मृणाल देव-कुलकर्णी, अभिनेत्री

ताण येणे हे स्वीकारणे अतिशय महत्त्वाचे आहे. कधी वैयक्तिक आयुष्यात तर कधी सामाजिक आयुष्यात माणसाच्या मनाला कमी-जास्त इजा होईल अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे ताण येतो या गोष्टीचा स्वीकार करा. आपली आपल्याशी ओळख असते. त्यामुळे ताण आला आहे याची जाणीव होण्यास सुरुवात होताच आपल्या जवळच्या माणसांची मदत घेणे आवश्यक असून ही मदत म्हणजेच आलेल्या ताणावर मलम पट्टी करण्यासारखे आहे.

आपल्याला कशामुळे छान वाटते याचे पर्याय आपल्यापाशी तयार असावेत. आपल्या छंदाची जोपासना करावी. मला जेव्हा ताण आल्यासारखे वाटते तेव्हा मी कुटुंबीयासमवेत वेळ घालवते. गिरिभ्रमणासाठी जाणे पसंत करते. गिरिभ्रमणाला गेल्यानंतर निसर्गाकडून खूप काही शिकायला मिळते. स्वच्छ ऑक्सिजन मिळतो जो शरीरासाठी आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी खूप ऊर्जा देतो. निसर्गातील शांतता मनाला प्रसन्न करते. निसर्गातील फळे, फुले सकारात्मक विचारांची परडी भरून ती परडी भेटवस्तू म्हणून मला देतात असे मला वाटते. निसर्गामध्ये असणारे विविध रंग मनाला उल्हसित करतात. या प्रत्येक रंगातून स्वत:चा वेगळा रंग जाणवतो. गिरिभ्रमणाहून परतल्यानंतर पुन्हा जोमाने काम सुरू करते.

ताण आल्यानंतर कधीही वाचन करत नाही. या वाचनातूनही अधिक ताण आल्यासारखे वाटते. कारण काही वाचन केल्यानंतर विचारांचे चक्र पुन्हा सुरू होते आणि ताण वाढण्याची शक्यता बळावते. ताण आल्यानंतर भरपूर व्यायाम करणे पसंत करते. यामुळे ताण हलका होतो आणि सकारात्मक ऊर्जा अधिक मिळते. आजकालची तरुण पिढी टोकाचा निर्णय घेते. या वेळी कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. माझ्या मुलाचे काय सुरू आहे? इतर काय करत आहेत? यासाठी खरे तर कोणालाच वेळ नसतो. त्यामुळे आपण फक्त आपल्या कुटुंबातील पाल्यांना आपला वेळ द्यावा. आपल्या पाल्याला आपण पुरेसा वेळ देतो की नाही याचा विचार करायला हवा. आपल्या पाल्याशी गप्पा मारणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुणांच्या मनावर येणारा ताण हलका होण्यास मदत होईल.

शब्दांकन – भाग्यश्री प्रधान