मानसी जोशी, अभिनेत्री

‘संगीत देवबाभळी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली अभिनेत्री मानसी जोशी टाळेबंदीच्या काळात  संगीतासोबतच नृत्याचीही जोपासना करत आहे.  याविषयी मानसी सांगते. ‘संगीताच्या शिक्षणाने जसा शब्दांना आकार येत जातो तसे नृत्याच्या शिक्षणाने शरीर अधिक लयबद्ध होत जाते. एखादा कलाकार जेव्हा अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होतो तेव्हा शब्दांसोबत त्याचे शरीरही बोलत असते आणि ते अधिक बोलके  करण्यासाठी प्रत्येक कलाकाराने नृत्याचे धडे गिरवले पाहिजे आणि जेव्हा ही नृत्यकला आपण आत्मसात करतो तेव्हा आपल्या सादरीकरणात झालेला बदल आपल्यालाच जाणवू लागतो.’

मानसी म्हणते, नृत्याचे प्रशिक्षण घ्यावे असा विचार डोक्यात होताच. पाच वर्षांपूर्वी सोनिया परचुरे यांच्याकडे तब्बल दोन वर्षे कथ्थकचे प्रशिक्षण घेतलेही; परंतु काही कारणामुळे पुढे ते पूर्ण करता आले नाही. टाळेबंदीच्या आधी आपण नृत्यावर काही तरी करायला हवे असा विचार आम्ही मैत्रिणींनी केला होता, पण तेव्हा सगळ्यांच्या व्यस्ततेमुळे राहून गेले होते. पण टाळेबंदी ही नृत्य शिकण्याची उत्तम संधी आहे हे लक्षात येताच आम्ही कामाला लागलो. मी, भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, सुखदा खांडकेकर, समिधा गुरू, मृणाल लोकरे आम्ही सगळ्या मैत्रिणी सतत काही तरी कलात्मक करण्याच्या विचारात असतो. त्यापैकीच एक म्हणजे टाळेबंदीत नृत्य शिकणे.

नृत्याच्या या ऑनलाइन शाळेत आमचे स्वाध्याय सुरू झाले. कु णीच फारसे तंत्रस्नेही नसल्याने चुकत-माकत पण जोरदार सुरुवात झाली. कधी सुखदा, कधी संस्कृती, कधी भार्गवी आलटून-पालटून नृत्य शिकवत आहेत. नृत्याच्या बाबतीत त्या माझ्यापेक्षा अगदी सरस असल्याने नवे काही आत्मसात करायला भरपूर मजा येत आहे. यात घरातली कामे, इतर छंद जोपासून प्रत्येक जण दिवसातला एक तास नृत्यासाठी आवर्जून देत आहे.

यातून बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या. जसे की, प्रत्यक्षात नृत्य शिकताना मुद्रा, हावभाव, पदन्यास समोर पाहता येतात पण ऑनलाइन शिकताना डावे-उजवे समजून घ्यायला वेळ लागतो. विशेष म्हणजे प्रचंड संयम लागतो. सुरुवातीला आम्हाला एक गाणे शिकायला आठ दिवस लागले, पण आता तीन दिवसांत आमचा एका गाण्यावर नाच बसवून तयार असतो. कथ्थक, साल्सा, लावणी असे शक्य तितके  शिकण्याचा आमचा प्रयत्न आहे.  या एका तासात फक्त नृत्य आणि नृत्य हा एकच ध्यास प्रत्येकीचा असतो. यात अवांतर गप्पा कुठेही नसतात.

मानसी सांगते, हा काळ कठीण आहे. या काळात घाबरण्यापेक्षा सतर्कतेची जास्त गरज आहे. पुढे काय होणार हे कुणालाच माहीत नसल्याने आपल्या हातात असलेला वेळ आपल्या आवडत्या गोष्टीत रमवा. नृत्यासोबतच मी गाण्यावरही काम करत आहे. लोकांच्या फार्माईशी, काही जुनी दुर्मीळ गीते ऑनलाइन व्यासपीठावरून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. शिवाय अभिवाचन, काव्यवाचनही सुरू आहे. तिच्या मते, ‘या काळात तुम्ही जोपासलेली कला, केलेले कष्ट कधीही वाया जाणार नाही. त्याचा पुढे तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.’

शब्दांकन – नीलेश अडसूळ