तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सुखकर केले असून मानवाला सर्वागीण कामाकाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झालेले आहे. त्यातही सातत्याने या तंत्रज्ञानात होणाऱ्या विविध बदलांमुळे अद्ययावतीकरणासोबत स्वतला वळवून घेणेही मानवासाठी महत्त्वाचे ठरू लागले आहे. यापैकीच एक तंत्रज्ञान म्हणजे दूरसंच होय. दूरसंचाच्या शोधनानंतर, म्हणजे अगदी ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट ते आजच्या स्मार्ट दूरसंचाचा प्रवास विशाल आहे. काळ जसा बदलत गेला तसतशी लोकांची गरज देखील बदलत गेली आणि या बदलाला अनुसरून दूरसंच उत्पदकांनी देखील त्यांच्या दूरसंच प्रणालीत आपले बदल केले. दूरसंचांच्या वैशिष्टय़ानुसार त्याच्या विक्री किमतीत मोठी वाढ होऊ लागली. मात्र सर्वसामान्य माणसाला लक्षात घेऊन दूरसंच उत्पादकांनी आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या व्यक्तीला परवडतील असे स्मार्ट दूरसंच तयाकरण्यास सुरुवात केली. अशाच १५ हजार रुपये किमतीच्या आतील स्मार्ट दूरसंचाविषयी जाणून घेऊयात..

एमआय इलईडी स्मार्ट टीव्ही ४ ए प्रो (३२ इंच)

अ‍ॅंड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणाऱ्या या दूरसंचामध्ये गुगल असिस्टंटची सुविधा देखील देण्यात आली आहे. खास गूगल असिस्टंटसाठी वापरण्यासाठी अतिरिक्त असा रिमोट संच देखील यासोबत देण्यात आला आहे. अँड्रॉईड ओरीओ ८.१ अँड्रॉईड सिस्टीम असणाऱ्या या दूरसंचावर गूगल प्ले स्टोअर देखील उपलब्ध असल्यामुळे दूरसंचात सुरू होतील असे विशेष अ‍ॅप्लिकेशन या दूरसंचात साठवून ठेवता येतात. या दूरसंचात १ जीबी इतकी रॅम असून त्यासोबत ८ जीबीपर्यंत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. तसेच या दूरसंचाला २० व्हॅट क्षमतेचे ध्वनिक्षेपकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या दूरसंचाच्या हाताळणीच्या वेळी भारतातील सर्वच प्रादेशिक भाषा या सेटिंगच्या माध्यमातून वापरता येतात.- किंमत- १२ हजार ४९९

मोटोरोला एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही

मोटोरोला कंपनीचा सर्वाधिक कमी किंमत असलेल्या या दूरसंचाला देखील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. या दूरसंचामध्ये डिजिटल गेम खेळण्याचा उत्तम पर्याय देण्यात आला आहे. हे गेम खेळण्यासाठी या दूरसंचासोबत वायरलेस गेमपॅड देण्यात आला आहे. त्यामुळे डिजिटल गेमप्रेमींसाठी मोटोरोला एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर अँड्रॉईड ९ या ऑपरेटिंग यंत्रणेवर हा दूरसंच कार्यरत आहे. या दूरसंचात १ जीबी इतकी रॅम असून त्यासोबत ८ जीबीपर्यंत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. या दूरसंचाची चित्र गुणवत्ता देखील सुस्पष्ट असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले आहे. -किंमत- १३ हजार ९९९

एलजी ऑल इन वन एचडी रेडी स्मार्ट टीव्ही

एलजी कंपनीच्या या दूरसंचाला वेब ओएस या ऑपरेटिंग सिस्टीमसोबत जोडण्यात आले आहे. १ जीबी रॅम असणाऱ्या या संचामध्ये ४ जीबीची साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. या दूरसंचामध्ये अल्ट बालाजी, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, झी फाय आणि गुगल हे ओटीपी प्लॅटफॉर्म देखील वापरण्याची सुविधा आहे. या दूरसंचाला एचडी रेडीची १३६६*७६८ पिक्सल अशी गुणवत्ता देण्यात आली आहे. गूगलच्या क्लाऊड स्टोरेजशी हा दूरसंच संलग्नित करण्यात आल्यामुळे क्लाऊडवर साठवून ठेवलेली विविध छायाचित्रे आणि चित्रफिती या दूरसंचावर थेट पाहता येतात. – किंमत- १४ हजार ९९९

सॅमसंग सीरिज ४ (३२ इंच)

सॅमसंग कंपनीच्या सीरिज ४, ८० सेमी या उत्पादनाला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे. वायफायची सुविधा असणारा हा दूरसंच विकत घेण्यास ग्राहक प्राधान्य देतात. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि यू-टय़ुब यासारख्या इतर सर्व ओटीपी प्लॅटफॉर्मची उपलब्धता या सॅमसंग सीरिज ४ या दूरसंचामध्ये आहे. टायझन या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा दूरसंच कार्यरत आहे. या दूरसंचाच्या पटलाची गुणवत्ता अतिशय उत्तम आहे. या दूरसंचाचे रेझ्युलेशन १३६६*७६८ इतके आहे. या दूरसंचासोबत १० व्हॅट इतकी क्षमता असणारे ध्वनिक्षेपक देण्यात आले आहेत. – किंमत- १४ हजार ९९९

संकलन- चेतना कारेकर