18 September 2020

News Flash

पुन्हा चेतक

बजाज चेतकच्या संकेतस्थळावर जाऊन या स्कुटर ची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

|| वैभव भाकरे

भारतीय दुचाकी बाजारावर एकेकाळी सत्ता गाजवणाऱ्या ‘चेतक’चा नवा अवतार बाजारात दाखल झाला आहे. इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालणाऱ्या बजाजच्या या नव्या मोटारीला ‘चेतक’ हे नाव देऊन भारतीय ग्राहकांचे लक्ष बजाजने वेधून घेतले आहे.

विद्युत स्कुटर बाजारात आपले अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान चेतक समोर आहेच,  पण त्याचबरोबर आपल्या ‘बजाज चेतक’ या नावाला  न्याय देण्याची कामगिरीही  या स्कुटरला  करावी लागणार आहे.

 

बजाज ऑटोने चेतक ही त्यांची नवी विद्युत स्कुटर बुधवारी औपचारिकरीत्या भारतीय बाजारात दाखल केली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत चेतक प्रदर्शित करण्यात आली होती. ही स्कुटर जानेवारी २०२० पासून पुणे आणि बंगळूरुमधील निवडक केटीएम शोरूममध्ये बुकिंग आणि टेस्ट राइडसाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. श्रेणीप्रमाणे या दुचाकीमधील सुविधांमध्ये बदल असणार आहे. विशेष पॅकेजअंतर्गत होम-चार्जिग स्टेशनही देण्यात येणार आहे.

बजाज चेतकच्या संकेतस्थळावर जाऊन या स्कुटर ची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. स्कुटरची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी २००० रुपये भरावे लागणार आहेत.  फेब्रुवारी २०२०पासून चेतकचे वितरण सुरू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विद्युत स्कुटर असूनही चेतकचा देखभाल (मेंटेनन्स ) खर्च कमी असल्याचा दावा बजाजने केला आहे. १२ हजार किलोमीटर किंवा एक वर्षांतून एकदाच चेतकचे सव्‍‌र्हिसिंग करणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे, तर चेतकवर तीन वर्षे किंवा ५० हजार किलोमीटर्सची वॉरंटी देण्यात आली आहे. दुचाकीत लिथीयम-आयॉन बॅटरी देण्यात आली आहे.

चेतकचे पुनरागमन आता नवीन आधुनिक इलेक्ट्रिक अवतारामध्ये होत असून बजाज ऑटोसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, असे बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी चेतकची माहिती देताना सांगितले.

या स्कुटरचे डिजाइन ‘रेट्रो’ ठेवण्यात आले आहे. सध्या बाजारात असणाऱ्या विद्युत किंवा इतर स्कुटरच्या तुलनेत चेतक लक्षवेधक ठरते. बजाजच्या मूळ चेतकच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या डिजाइनमधून करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. अलॉय चाके, पुढील चाकाचे मोनो शॉक हे भाग जुन्या चेतकची आठवण देतात. गाडीला अंडाकृती एलईडी हेडलाइट देण्यात आली आहे. फुटबोर्ड आणि साइड पॅनलचे डिजाइन वेस्पा या इटालियन स्कुटरशी मिळतेजुळते असलयाचे वाटते. विशेष म्हणजे चेतक सोडून बजाज हे नाव या स्कुटरवर कोठेही दिसत नाही. चेतकला स्वत:ची विशिष्ठ अशी ओळख असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

स्कुटरला डिजिटल इन्स्ट्रमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. यात वेग, रेंज, बॅटरीची चार्जिग आणि रायडिंग मोडबाबत माहिती दर्शविली जाते. स्कुटरच्या सर्वच पर्यायांमध्ये चावी विरहित स्टार्टची सुविधा आहे. या स्कुटरसाठी बजाजने एक अ‍ॅपदेखील तयार केले असून त्यावर स्कुटरची लोकेशन व इतर माहिती दिसेल. ही स्कुटर शहरी ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे.

चेतकच्या पुढील चाकाला डिस्क ब्रेक देण्यात आले असून मागच्या चाकासाठी ड्रम ब्रेक दिले आहेत. चेतक हे एक शक्तिशाली वाहन नसल्याने त्याला मागील चाकासाठी डिस्क ब्रेकची आवश्यकता नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामुळे या स्कुटरची किंमत ही कमी झाली आहे. स्कुटरला १२ इंची चाके देण्यात आली आहेत. स्कुटरच्या प्रीमियम प्रकारात चार रंगाचे पर्याय देण्यात आले आहेत. तर अर्बन या प्रकारात ही स्कुटर दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

आधुनिक तंत्रज्ञान

नव्या चेतकमध्ये आयपी ६७ ही एनसीए सेलची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी घरातील साध्या पाच अ‍ॅम्पच्या विद्युत पुरवठय़ामधून सहज चार्ज केली जाऊ शकते. स्कूटरमधील बॅटरी व्यवस्थापन यंत्रणेमुळे चार्ज नियंत्रित केला जातो आणि डिस्चार्ज देखील सहज होतो. ३ केडब्ल्युएच बॅटरीमुळे ४.०८  केडब्ल्यू आणि सातत्याने ३.८ केडब्ल्यू शक्ती मिळते. स्कुटर चालवण्यासाठी इको आणि स्पोर्ट हे दोन पर्याय देण्यात आले आहे. त्याशिवाय रिव्हर्स असिस्ट सोयदेखील दिली गेली आहे.

बजाजची नवी चेतक ही एक इलेक्ट्रिक स्कुटर असून एकदा चार्ज केल्यावर ही स्कुटर ९५ किमीपर्यंत प्रवास करू शकते असा दावा कंपनीने केला आहे. स्कुटरला पूर्ण चार्ज करण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागतो, तर एका तासात  ही स्कुटर ० ते २५ टक्के चार्ज केली जाऊ  शकते, असा दावा कंपनीने केला आहे. बजाज चेतक ६० किमी प्रतितास वेग गाठू शकते.

ऐतिहासिक चेतक

१९८० आणि १९९०च्या दशकांत बजाजची चेतक एक अत्यंत लोकप्रिय स्कुटर होती. २००६ मध्ये या स्कुटरचे उत्पादन बंद करण्यात आले होते. १९७२ साली जागतिक बाजारपेठेत बजाज चेतक दाखल करण्यात आली होती. १९७६ मध्ये ही स्कुटर भारतात दाखल झाली. त्यावेळी या स्कुटरमध्ये १४५ सीसीचे २ स्ट्रोक इंजिन देण्यात आले होते. यातून ७.५ बीएचपी ऊर्जा निर्माण केली जात होती. १९८० मध्ये या स्कुटरच्या डिजाइनमध्ये बदल करण्यात आला. चेतकची लोकप्रियता इतकी होती की, ही स्कुटर घरी आणण्यासाठी १० काही वेळा वर्षांचा प्रतीक्षा कालावधी लागत होता. १९९५ पर्यंत या बजाजने एक कोटीहून अधिक स्कुटरची विक्री केली होती. भारतातील मध्यमवर्गीयांच्या मनात या स्कुटरने स्वत:चे स्थान निर्माण केले होते.

  •  किंमत १ लाख रुपयांपासून
  •  अर्बन आणि प्रीमियम या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध
  •  बुकिंग सुरू

खास वैशिष्टय़े

  • आकर्षक एलईडी हेडलाइट आणि डीआरएल
  •  इलेक्ट्रॉनिक स्वीचेस
  •  एलईडी ब्लिंकर्स आहेत
  • ग्लोव्ह बॉक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:28 am

Web Title: again chetak akp 94
Next Stories
1 रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५०
2 वालाची सुकी उसळ
3 नियम पाळा.. : सुखाचा रस्ता
Just Now!
X