण्यासाठी मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागते. जरी मधल्या काळात राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात असल्या तरी स्थानिक स्तरावर आंतरक्लब व वैयक्तिक अशा दोन्ही स्पर्धाचे आयोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे खेळाडूंचा स्पर्धात्मक खेळ सुरू राहतो व त्यांच्या खेळात सातत्यही राहू शकते. परदेशात आंतरक्लब स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर व वर्षभर सुरू असतात. चीन, जपान, कोरिया आदी देशांमधील खेळाडू युरोपियन लीगमध्ये विविध क्लबकडून खेळत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा मिळतो व स्पर्धात्मक अनुभवही प्राप्त होतो. आपले खेळाडूही परदेशातील क्लबकडून खेळत असतात. मात्र त्यांच्यावर आर्थिक मर्यादा असल्यामुळे अपेक्षेइतका कालावधी ते परदेशात खेळू शकत नाहीत. त्याकरिता शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता संघटनात्मक स्तरावरही प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. सुदैवाने या खेळास प्रायोजक मिळण्यात फारशी अडचण येत नाही. खेळाडूंचा विकास हा केंद्रस्थानी मानून त्या दृष्टीने विविध उपक्रमांवर भर दिला पाहिजे. प्रत्येक राज्य संघटना कशी स्वावलंबी राहील याचाही विचार करण्याची गरज आहे.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?