अमोल कोल्हे, अभिनेता 

आपण एकाच वेळी अनेक कामे करत असतो त्यामुळे ताण येणे साहजिक आहे. आपल्याला येणारा ताण हा ओझ्यासारखा असतो. डोक्यावर घेतल्यास आपली उंची कमी होते आणि पायाखाली घेतल्यावर आपली उंची वाढते असे मला वाटते. सध्या सतत चित्रीकरणात व्यग्र असतो. अशा वेळी ताण घालवण्यासाठी मेकअप करण्याच्या खोलीत माझी एक खास जीम आहे. यामध्ये असणारी ‘पंचिंग बॅग’माझा ताणमुक्तीचा उत्तम पर्याय आहे.

‘पंचिंग बॅग’बरोबर मस्ती करणे हा ताण घालवण्याचा सोपा उपाय आहे. क्रिया योगासने करणेही मला आवडते. या ध्यानधारणेमुळे देखील माझा ताण हलका होतो. ताण येणे म्हणजे मुळातच तुमच्यात नकारात्मक भावना तयार होत असते. ताणाच्या वेळी मी व्यायाम करण्याकडे अधिक भर देतो. या व्यायाम करण्यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक विचार तयार करण्याची मोठी क्षमता असते. ही सकारात्मक ऊर्जा मला बरेच काही शिकवते. त्यामुळे तुम्ही चालणे, धावणे किंवा शरीराचा कोणताही व्यायाम केल्यानंतर ताणाचे प्रमाण आपसूकच कमी होते. शूटिंगच्या वेळी अनेक गोष्टी करताना वेळ मिळणे कठीण होते. अभिनय, पटकथा तसेच निर्मिती करताना तणाव येणे खरंच स्वाभाविकच असते. पण वेळ मिळेल तशा या गोष्टी नक्कीच करतो. कधी कधी दोन ते पाच मिनिटे वेळ मिळाला तरी त्या वेळेत क्रिकेटचे जुने सामने बघायला मला खूप आवडतात. त्यात मुख्यत: सचिन तेंडुलकर खेळत असताना शारजाहमध्ये जे अचानक वाळूचे वादळ आले होते तो सामना मी पुन्हा पुन्हा बघतो. त्यामुळे मला काम करायला आणखी ऊर्जा मिळते. मला गाणी ऐकायला देखील आवडतात. त्यात मी विचार करायला लावणारी गाणी  ऐकत नाही. त्याऐवजी हिंदी चित्रपटातील गाणी ऐकायला अधिक आवडतात. मला दुचाकीवर फिरायला खूप आवडते. मी आजवर दुचाकीवरून फार लांब प्रवास केला नाही. मला जेव्हा मोकळा वेळ मिळतो त्यावेळी मी स्वत:ची दुचाकी काढतो आणि फिरतो. चारचाकी वाहनाने फिरण्यापेक्षा मला दुचाकीवर बसल्यानंतर ताणमुक्तीचा आनंद मिळतो. ताण घेण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वत:चे मार्ग स्वत: शोधावा.

शब्दांकन – भाग्यश्री प्रधान