प्रसाद ओक

मी एक कलाकार आहे आणि लोकांचे मनोरंजन करत राहणे हा माझा धर्म आहे, या विचाराने टाळेबंदीच्या काळात दररोज एक तास सलग ५० दिवस प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा विक्रम अभिनेता प्रसाद ओक याने के ला आहे. टाळेबंदीमुळे सगळेच जनजीवन ठप्प झाले. एरव्ही नाटक-चित्रपट-मालिका अशा विविध माध्यमांतून कलाकार आपली भूमिका कायम बजावत असतात. सातत्याने ते लोकांसमोर असतात आणि नानाविध भूमिकांमधून त्यांचे मनोरंजनही करत असतात. मात्र आता नाटक नाही, चित्रपट नाही म्हणून मग लोकांचे मनोरंजन करायचेच नाही का? कलाकार म्हणून कु ठल्या ना कु ठल्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत राहिलेच पाहिजे, या एकाच उद्देशाने झपाटलेल्या प्रसादने इतर कु ठलीही गोष्ट न करता संवादाचा हा धागा मजबूत करण्यावर अधिक भर दिला.

लोकांशी लाइव्ह संवाद  साधायचा, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायच्या असे मी ठरवले होते. त्यानुसार मी रोज कु ठला ना कुठला विषय घेऊ न त्यांच्याशी गप्पा मारायला सुरूवात के ली, असे प्रसाद सांगतो. टाळेबंदीच्या निमित्ताने सुरू झालेला हा गप्पांचा प्रवास आता अर्धशतकाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. बुधवारी १३ मे रोजी गप्पांचे पन्नासावे सत्र रंगणार असल्याची माहिती प्रसादने दिली. सलग ५० दिवस वेगवेगळ्या विषयांवर प्रेक्षकांशी लाइव्ह संवाद साधण्याचा प्रयत्न आजवर कोणत्याही कलाकाराने के ला नसेल, माझ्यासाठीही हा खास अनुभव होता, असे प्रसाद सांगतो. रोज गप्पांसाठी विषय काय घ्यायचा, हाही एक अभ्यास होता, असे प्रसाद सांगतो. या गप्पासत्राच्या अभ्यासासाठी आणि तयारीसाठीच माझा रोजचा अर्ध्याहून अधिक दिवस जायचा. मात्र या गप्पांमध्ये खूप लोक जोडले गेले आणि त्यांनी माझा उत्साह वाढवला, असेही त्याने सांगितले.

रंगभूमीवरचे विनोदी किस्से, संदीप खरेच्या कविता, पुलंचे किस्से, पुणेरी पाटय़ा, मराठी म्हणी पूर्ण करा, इंग्लिश शब्दांना पर्यायी मराठी शब्द सांगा, आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न, हिंदी फिल्मी प्रश्नमंजूषा, महाराष्ट्र दिनानिमित्ताने के लेली प्रश्नमंजूषा, मराठी कोडी, सुरेश भटांच्या गझला, मालिकांची शीर्षकगीते, ट्रक आणि रिक्षावरच्या पाटय़ा, महानोरांच्या कविता, दादा क ोंडके  अशा खूप वेगवेगळ्या विषयांवर या लाइव्ह सत्रातून मी लोकांशी गप्पा मारल्या, असे तो सांगतो. सध्या टाळेबंदीच्या काळात अनेक कलाकार आपल्या आवडीनिवडी जपण्यावर भर देत आहेत, मात्र प्रसाद या गप्पांमध्येच आपण रमल्याचे सांगतो. रोज लोकांना एक तास आपल्याशी जोडून घेणे हे सोपे नव्हते. अनेकदा काही विषय खूप अभ्यासाने मांडावे लागले, उदाहरणार्थ सुरेश भट यांच्या गझलांविषयी बोलताना त्यांच्या अप्रकाशित गझल कोणत्या? याचा अभ्यास के ला. काही सत्रांमध्ये लोकांनाच  प्रश्न विचारून बोलते के ले तर काही सत्रांत सिद्धार्थ जाधव, सोनाली कु लकर्णी, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर पुष्कर श्रोत्री या सहकलाकारांना गप्पांसाठी निमंत्रण देऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या, असे अनेकविध गप्पांचे प्रयोग रंगल्याचे प्रसाद सांगतो. आता हे लाइव्ह गप्पा सत्र अर्धशतकाच्या उंबरठय़ावर आहे, ते पूर्ण झाले की आपण थांबणार असल्याची माहितीही प्रसादने दिली. मात्र टाळेबंदीतल्या या गप्पांच्या पन्नासाव्या प्रयोगाला रोज हजेरी लावणाऱ्या शंभर ते सव्वाशे लोकांना प्रत्यक्ष संवादात सहभागी करून घेत हा क्षण रंगतदार करण्याचाही आपला प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले.

शब्दांकन – रेश्मा राईकवार