News Flash

काळ अमृतमंथनाचा

सामाजिक पार्श्वभूमीवर आपली मुलं काय विचार करीत असतील याची चिंता वाटणाऱ्या पालकांनी मला नुकतेच या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते

आपला देश सध्या एका चमत्कारिक अवस्थेतून जात आहे. जागतिक पातळीवर मध्यंतरी घडलेल्या काही अप्रिय घटना, सहिष्णुता-असहिष्णुताचे वाद किंवा मग राज्यातील मूलभूत समस्या-या सगळ्याच्या बाजूने आणि विरोधात प्रचंड चर्चा रंगताहेत. मध्यंतरी ज्या घटना घडल्या, जी वक्तव्य केली गेली ती सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. या सामाजिक पार्श्वभूमीवर आपली मुलं काय विचार करीत असतील याची चिंता वाटणाऱ्या पालकांनी मला नुकतेच या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्या चर्चेचा सारांश आणि काही प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रश्न या लेखात मांडत आहे. कारण ही चर्चा आणि त्यात पालकांनी विचारलेले प्रश्न हे सगळ्यांना पडणारे प्रश्न आहेत.

पालक १ – डॉक्टर, आम्ही आमच्या मुलांना आयसीसचे हल्ले किंवा ‘सहिष्णुता-असहिष्णुता’ या विषयावर खुलेपणाने बोलू द्यावे का? त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं वाटतं. तुम्ही काय सांगाल?
डॉक्टर : या प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्यापूर्वी काही निरीक्षणं सांगतो. मित्रांनो, सध्या आपला देश एका ऐतिहासिक अवस्थेतून जात आहे. सामान्य जनता आपली मतं खुलेपणाने मांडत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलायला आम्हाला जणू नवीन ताकद आणि जागा गवसली आहे. अनेक र्वष सामान्य माणूस या सगळ्यापासून खूप दूर होता. तो त्याच्या कुंपणात राहणं पसंत करायचा आणि राज्यकर्ते स्वत:च्या मर्जीनुसार राज्य करायचे. सामान्य माणसाला त्याचा स्वत:चा आवाज नव्हता, त्यामुळे निर्णयप्रक्रियेत त्याचा सहभाग नसायचा. राज्यकर्ते निर्णय घेऊन मोकळे व्हायचे. सामान्य माणूस कधीतरी राज्यकर्त्यांची टिंगलटवाळी किंवा गॉसिप करायचा पण तो त्याचा क्षणिक मनोरंजनाचा भाग असायचा. गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र हळूहळू पण निश्चित बदलत गेलं. सामान्य जनता आपले विचार, मतं खुलेपणाने मांडू लागली. सुरुवातीला हा बदल क्षणभंगुर असेल असं वाटलं होतं पण जेव्हा एकाच्या आवाजात दुसऱ्याचा आवाज मिसळत गेला तेव्हा त्यातून मोठा आवाज निर्माण होऊ लागला आणि प्रत्येकाच्या आवाजाची पातळी वेगळी होती. आजची तरुण पिढी संवेदनशील विषयांचा फार विचार करते किंवा इतरांच्या संवेदनशीलतेबद्दल चिंता करीत बसले आहेत असं मला वाटत नाही. कारण इतरांच्या संवेदनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतून पडणं आणि सारखा त्याच विषयाचा विचार करीत राहणं हे जास्त धोकादायक असतं. जेव्हा असे विचार डोक्यात साचून राहतात तेव्हा ते चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या मार्गाने बाहेर पडण्याचा जास्त धोका असतो. या दिवसात तुमच्या मुलांचा अभ्यास, करिअर हेच विषय महत्त्वाचे आहेत. त्यापेक्षा वेगळी मते मुलांना मांडायची असतील तर ती त्यांना तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबाशी जरूर शेअर करू द्या. आपल्या देशाला १९४७ला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी खऱ्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणं आता कुठे सुरू झालं आहे. हे एकप्रकारचं अमृतमंथन असून या वैचारिक घुसळणीतून अमृत बाहेर येईल.
पालक २ – अमीर खानने देशासंदर्भात जे विधान केलं ते मला अजिबात आवडलं नाही..उलट मला त्याचा राग आला. पण माझा मुलगा माझ्याशी सहमत नाही. तो त्यावरून माझ्याशी हुज्जत घालीत असतो.
डॉक्टर : अमीर खानचं वक्तव्य चूक की बरोबर हा प्रश्न इथे महत्त्वाचा नाही. तर इथे हे महत्त्वाचं आहे की भिन्न विचारांची अभिव्यक्ती आणि त्याचं मत मांडण्याचा तुमच्या मुलाला असलेला अधिकार. वडील म्हणून तुम्ही त्याला असं वातावरण द्या की तो न भीता, न लाजता मोकळेपणाने त्याचे विचार (जरी ते भिन्न असले तरी) मांडू शकेल. त्याचं म्हणणं त्याच्याविषयी आदर ठेऊन शांतपणे ऐकून घ्या. तुम्ही त्याच्या भिन्न विचारांना चर्चेमध्ये स्थान दिलं, ते व्यक्त करण्याची मुभा त्याला दिली आणि तुम्ही त्याचं म्हणणं (तुमच्या विचारांपेक्षा भिन्न असूनही) शांतपणे आणि आदराने ऐकून घेतलं या गोष्टीत जो आनंद आहे तो आनंद अनुभवू द्या. त्याचबरोबर भिन्न विचारांच्या व्यक्तीबद्दल आदर ठेवता येतो आणि दुसऱ्याच म्हणणं शांतपणे ऐकून घेता येऊ शकतं या दोन महत्त्वाच्या गोष्टींची किंमत त्याला कळेल. तुम्ही त्याच्याशी सहमत नसलात तरी काही हरकत नाही. घर ही एक प्रयोगशाळा असते जिथे सीईओ जन्माला येतात, इथेच मुलांना कारुण्य भाव सापडतो, इथेच आत्मविश्वासाची मोट बांधली
जाते. तुम्ही सत्यस्थिती किंवा वस्तुस्थिती त्याच्याशी शेअर करू शकता पण चर्चा करताना तुमच्या दोघांची नजर एका रेषेत असली पाहिजे. एकमेकांचे भिन्न विचार स्वीकारण्यासाठी ही वागणूक योग्य ठरते. त्याचे विचार साचू न देता ते प्रवाही ठेवण्यात तुमची त्याला मदतच होईल.
पालक ३ – आपल्या देशात होऊन गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मी वंदनीय मानते, पण माझ्या मुलीला त्यांच्या त्यागाविषयी, बलिदानाविषयी फारशी माहिती नाही. इतिहासातील रोमहर्षक कथा वाचून ती भारावूनसुद्धा जात नाही किंवा प्रेरित होत नाही. विशेष म्हणजे नवऱ्यालाही यात वावगं वाटत नाही, त्यामुळे तेसुद्धा तिच्या बाजूने बोलतात.
डॉक्टर : ज्यांचा जन्म १९४७ च्या आसपास किंवा त्यानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांत झाला आहे त्यांना स्वातंत्र्यसैनिकांविषयी आदर असणं किंवा त्यांच्या बलिदानातून त्यांनी प्रेरणा घेणं स्वाभाविकच आहे. पण देश स्वतंत्र होऊन अनेक दशकं ओलांडल्यानंतर अलीकडच्या काळात ज्यांचा जन्म झालाय त्यांच्यासमोर आज जे आहे ते जग नवीन आहे. हे नवीन जग त्यांना खुलं झालंय. त्याचं म्हणणं नीट ऐकून घ्या आणि त्यांच्या नजरेतून या जगाकडे पाहा. तुमची आणि त्यांची श्रद्धास्थानं वेगवेगळी आहेत किंवा तुम्हाला ज्या गोष्टी पूज्यनीय वाटतात त्या त्यांना तशा वाटत नाहीत याचा अर्थ ते तुमचा अनादर करताहेत किंवा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करताहेत असा होत नाही. ते फक्त त्या लढय़ाकडे वेगळ्या दृष्टीने बघताहेत आणि त्या घटनांचे मूल्यमापन करताहेत. मित्रांनो, कोणतीही जुळवाजुळव ठरवून न करता आपल्या देशात अनेक सूर एकत्र आले आहेत आणि त्यातून एक चांगलं सांगीतिक मिश्रण तयार झालंय. ही आपली संस्कृती आहे जी अनेक आक्रमणांनंतरही टिकून आहे आणि ती आणखी अद्ययावत होत पुढे जाणार आहे. हा त्या देशाचा भूभाग आहे ज्या देशात हजारो वर्षांपूर्वी वेदांवर टीका करणाऱ्या चार्वकाला दूर न लोटता ऋषि मानलं गेलं आणि आजही मानलं जातं. शांततेचा पाया जर भक्कम असेल तर त्या पायावर मुक्त आणि निर्भय चर्चेचा सेतू बांधता येतो.
पालक ४ : तुम्ही आदर्शाचा वस्तुपाठ घालून देता पण ते अव्यवहार्य आहे असं वाटत नाही का? इस्लामिक दहशतवाद ही वस्तुस्थिती आहे. ज्यामुळे जगभरातील पुढच्या पिढीचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. आपण देशाला त्यापासून वाचविण्याची गरज आहे आणि मुलांना या अस्थिरतेशी लढण्यासाठी तयार करायला हवं असं वाटतं का?
डॉक्टर : घरामध्ये, रस्त्यावर, गावात किंवा मग आशिया खंडाच्या पश्चिमेकडील देशांमध्ये हिंसकपणा वाढलाय आणि त्याचं समर्थन कुणी ठरावीक विचारांशी सांगड घालून, कुणी धर्माशी, कुणी अपमानाचा बदला म्हणून तर कुणी सामूहिक आजाराचं लक्षण म्हणून करताना दिसतात. पण यामुळे वाईट कृत्यं करणाऱ्यांना आयतं निमित्त मिळतं. आपले पंतप्रधान म्हणाले ते महत्त्वाचं आहे, ‘‘दहशतवाद आणि धर्म यातील संबंध संपुष्टात आणू या.’’ मित्रांनो, आपण या कामाची सुरुवात आपल्या घरापासूनच करू या. चला, आपल्या घरातील लहान मुलांना घरातील किंवा कुटुंबातील, समाजातील लहान लहान दहशतीच्या विरोधात लढायला शिकवू या; जसे की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन करणार नाही, प्रवेश नाकारणाऱ्या शाळांशी लढू, झाडं-पक्षी-प्राणी-कीटक इत्यादी पर्यावरणाचा समतोल सांभाळणाऱ्या निसर्गातील इतर जिवांचा मान राखू आणि त्यांचे तसंच सभोवतालच्या इतर जीवित घटकांचं अस्तित्व अमान्य करणार नाही हे मुलांना शिकवू..आपल्या देशात आणि आपल्या समाजात अशा अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी आहेत ज्याच्या विरोधात आम्ही लढू आणि आमचा देश राहण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण बनवू. आपल्या देशातील हजारो तरुण-तरुणी आज स्वत:हून सुखासीन नोकरीचा त्याग करून समाजासाठी काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने पुढे येताहेत; जेणेकरून त्यांच्या कामामुळे केवळ एक घर नव्हे तर सारा आसमंत उजळून निघेल अशा वाटा ते निवडत आहेत. या तरुणांमुळे देशाला आपोआपच वेगवेगळ्या पातळीवर संरक्षण मिळतं आणि देशाच्या आत असलेल्या दहशतीच्या विरोधात लढणारी एक फौज तयार होते आहे. जे लोक दुसऱ्यांच्या सावलीखाली राहताहेत त्यांच्याबद्दल ज्येष्ठ कादंबरीकार व्ही.एस.नायपॉल म्हणतात, जे भारतीय काही वर्षांपूर्वी दुसऱ्यांच्या सावलीखाली राहणं पसंत करीत होते ते आता इतरांसाठी स्वत:ची निर्णायक सावली निर्माण करू लागले आहेत. तुमची मुलं त्यांच्यापैकी एक ठरतील. जे लोक देशाची भरभराट व्हावी म्हणून धोका पत्करून मदत करताहेत ते देशाला पुढे नेणार आणि जगातील सगळ्यात ताकदवान देश बनविणार. दहशतवादाचा किंवा हिंसक कृत्यांचा एकांगी विचार करण्यापेक्षा देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या तरुणांचा देखावा किशोरवयीन मुलांनी पाहण्याची गरज आहे. ही अर्थव्यवस्था त्यांना सकारात्मक ऊर्जेची, शांततेची आणि भरभराटीची हमी देईल यात शंका नाही.
पुढला काळ अमृतमंथनाचा, तुमची आमची परीक्षा पाहणाराही असू शकेल. शांत डोक्याने आणि समतोल विचाराने पुढे चाला. मुलांनो, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा.

शब्दांकन – मनीषा नित्सुरे-जोशी
harish139@yahoo.com
(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:42 am

Web Title: what indian childrens think about national incidents happened in 2015
टॅग : Chaturang
Next Stories
1 जो रह गया वो जहर है
2 माझ्या तेरा वर्षांच्या मुलास..
3 प्रकाशाची वाट
Just Now!
X