12 July 2020

News Flash

आनंदी मन

उत्तम मानसिक आरोग्यामुळे आपण आपल्या गुणांचा, शक्तिस्थानांचा पूर्ण वापर करू शकतो.

: डॉ. अविनाश सुपे

आयुष्य म्हणजे तरुण पिढीसाठी धावपळ, दगदग आणि उद्दिष्ट  गाठण्यासाठी केलेली अविरत व अबोध झुंज बनले आहे. या धावपळीत झालेल्या शारीरिक दुखापतीमुळे किंवा व्याधीमुळे मग एकदम स्वत:कडे लक्ष देण्याची गरज जाणवते आणि मग तोडगा म्हणून त्यातील काही जण वेळेवर जागे होतात आणि तत्परतेने व्यायामाकडे वळतात. हे चांगलेच आहे, पण तरीही मानसिक आरोग्याकडे मात्र थोडे दुर्लक्षच केले जात आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक व्याधींचा अभाव नसून सक्षम, सर्जनशील आणि सकारात्मक अशी मनाची शक्ती. याबाबत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. काही जणांसाठी सुखी समाधानी वृत्ती म्हणजेच मानसिक आरोग्य असू शकते, तर काहींना आर्थिक स्थैर्य किंवा वैयक्तिक किंवा सांस्कृतिक उद्दिष्ट साध्य करणे म्हणजेच मानसिक समाधान मिळवणे वाटू शकते.

उत्तम मानसिक आरोग्यामुळे आपण आपल्या गुणांचा, शक्तिस्थानांचा पूर्ण वापर करू शकतो. आयुष्यातील अनेक आवाहनांना तसेच ताणतणावांना योग्य रीतीने हाताळण्या इतकी मनाची स्थिरता प्राप्त होते. थोडक्यात आपण सर्वागाने सक्षम आणि सबळ होतो.

ज्याप्रमाणे शारीरिक बल आणि निरामय आरोग्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर मनाची शक्ती मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

१. स्वत:ला ओळखून समजून घ्या आणि जसे आहात तसे मान्य करा. तुम्ही आहात तसे असण्याचे आणि मान्य करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच आनंदी वृत्ती. प्रत्येकाकडे सद्गुण, हुशारी आणि दुर्गुणही असणारच. आपल्यातील गुणांचा आनंद माना. ज्या उणिवा, कमतरता आहेत त्यावर कुढत बसू नका. सदासर्वदा स्वत:ची तुलना इतरांशी करू नका. चांगुलपणा बघा, शोधा, तो आपसूक तुमच्याकडे येतो आणि तुमचे बलस्थान होतो.

२. तुमच्या गरजा व भावना जाणून घ्या. दुर्लक्ष करू नका. त्यांना दाबून ठेवू नका. इच्छांचा कोंडमारा केल्याने त्यांचा अवेळी आणि अकल्पित उद्रेक होतो. अशी घुसमट लांब पल्लय़ात सर्वच प्रकारे त्रासदायक ठरते.

३. सकारात्मक आणि आशावादी मानसिकता जाणीवपूर्वक बनवा. जीवनात बदल अटळ असतात. जीवनातील चांगली बाजू बघण्याची सवय लावल्याने आयुष्यातील अप्रिय घटनांना सामोरे जाणे सोपे जाते. आपण जसजसे आशावादी आणि सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करतो तसतसे निराशाजनक परिस्थितीतही आशेचे कण शोधण्याची सवय लागते आणि नकारात्मक गोष्टी आपण स्वीकारू शकतो.

४.  मनातील दु:खी विचार बाजूला करायची सवय लावा. त्यावर खंत करत, कुढत बसून तो विषय वाढवू नका. संपूर्ण आयुष्याचा विचार करता काही दु:खी घटना, प्रसंग असणारच पण तुम्ही उगाळत बसला नाहीत तर ते लवकर विस्मृतीत जातील.

५. सर्व घटना, गोष्टींवर आपले नियंत्रण आहे अशा भ्रमात राहू नका. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्याच असतात. अन्य लोक कसा विचार करतील, काय म्हणतील किंवा कोणत्या घटना घडणार, या कशावरच आपले नियंत्रण नसते. आपल्या नियंत्रणातील गोष्ट म्हणजे आपले स्वत:चे मन, मनोवृत्ती, आपल्या प्रतिक्रिया आणि वर्तणूक. त्याचा दोष इतरांना देऊ  नका. केवळ प्रतिक्रियाशील न राहता सक्रिय व्हा. कोकाकोलाची बाटली हलवली की ती फसफसते, स्फोट होतो पण पाण्याच्या बाटलीचे तसे होत नाही. तसे शांत राहा. स्फोटक परिस्थिती हाताळताना कुठे आणि कसा भावनांचा उद्रेक होऊ  शकतो, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल हे ओळखायला, आजमावायला शिकून स्वत:ची शांतता ढळू न देता प्रसंग हाताळायला शिका.

६. ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्याचे कारण ओळखा आणि त्याचे उत्तर शोधून निराकरण करा. केलेला उपाय कदाचित रामबाण नसेल पण तो तुम्हाला तुमच्या दु:खापासून थोडे तरी दूर नेईल.

७. मदत मागा आणि मिळवा. आपणा सर्वाना लोकांच्या प्रेमाची, प्रेरणेची आणि सहकार्याची गरज असते. मदतीची गरज लागणे हा दुबळेपणा दोष किंवा उणीव नाही. आप्तस्वकीय, मित्रमंडळी हे आधारस्तंभ असतात. त्यांच्याशी जोडलेले राहा. त्यांच्या सुख-दु:खात त्यांच्यासमवेत राहा. त्यांच्याबरोबर वेळ घालवा. एकाकीपणा घातक ठरू शकतो.

८. आयुष्याला शिस्त लावा. वेळेचे आणि कामाचे नियोजन तणावरहित राहण्यासाठी अत्यावश्यक आहे. महत्त्वाच्या कामांचा क्रम ठरवा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. निश्चित, सुनिर्धारित, पूर्ण करू शकाल अशी कुवतीप्रमाणे आणि सुयोग्य वेळेत पूर्णत्वाला जातील अशी यथायोग्य ध्येये ठरवा. मोठी आणि महान कामेही टप्प्या-टप्प्याने करीत गेल्याने पूर्णत्वाला नेता येतात. दिरंगाई करू नका पण उपलब्ध वेळ काम आणि विश्रांती किंवा छंदामध्ये विभागून घ्या.

९. अडीअडचणीत लोकांना मदत करा. केलेल्या सत्कृत्यासाठी, मिळविलेल्या छोटय़ा-मोठय़ा यशासाठी आपली पाठ थोपटा. दुसऱ्यांनी शाबासकी दिली पाहिजे, कौतुक केले पाहिजे, याची वाट बघू नका. स्वत:मधले गुण जाणून आनंदी व्हा.

१०. समाधानी राहायला शिका. इच्छा आणि खरी गरज यातील फरक ओळखा. ज्या गोष्टींमुळे आनंद मिळाला तो लगेच विसरून सतत दुसऱ्या गोष्टीमागे धावणे योग्य नाही.

थोडक्यात शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही तेवढेच जपायला हवे. आनंदी मन ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 2:45 am

Web Title: a happy mind is our most valuable asset akp 94
Next Stories
1 पंचखाद्य
2 मधुमेहाचे निदान
3 शीर्षांसन
Just Now!
X