22 November 2019

News Flash

घरचा आयुर्वेद : पोटदुखी

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com डॉक्टर माझे मधूनमधून खूप पोट दुखते. एखादी गोळी घेतली की तात्पुरते बरे वाटते, पण पुन्हा काही दिवसांनी हा त्रास

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com

डॉक्टर माझे मधूनमधून खूप पोट दुखते. एखादी गोळी घेतली की तात्पुरते बरे वाटते, पण पुन्हा काही दिवसांनी हा त्रास होतो, अशी तक्रार अनेक रुग्ण करत असतात. या पोटदुखीची कारणे अनेक असतात. पोटदुखीवर तात्पुरते उपाय केले जातात. परंतु वारंवार त्रास होत असल्यास या मागचे नेमके कारण समजून त्यावर उपाय करणे अत्यावश्यक आहे. याचे निदान वैद्यकीय सल्लय़ाने करणे महत्त्वाचे आहे. पोटदुखीची सामान्य कारणे आणि आयुर्वेदीय उपचारांची दिशा यांचा आढावा घेऊया.

आयुर्वेदशास्त्राने पोटदुखीला उदरशूल असे संबोधले आहे. यामध्ये उदर म्हणजे पोट आणि शूल म्हणजे दुखणे होय. कोणत्याही रोगामध्ये शरीरात असणारे वात, पित्त, कफ या तीन दोषांपैकी एक, दोन किंवा तीनही दोष भूमिका बजावत असतात. त्याचप्रमाणे या पोटदुखीतही वातामुळे होणारी पोटदुखी, पित्तामुळे होणारी पोटदुखी व कफामुळे होणारी पोटदुखी असे प्रकार दिसतात. आणि त्या त्या दोषाप्रमाणे त्या त्या प्रकारची लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ, पित्तामुळे होणाऱ्या पोटदुखीमुळे पोटात जळजळ होणे, नाभीच्या आसपासच्या भागात दुखणे, अशी लक्षणे दिसतात. तर कफामुळे होणाऱ्या पोटदुखीत पोट जड होणे, मळमळ होणे, तोंडास पाणी सुटणे अशी काही लक्षणे दिसतात. म्हणजे पोटदुखीमध्ये दिसणाऱ्या लक्षणावरून त्या पोटदुखीला कारणीभूत असणारा दोष शोधता येतो आणि उपचार ठरवता येतात. अर्थात यामध्ये केवळ दोषांचाच विचार करून चालत नाही तर पोटदुखी नेमकी कोणत्या अवयवाच्या ठिकाणी आहे, वेदना किती तीव्र आहे, त्या पोटदुखीचा आहाराशी, मलप्रवृत्तीशी, मूत्रप्रवृत्तीशी काही संबंध आहे का, याचीही शहानिशा करावी लागते.

पोटदुखीची इतर कारणे

*  अजीर्ण होणे- अजीर्ण होऊन पोटात वात धरणे हे पोटदुखीचे एक मोठे कारण असते. बटाटे, उसळी, डाळीच्या पिठाचे पदार्थ नेहमी खाणे, भजी, बटाटेवडे, पावभाजी खाणे हेही पोटदुखीस कारणीभूत ठरतात.

*  मलावरोध- नेहमी मलावरोधाचा त्रास असल्यानेही पोटदुखीचा त्रास होऊ  शकतो.

*  आमाशय व्रण (अल्सर)- पोटात होणाऱ्या व्रणामुळे (अल्सरमुळे) पोटदुखी निर्माण होऊ  शकते. याचे प्रमाण बऱ्याच अंशी वाढत चाललेले दिसते आहे. सतत अतिशय तिखट, मसालेदार पदार्थ खाणे, अति प्रमाणात केलेले चहापान, अति जागरण ही अल्सर निर्माण करणारी कारणे आहेत.

*  जंत- पोटात असणारे जंत हे देखील पोटदुखीचे एक कारण असू शकते. विशेषत: लहान मुलांमध्ये या पोटदुखीचे प्रमाण अधिक असते. सतत खाण्याची इच्छा होणे, गुद्द्वाराजवळ कंड सुटणे, मलमार्गातून जंत पडणे अशी काही जंताची लक्षणे या पोटदुखीत दिसतात.

*  प्रवाहिका किंवा आव- या विकारातही पोटदुखीचा तीव्र त्रास होतो. यामध्ये मुरडा मारून मलप्रवृत्ती होते. मलप्रवृत्तीसाठी अधिक जोर द्यावा लागतो. त्यामुळे पुन्हा पोटदुखी वाढते. आपल्या शरीरात मूत्रवाह संस्था ही एक विशिष्ट उत्सर्जन संस्था असते. यामध्ये मूतखडा निर्माण झाल्यास त्यामुळे तीव्र स्वरूपाची पोटदुखी निर्माण होऊ  शकते. यामध्ये बऱ्याचदा मूत्रप्रवृत्तीचे वेळी आग होणे, अशी इतर लक्षणे दिसतात.

उपचारांची दिशा

* त्या त्या रोगावर केलेले उपचार त्या रोगामुळे होणारी पोटदुखी कमी करतात. अजीर्णामुळे पोट दुखत असल्यास हिंगवाष्टक चूर्ण, शंखवटी अशी आयुर्वेदीय औषधे उपयोगी पडतात. अल्सरच्या पोटदुखीवर प्रवाळपंचामृत, गाईचे साजूक तूप, शतावरी घृत, कामदुधा अशी बरीच औषधे उपयोगी पडतात. मलावरोधामुळे होणाऱ्या पोटदुखीसाठी रात्री झोपण्यापूर्वी गंधर्वहरितकी चूर्ण अर्धा चहाचा चमचा एवढे घेऊन त्यावर गरम पाणी पिण्याने पोटदुखी कमी होते.

* जंतामुळे होणाऱ्या पोटदुखीवर विडंगारिष्ट सारखी जंतावरील औषधे उपयुक्त ठरतात. याचप्रमाणे इतर पोटदुखीवर उपचार करता येतात. येथे पोटदुखीच्या उपचारांची केवळ दिशा दाखवली आहे. पोटदुखीवर कोणीही स्वत:चे स्वत: उपचार करू नयेत. वैद्यकीय सल्ला प्रत्येक वेळी घेणे आवश्यक असते. कारण पोटदुखीचे नेमके कारण शोधणे व त्यावर नीट उपचार करणे अगत्याचे असते. प्रत्येक औषधाची मात्रा, काळ हा प्रकृतीनुसार ठरवावा लागतो. आयुर्वेदशास्त्रानुसार या पोटदुखीला बऱ्याचदा कारण ठरतो तो वातदोष आणि त्याच्या नियंत्रणासाठी बस्तीचिकित्सा ही देखील अनेकदा उपयुक्त ठरते. योग्य दिशेने उपचार केल्यास पोटदुखी आटोक्यात येऊ  शकते, हे नक्की.

First Published on June 18, 2019 2:51 am

Web Title: abdominal pain treatment in ayurveda
Just Now!
X