ध्येयासाठी चाकोरी सोडायची. त्यासाठी झपाटून जायचं आणि यशाला गवसणी घालणारे काही तरुण-तरुणी सभोवताली असतातच. मोठं स्वप्न आणि त्याला मेहनतीची जोड हे एकदा जमलं की यशाची माळ गळ्यात पडतेच. त्यासाठी सुखासीन जीवन त्यागायचं आणि सर्वोत्तमाचा ध्यास धरायचा. विचारांना कृतीची जोड देणाऱ्या अशा ध्येयवेडय़ांविषयी..

एका मध्यमवर्गीय सर्वसाधारण परिस्थितीत निकिता मोठी झाली. अशा परिस्थितीतही तिच्या आईला सामाजिक जाणीव होती. ती नेहमी इतरांच्या मदतीला धावून जात होती. हे गुण निकितामध्ये सुद्धा आले होते. निकिताची मोठी बहीणही समाजकार्य करत होती. निकिता महाविद्यालयात शिकत असताना अनेक उपक्रमांत भाग घेत असे. त्याचबरोबर मित्र, मैत्रिणींसोबत फिरणे, गप्पागोष्टी, मस्ती, धम्माल हे सर्व होतेच. पण तिच्यातील सामाजिक कार्य करण्याचा भाव काही तिला गप्प बसू देत नव्हता. तिने एका सामाजिक संस्थेत कामास सुरुवात केली. यासाठी महाविद्यालयातील वर्ग संपल्यावर थेट संस्थेत जात असे. तिला लहान मुलांसाठी, महिलांसाठी काम करण्याची संधी मिळाली.

      – निकिता तिवारी, समाजमाध्यम व्यवस्थापक

खायचं, प्यायचं, फिरायचं, धम्माल करायची असं सोनालीचे महाविद्यालयीन आयमुष्य होते. पुढे काय करायचं याचा विचार केला नव्हता. महिला सर्वच क्षेत्रांत कर्तृत्व गाजवत असताना कुणीतरी तिला पोलीस होण्याबद्दल चिडवलं. तू कधीच या क्षेत्रात येऊ  शकणार नाही, ते गुण आणि चिकाटी तुझ्यात नाही, असं तिला हिणवण्यात आलं. मग सोनालीने मनावर घेतलं.  मौजमस्तीच्या आयुष्याला लगाम घालून व्यायाम आणि अभ्यासावर भर दिला, एकेकाळी मनमौजी असणारी सोनाली आपल्या ध्येयाप्रति गंभीर झाली होती. अल्पावधीतच तिने आपले ध्येय गाठले. आता ती रेल्वे पोलीस दलात रुजू झाली आहे. योग्य वेळी क्षणिक सुखाचा त्याग केल्याने हे यश मिळाल्याचे तिने सांगितले.

      – सोनाली बांदल, पोलीस 

प्रमोद कोयंडे हा मूळचा . मुंबईत पत्रकारिता करत गोवा गाठला. वाचन, लेखन ही त्याची आवड होती. पण त्याला पत्रकारिता करत असताना वाचन, लेखन करता येत नव्हते. त्यामुळे त्याने धाडसी निर्णय घेतला.पत्रकारितेचा पेशा सोडला आणि पूर्ण वेळ लेखनात झोकून दिले. पत्नीच्या मदतीने शास्त्रीय संगीताचे वर्ग सुरू केले. आता तो मनसोक्त वाचन, लेखन करतोय. सिनेमासाठी तो गाणी लिहू लागला आहे. त्याला मोठा पल्ला गाठायचा आहे.

– प्रमोद कोयंडे, पत्रकार

डोंबिवलीता राहणारा राहुल चौधरी हा अभियंता होता. त्याच्या पायाच्या अंगठय़ाला ‘नेल इन ग्रोव्ह’ झाले होते. त्याचे एकाच वर्षांत त्याच्या सहा शस्त्रक्रिया झाल्या. मग त्याने व्यायाम सुरू केला. त्याचा अंगठा बरा झाला, त्याचे वजन कमी झाले, तो फिट झाला. यादरम्यान त्याला जाणवले की ‘जिमिंग’ मला आवडत आहे. तो जसा बरा तसे इतर लोकही बरे होऊ  शकतात. त्याला वाटले इतरांनाही त्याने शिकवले पाहिजे. यासाठी त्याने पूर्ण वेळ या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. तंदुरुस्तीच्या ध्येयाने राहुलला झपाटले होते.  मोठय़ा कंपनीतील चांगल्या नोकरीचा त्याने त्याग केला. त्याने वर्षभरात विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कोर्स केले, विविध पुस्तके वाचली तसेच व्यायामशाळेत व्यायाम करू लागला. या दरम्यान त्याला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. पण तो हरला नाही. या आवडीमुळे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरू करण्याची तयारी केली आहे.

      – राहुल चौधरी,  फिटनेस एक्सपर्ट

अभिनयक्षेत्रात करिअर घडवण्याची स्वप्ने पाहणारा कांदिवलीचा ऋत्विक. बारावीत असताना त्याला ‘मोरे पिया’ या नाटकातील प्रमुख भूमिका आली होती. मात्र त्याचे वजन जास्त असल्याने त्याला घेण्यात आले नव्हते. ऋत्विकमध्ये अंगभूत अभिनय होता, मात्र जास्त झालेले वजन त्याच्या आड आले. मग ही संधी अशी सहजासहजी जाऊ द्यायची नाही, असे त्याने मनाशी ठरवले नि पहिला घाला पडला तो त्याच्या आवडत्या, चमचमीत पदार्थावर! पहाटे चार वाजता उठून सहा वाजेपर्यंत नरिमन पॉईंट गाठू लागला. कलरीपायटू ही ‘केरळी युद्धकला’ (मार्शल आर्ट) शिकण्यास त्याने आरंभ केला. त्यानंतर मग महाविद्यालय, अभ्यास मग पुन्हा संध्याकाळी नाटकाच्या तालमीसाठी सांताक्रूझला. या साऱ्या चक्रात त्याचे वजन १०५ वरून ७० किलोपर्यंत आले. तर आता तो पूर्णपणे अभिनयक्षेत्रात उतरला आहे.

      – ऋत्विक केंद्रे, अभिनेता