21 April 2019

News Flash

ताणमुक्तीची तान : हरवलेला संवाद सुरू करा

माणसाला जे आवडते त्याने ते करत राहावे. ताणमुक्तीचा मार्ग मात्र आपण शोधायला पाहिजे.

सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

आजकाल माणसांना अनेकदा ताण येतो आणि ताण येऊनही मी ठीक आहे असे आपण आग्रहाने दाखवण्याचा प्रयत्न करतो. ताण हा माणसाचाच एक भाग आहे आणि तो असताना तो नाहीच असे दाखवणे हे अनैसर्गिक आहे. मला नेहमी असे वाटते, मन आणि शरीर या दोन गोष्टी एकमेकांना फारच निगडित आहेत. आपल्या सगळ्यांचीच एक स्पर्धा सुरू असते- तू जास्त हुशार की मी? मी त्यातून स्वत:ला वेगळे केले आहे. माझी मुलगी लहान असताना मला वाटायचे की, तिचे सर्व मीच केले पाहिजे. सगळे मीच करणार असे आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्यातला नेतृत्वगुण मारत असतो. आपण नेतृत्वाबरोबर चांगले व्यवस्थापक असले पाहिजे. काही गोष्टी या मिळून करण्यासाठीच बनलेल्या असतात.

लक्ष्मणराव देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’मध्ये एक आत्या आहे. ती म्हणते, याचे घर झाले ना माझ्यामुळे, त्याचे लग्न ठरले ते माझ्यामुळे, यांना मुलगा झाला ना माझ्याचमुळे. असं नकळत ती बोलून जाते. मला फार मजा वाटली होती त्या पात्राची. आपल्याला प्रत्येक गोष्टीचे श्रेय हवे असते. या चुरशीतून आपण आपल्याला बाहेर काढल्यावर मला वाटते बऱ्याच गोष्टी एकदम सोप्या वाटायला लागतील. यासोबतच मानसोपचार हा विषय आपल्याकडे फारच दुर्लक्षीला गेला. याची गरज आपल्या सर्वाना आहे. ज्यांच्या मनावर ताण आहे त्या सर्वानाच मानसोपचार मदत करणार आहे. मानसोपचारतज्ज्ञासोबत बोलण्याने आपल्याला विषय सुचवायला मदत होते. मला या पद्धतीचा खूप फायदा झाला आहे. आपण आपल्या स्वत:साठी काही क्षण हे द्यायलाच हवे. नाटकात संवादात जसा विराम असतो तसा विराम मला लागतो. आठवडय़ातून तीन वेळा तरी मावळतीचा सूर्य पाहणे ही माझी गरज आहे. जिथेकुठे तो पाहायला मिळेल तेथे जाऊन तो पाहते. माणसाला जे आवडते त्याने ते करत राहावे. ताणमुक्तीचा मार्ग मात्र आपण शोधायला पाहिजे. प्रत्येकाचा तो वेगळा असेल. मला नाटकात-चित्रपटात मनसोक्त काम करता येत नसेल तर ताण हा येतोच; पण त्यासाठीच आपल्याकडे दुसरा दिवस आणि दुसरा प्रयोगही असतोच. त्याचा विचार करून आपण तयारीवर भर द्यायला हवा. मी तेच करते.

शब्दांकन – सौरव आंबवणे

First Published on November 8, 2018 2:11 am

Web Title: actress sonali kulkarni talk about how to release stress